डोंबिवली : ज्येष्ठ शल्यविशारद आणि डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ डॉ. वेणीमाधव श्रीराम उपासनी तथा अच्युतानंद सरस्वती यांचे गुरुवार, दि. १८ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ र्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ते अच्युतानंद सरस्वती या नावाने ओळखले जात होते. डॉ. वेणीमाधव यांनी चार आश्रमांचे तंतोतत पालन केले होते.
भागवत धर्मग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीचा ही अभ्यास होता. त्यांच्या घरीच उपासना होत होती. त्यामुळे कीर्तन आणि ज्ञानाची परंपरा होती. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली होती. 55 वर्षांच्या वैद्यकीय सेवेनंतर डॉ. वेणीमाधव यांनी संन्यास घेतला होता. वैद्यकीय सेवा करतानाच डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे ते आधारस्तंभ होते. त्यांनी भगवद्गीतेवर ओवीबद्ध भाष्य केले आहे. त्यांचा शिष्यवर्ग मोठा आहे. त्यांना ‘डोंबिवली भूषण’, ‘धन्वंतरी’ आणि ‘समाजभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.