‘ते’ तिघं, ‘हे’ २३!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2021   
Total Views |

congress _1  H

आज पुन्हा २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये तीन नव्हे, तर तब्बल २३ नाराज नेत्यांचा ‘जी-२३’ गट सक्रिय असून, काँग्रेस पक्षपातळीवर सुधारणा झाल्या नाहीत, तर ही नेतेमंडळी काँग्रेसचे ‘हात’ दाखवून अवलक्षणही करू शकतात.

असं म्हणतात की, कुठे ना कुठे, कधीतरी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात सध्या तसेच काहीसे चित्र आपल्याला दिसून येईल. भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष आणि सर्वाधिक काळ सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेस पक्षातही अशीच इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, अशी चिन्हे सध्या दिसू लागली आहेत. केरळ काँग्रेसमधील नाराज नेते आणि माजी खासदार राहिलेल्या पी. सी. चाको यांनी मंगळवारी नवी दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केरळ काँग्रेसमधील गटबाजी आणि केंद्रीय नेतृत्वाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष अशी कारणे देत चाकोंनी काँग्रेसचा निरोप घेतला खरा. पण, अखेरीस पूर्वापार परंपरेप्रमाणे चाकोंनीही राष्ट्रवादी काँग्रेसचाच मार्ग पत्करला. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज, असंतुष्टांची ‘बी टीम’ म्हणूनच ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ ओळखली जाते. ठीक २२ वर्षांपूर्वीचा इतिहास आठवा. १९९९साली सोनिया गांधींच्या इटालियन वंशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर या त्रयीला सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. मग या त्रिकुटानेच एकत्र येऊन ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची स्थापना केली. ‘हाता’ला सोडचिठ्ठी देत स्वत:चे ‘घड्याळ’ पुढे केले खरे. परंतु, त्याच साली महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत शरद पवारांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि पुढे २००४-२०१४ पर्यंत त्यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीत सामील होत, केंद्रात कृषिमंत्रिपदही उपभोगले आणि राज्यातही काँग्रेसबरोबर सत्तासोबत केली. त्यामुळे राष्ट्रवादी ही अखेरीस काँग्रेसचीच ‘बी टीम’ म्हणून खरंतर स्थापनेपासूनच कार्यरत होती आणि आजही आहेच.आज पुन्हा २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये तीन नव्हे, तर तब्बल २३ नाराज नेत्यांचा ‘जी-२३’ गट सक्रिय असून, काँग्रेस पक्षपातळीवर सुधारणा झाल्या नाहीत, तर ही नेतेमंडळी काँग्रेसचे ‘हात’ दाखवून अवलक्षणही करू शकतात. पण, शरद पवारांनी पुन्हा तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले आहेत. तेव्हा ही नाराज नेतेमंडळी पवारांच्या वळचणीला लागतात की पुन्हा राष्ट्रवादीप्रमाणे ‘बी’ नंतर स्वत:ची स्वतंत्र ‘सी’ टीम जन्माला येते, ते येणारा काळच ठरवेल. त्यामुळे काँग्रेस ‘जी-२३’ गटाचे ‘डॅमेज कंट्रोल’ करते की निम्मा पक्षच ‘डॅमेज’ होतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


मूळ आणि कूळ काँग्रेसच!

राष्ट्रवादी काँग्रेस असो वा तृणमूल काँग्रेस असो, यामधील एकसमान धागा म्हणजे मूळ आणि कूळ हे शेवटी काँग्रेसचेच! शरद पवार, ममता बॅनर्जींपर्यंतचा राजकीय प्रवासही आपण जाणतोच. त्यामुळे गांधी परिवाराशी पटले नाही की, काँग्रेसमधून बाहेर पडायचे; पण आपल्या नव्याने स्थापन पक्षाची एकूणच कार्यशैली तशीच ठेवायची. म्हणजेच काय, तर काँग्रेसदेखील अमिबासारखे आपला आकार-उकार कितीही बदलला, तरी मूळ स्वभाव ‘जैसे थे.’ चाकोंच्या राष्ट्रवादी प्रवेशामागेही नेमके तेच गणित. असे असल्यामुळे एकीकडे काँग्रेस पक्षाला कितीही भगदाड पडले, पक्षाला उतरती कळा लागली, तर या ना त्या पक्षाच्या स्वरूपात ‘काँग्रेस’ नावाची जी एक वृत्ती आहे, ती जीवंत राहतेच. त्यामुळे मोदी जेव्हा ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणतात, त्याचा अन्वयार्थ केवळ गांधींच्या एका पक्षापुरता मर्यादित न मानता, काँग्रेसच्याच विचारसरणीवर जन्मलेल्या अन् जगलेल्या पक्षांनाही तीच बाब लागू होते, हे इथे समजून घ्यायला हवे. आता चाकोंना राष्ट्रवादीमध्ये घेतल्यानंतर केरळमध्ये चमत्कार घडेल, असे अजिबात नाही. राष्ट्रवादी हा नामधारी ‘राष्ट्रीय पक्ष’ असला तरी त्याचे राजकारण हे मुख्यत:महाराष्ट्रापुरतेच मर्यादित. जर शरद पवार खरोखरीच राष्ट्रीय नेतृत्व म्हणून प्रस्थापित असते, तर १९९९ पासून आज २०२१पर्यंत राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या बाहेर किती राज्यात सत्ता स्थापन करता आली? सत्ता सोडाच, किती राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून या २२ वर्षांत दिसून आला? त्यामुळे केरळमध्येही चाकोंना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या हाताशी काही लागेल, याची सूतराम शक्यता नाही. त्यातच पवार, संगमा, अन्वरपैकी एकमेव पवारच आज ‘राष्ट्रवादी’ आहेत. संगमांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकली असता, २००४ साली पवारांनी सोनिया गांधींशी संधान साधल्यावर संगमा यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्यानंतर संगमा गटाने ममतांच्या तृणमूलशी हातमिळवणी केली आणि २०१३ साली स्वत:चा ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पवारांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असलेल्या संगमांना झुगारून प्रणवदांना समर्थनही दिले. तसेच पवारांनी ‘राफेल प्रकरणी’ मोदी दोषी नसल्याचे सांगितल्यावर संतप्त तारिक अन्वर यांनीही २०१८ साली राष्ट्रवादीला राम राम ठोकला. तेव्हा, राष्ट्रवादीत यापुढे कितीही ‘इन्कमिंग’ झाले तरी हा पक्ष काही राष्ट्रव्यापी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष!
@@AUTHORINFO_V1@@