अध्यापनक्षेत्राचा ध्यासकर्ता

    16-Mar-2021
Total Views | 214

mansa_1  H x W:
शिक्षकी पेशा हा एक ध्यास, साधना, तपस्या म्हणून कार्य करणार्‍या डॉ. राम कुलकर्णी यांच्याविषयी...

अध्ययन’ आणि ‘अध्यापन’ या दोन बाबी मानवी जीवनाला आकार देत असतात. आजच्या आधुनिक युगात जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा अध्ययन करण्यास महत्त्व देतो. भारतात तर शिक्षण हा आता मूलभूत हक्क आहे. त्यामुळे अध्यापन करणार्‍या वर्गाची जबाबदारीही आता वाढली आहे. अध्यापन करणे किंवा करवून घेणे, हे केवळ नोकरी म्हणून नक्कीच अभिप्रेत नाही. अध्यापनाचा म्हणजेच, शिक्षकी पेशा हा एक ध्यास, साधना, तपस्या म्हणून स्वीकारण्याचा विषय आहे. नाशिक येथील ‘बीवायके’ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि १०० वर्षे जुन्या असलेल्या ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’चे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी हे अध्यापनक्षेत्राची सेवा, एक ध्यास म्हणून सुमारे ४० वर्षांपासून करत आहेत. आनंदयात्री ठरावा असाच त्यांचा आजवरचा हा प्रवास राहिला आहे.

डॉ. राम कुलकर्णी यांना प्राध्यापक होण्याची खरी प्रेरणा मिळाली ती त्यांचे वडील मनोहर कुलकर्णी यांच्याकडून. म. बा. कुलकर्णी या नावाने सुपरिचित असलेले त्यांचे वडील हे एक प्रख्यात साहित्यिक. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सरस्वतीचे अधिष्ठान लाभलेल्या कुलकर्णी परिवारातील राम यांनी इतर कोणतेही क्षेत्र निवडण्यापेक्षा प्राध्यापक व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची मनस्वी मनीषा होती. उपजतच वक्तृत्व, शिकणे, शिकविणे आणि विचार मांडणे यांची राम कुलकर्णी यांना आवड होतीच. प्राध्यापक हा पेशा या सर्व रुचींना न्याय्य ठरणार, असाच होता आणि आहे. त्यामुळे डॉ. राम कुलकर्णी ठरवून शिक्षणक्षेत्राचे व्रतस्थ बनले. पेशा म्हणून अध्यापनक्षेत्रात येण्याचा डॉ. कुलकर्णी यांचा दृष्टिकोन कधीही नव्हता आणि आजही नाही, हे त्यांच्याशी चर्चा करताना सहज जाणवते. तर आपण राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात, समाज प्रबोधनाच्या चळवळीत १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या संस्थेच्या माध्यमातून सरस्वतीची उपासना करत आहोत, याच भावनेतून डॉ. राम कुलकर्णी यांचे कार्य सुरु आहे.

डॉ. राम कुलकर्णी आज ज्या संस्थेत पदाधीन आहेत, त्याच संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. ‘एम.कॉम.’च्या परीक्षेत विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावत त्यांनी रजत पदकाला गवसणी घातली, तर तत्कालीन व्यवस्थेप्रमाणे अवकाशकालीन असलेल्या ‘एम. फिल.’ अभ्यासक्रमास त्यांनी नागपूर विद्यापीठात प्रवेश नोंदविला व यशस्वीपणे हा अभ्यासक्रम पूर्ण करत त्यांनी विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदक प्राप्त केले. नाशिक रोड येथील ‘बिटको’ महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा केली. मागील तीन वर्षांपासून ते बदली होऊन ‘बीवायके’ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा बजावत आहेत. या काळात त्यांनी वाणिज्य महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या या महाविद्यालयातील सुमारे ५००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रथितयश आस्थापनांत रोजगार उपलब्ध करून देण्याकामी विविध पातळ्यांवर मोलाची भूमिका बजावली. तसेच, शिक्षण हे कृतिशील असावे, असे त्यांचे ठाम मत असल्याने डॉ. राम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकावर आधारित व पुनर्रचित अभ्यासक्रम असणारे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे धोरण अंगीकारले. विविध कंपनी, यशस्वी उद्योजक आणि विद्यार्थ्यांचा थेट संवाद साधणारे कार्यक्रम आखत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्याचे, निर्देशित करण्याचे काम डॉ. राम कुलकर्णी मोठ्या तन्मयतेने करत आहेत. याशिवाय जव्हारसारख्या वनवासीबहुल क्षेत्रात व श्रीवर्धनसारख्या सागरीक्षेत्रातील भागातही डॉ. कुलकर्णी यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. या भागात कार्य करताना तेथील विद्यार्थी हे प्राचार्यांना देव मानतात, असा अनुभव आल्याचे ते आवर्जून नमूद करतात. पूर्वीच्या काळी शिक्षण घेणे आणि देणे, हे प्रत्यक्ष भेटीवरच मुख्यत्वे अवलंबून होते. मात्र, आजच्या आधुनिक युगात इंटरनेटमुळे कोणालाही कोणतेही शिक्षण सहज उपलब्ध होते. हा शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाचा बदल असल्याचे डॉ. राम कुलकर्णी सांगतात. या बदलामुळे ज्ञानाची कवाडे खुली होण्यास आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मोठी मदत झाली आहे. मात्र, काही तरुण या स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणूनदेखील उपयोग करत असल्याचे ते सांगतात.
प्राध्यापक हा विषय रुजविणारा असावा, तर प्राचार्य हा सहकार्‍यांचे व त्यांच्या गुणांचे मोल जाणणारा असावा, अशीच डॉ. राम कुलकर्णी यांची धारणा. त्यामुळेच ते आपल्या सहकार्‍यांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील जमेच्या बाजू हेरतात व त्या अनुषंगाने आपली कार्यपद्धती आखत संस्थाहिताचे कार्य करत आल्याचे ते सांगतात. याकामी त्यांना संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, मानव संसाधन संचालिका प्रा. डॉ. दीप्ती देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे डॉ. राम कुलकर्णी आवर्जून नमूद करतात.प्रशासक आणि प्राध्यापक अशा दोन्ही पातळीवर डॉ. राम कुलकर्णी यांनी आपले कार्यकौशल्य दाखविले आहे. ध्यास घेऊन आपण एखाद्या क्षेत्रात आलो, तरच हे शक्य होते हेच त्यांच्या कार्यातून दिसून येते. डॉ. राम कुलकर्णी यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121