गोरेगावच्या प्रकल्पबाधितांना मालाडमध्ये घरे

    16-Mar-2021
Total Views |

Malad _1  H x W



मुंबई : पश्चिम उपनगरातील गोरेगाव शास्त्रीनगरमधील नाल्यांच्या रुंदीकरणात बाधित झालेल्यांना मालाड पूर्व भागातील आप्पापाड्यात घरे देण्यात येणार आहेत. तेथील रहिवाशांनीही दूर कोठेतरी जाण्यापेक्षा आप्पापाड्यातील घरांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.
 
 
मुंबईत सध्या १२९ नाल्यांचे रुंदीकरणाचे काम चालू आहे. या रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे अथवा कोणत्याही प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पाच किमी परिघात करण्याचा नियम आहे. त्यानुसार मुंबई पालिकेकडून शास्त्रीनगर येथील नाला रुंदीकरणात बाधित झालेल्या कुटुंबांचे मालाड येथे पुनर्वसन केले जाणार आहे. सोमवारी येथील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना मालाड येथे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले.
 
 
मुंबई महापालिकेकडून शास्त्रीनगर येथील नालारुंदीकरणासाठी तिथल्या स्थानिक कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र, या कुटुंबाचे पुनवर्सन वाशी नाका येथे न करता मालाडमधील ‘एसआरए’ प्रकल्पातील राखीव असलेल्या घरांमध्ये व्हावे, अशी मागणी पुढे आली आहे. त्यासाठी स्थानिकांनी सोमवारपासून उपोषणदेखील सुरू केले आहे.
 
 
मालाडमधील आप्पापाडा येथील ‘एसआरए’ प्रकल्पातील घरांचा ताबा पुनर्वसनाच्या उद्देशाने पालिकेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे लांब अंतरावर पुनर्वसन करण्याऐवजी मालाडमध्येच करण्यासाठी रहिवासी आग्रही आहेत. तशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आणि आयुक्तांनी त्यांना तत्त्वतः मान्यताही दिली आहे. आप्पापाडा येथे ‘एसआरए’अंतर्गत बांधलेल्या घरांपैकी ४०० ते ५०० घरे प्रकल्पग्रस्तांसांठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्यातून ही घरे देण्यात येणार आहेत.
 
 
मालाडप्रमाणेच कांदिवली येथील भगतसिंगनगर येथील रहिवाशांचेही जवळच पुनर्वसन करण्यात येणार आहे. कांदिवली येथे पोयसर नदी रुंदीकरणात ३९० झापडीधारक बाधित असून, त्यापैकी १९० पात्र आहेत. शास्त्रीनगर गोरेगाव येथील २४० झोपडीधारक बाधित आहेत.
 
रक्कम घेण्याचीही मुभा
 
 
प्रकल्पबाधितांना घरे देताना २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना पात्र ठरवण्याचा शासनाचा नियम आहे. त्यानुसार ही घरे देण्यात येणार आहेत. मात्र, ज्यांना घरे नको असतील त्यांना सध्याच्या बाजार भावानुसार (रेडिरेकनर दर) रक्कम देण्यात येणार आहे. त्या रकमेतून त्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी घरे घेण्याची मुभा राहणार आहे.