मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असल्याचे चित्र सध्या मुंबईमध्ये दिसत आहे. यामुळे हळूहळू रुळावर येऊ पाहणारी मुंबई आता पुन्हा एकदा निर्बंधांच्या कचाट्यात अडकत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ५० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे आदेश रद्द करून शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सूचना देण्यात आली आहे. याची बुधवारपासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका शिक्षण विभागाने दिले आहे. याचे परिपत्रक महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी जारी केले आहे.
गेले वर्षभरापासून कोरोनाचे सावट असताना लॉकडाऊननंतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होईल म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर, जून महिन्यात शालेय शिक्षण पुन्हा सुरू करताना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. त्यासाठी शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर जे शिक्षक ऑनलाईन शिक्षण देत नाहीत त्यांना रोज शाळेत येण्याचे तर ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना महिन्यातून एकदा येऊन कार्यालयीन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता नवीन जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांना घरातूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे, शालेय पोषण आहार अंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी गरजेनुसार शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाला पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे परिपत्रकात म्हंटले आहे.