राज्य सरकारकडून १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर
मुंबई : राज्यातल्या विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी संबंधित शिक्षकांचे आझाद मैदान येथे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने दिलासादायक बातमी दिली. मूल्यांकनानंतर पात्र ठरलेल्या विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी १४० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
यासंबंधी अधिक माहिती देणारा शासन निर्णय बुधवार दि. १७ मार्च २०२१ जाहीर करण्यात आला. सदर निधीचा लाभ राज्यभरातल्या सुमारे ३३ हजार शिक्षकांना मिळणार आहे. यामध्ये मूल्यांकनानंतर पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळा आणि वर्गतुकड्यांना नव्याने २०% वेतन अनुदान, तसेच आधीपासून २०% अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २०% वेतन अनुदान अशा बाबींचा यामध्ये समावेश होतो.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पात्र विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्याअन्वये उच्च माध्यमिकच्या आठ हजार ८२०, माध्यमिकच्या १८ हजार ७७५ तर प्राथमिकच्या पाच हजार ८७८ शिक्षकांना याचा फायदा होणार आहे.