मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात अटक झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामाच घेतला जावा,असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता. दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याची चर्चाही होती.परिणामी सरकार अडचणीत सापडले होते, त्यामुळे दोन दिवसांपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठक सुरु होत्या.अखेर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली.परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.