अफगाणमधील ‘ती’ नोटीस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2021   
Total Views |

Afghanistan_1  
 
 
आपण भारतात एक सिनेमा पाहिला होता ‘खुदागवाह’. चित्रपटातला नायक जेव्हा भारत सोडून अफगाणिस्तानात परत जात असतो, तेव्हा नायिका गाणं म्हणते. ते गाणं फारच गाजलेले. ते सगळे पाहून भारतीय दर्शकांना मुळीच वाटणार नाही की, अफगाणिस्तानात असे गाणेबिणे काही नाही. याचे अत्यंत वाईट उदाहरण सध्या अफगाणिस्तानमध्ये घडत आहे. अफगाण प्रशासनाने सगळ्या शाळांना आदेश दिले की, शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात १२ वर्षांपुढील मुलीने गाणे म्हणू नये. बरं, या १२ वर्षांपुढील मुलींनी गाणे का म्हणू नये, याचे उत्तरही या नोटीसमध्ये दिले नव्हते. अफगाणिस्तानामध्ये कितीही तालिबान्यांची क्रूरता असली, तरीसुद्धा गाणे ही माणसाची अभिव्यक्तीच आहे. प्रत्येक कलेइतकीच गायन हीसुद्धा जीवंत कलाच. पण, अफगाणमध्ये १२ वर्षांवरील मुलींना गाण्याची बंदी केली गेली. अर्थात, ज्या अफगाणिस्तानमध्ये मुलींनी शाळेत जाणे हेच अप्रूप आणि धोकादायक आहे, तिथे मुलींनी गाणे म्हणू नये, असा इशारा सरकारने दिल्यावर तिथे मुली काय करतील? त्यांचे पालकही काय करतील? पण, या विरोधात काही विद्यार्थिनींनी आवाज उठवला आहे आणि काही स्वयंसेवी संस्थांनीही आवाज उठवला आहे.
 
 
‘अफगाणिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक’चे संस्थापक अहमद स्टारमस्ट यांनी प्रामुख्याने याबद्दल विरोध दर्शवला आहे. समाजमाध्यमांमध्ये त्यांनी चळवळ उभारली आहे. ‘आय एम माय साँग टू’ या नावाचा त्यांनी ‘हॅशटॅग’ तयार केला. हा ‘हॅशटॅग’ घेऊन शेकडो विद्यार्थिनी समाजमाध्यमांवर आपले आवडते गाणे गात आहेत. याचाच अर्थ त्यांनी सरकारचा हा नियम धुडकावून लावला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. अहमद स्टारमस्ट यांनी अफगाण जनतेला, पालकांना आवाहन केले की, आपल्या पाल्यांना त्यांच्या नैसर्गिक गायनाच्या इच्छेपासून का दूर ठेवले जाणार आहे? त्यांच्या या मोहिमेला अफगाणिस्तानातील एक लाख लोकांनी समर्थन दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. १२ वर्षांच्या पुढच्या मुलींनाच गाण्याची बंदी का, हा प्रश्न जनता विचारू लागली आहे.
 
 
अफगाणिस्तानमध्ये महिला सक्षमीकरणासाठी ४० वर्षे कार्य करणाऱ्या सीमा सुमार यांनीही याबाबत विरोध दर्शविला आहे. त्या म्हणतात की, “अफगाण रिपब्लिक’च्या आड हा तालिबानी अजेंडा राबवण्याचा प्रयत्न आहे,” तर काही विचारवंतांच्या मते, प्रशासनाला लोकांचा कल पाहायचा होता की, लोक तालिबानी विचारांना समर्थन देतात की नाही? जर लोकांनी विरोध दर्शवला नाही तर हळूहळू नवनवे तालिबानी नियम लागू करायचे, तर दुसरीकडे काही लोक तालिबानी नियमांचे चाहते आहेत. का? तर म्हणे, तालिबान हे इस्लामचे समर्थन करते. कुराणमध्ये जे जे सांगितले, तसे लोकांनी वागावे यासाठी म्हणे तालिबानी प्रयत्न करतात. अर्थात, असे म्हणणारे लोक स्वतःला कट्टर मुस्लीम समजतात. त्यांच्या मते इस्लाम बंधुता निर्माण करणारा आणि शांती करुणेचा धर्म आहे. जर ते जे म्हणतात ते खरे आहे, तर ही बंधुता, ही शांती आणि करुणा अफगाणी महिलांना नाही का?
 
 
अर्थात महिलांचे सोडा, तिथल्या पुरुषांनाही आता तालिबानी नियम नकोसे झाले आहेत. कारण, आधुनिकीकरणामुळे आणि समाजमाध्यमांमुळे अफगाणची नवी पिढी ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गजर करणारी. असो. अफगाणिस्तानमध्ये सध्या वातावरण तापलेले आहे. तिथल्या शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर असलेला कट्टर तालिबानी असंस्कृततेचा पहारा तिथल्या बहुसंख्य लोकांना नको आहे. लोकक्षोभाला थांबवण्यासाठी मग सरकारी प्रवक्ता नजिबा अरीयन पुढे सरसावल्या. त्या म्हणाल्या की, “प्रशासनाची चूक झाली, मुलींनाच नाही तर १२ वर्षांवरील मुलांनाही शाळेच्या कार्यक्रमात गाणे म्हणण्यास बंदी आहे. कारण, अशा कार्यक्रमाला विद्यार्थी गर्दी करतात आणि मग कोरोना संसर्ग वाढतो.” मात्र, सरकारने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये असे काहीही लिहिलेले नाही. अर्थात, ज्यांना अरब संस्कृतीतले स्त्रीजीवन माहिती आहे, त्यांच्यासाठी ही गोष्टही स्वागतार्ह आहे. मुलींवर निर्बंध लादल्याने जनता नाराज होते, हे तिथल्या प्रशासनाला जाणवले. यापुढे मुलीबाळींवर कोणतेही अनाठायी निर्बंध लादण्याआधी अफगाण प्रशासन हजार वेळा विचार करेल. तसेच तालिबान्यांनाही हा इशारा आहे की, तुमच्या मूर्ख, क्रूर निर्बंधांना अफगाण जनता भीक घालत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@