ममतादीदी, असल्या ‘नौटंकी’ला मतदार भुलणार नाहीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2021   
Total Views |

mamata banrjee_1 &nb



नंदिग्राममधील घटनेचे भांडवल केल्यास त्याचा लाभ होईल, असे ममतादीदी यांच्या सल्लागारांना वाटत आहे. पण, प. बंगालची जनता अशा नाटकबाजीला बळी पडण्याची चिन्हे दिसत नाहीत.



प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने गती घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर जी प्रचंड सभा झाली, त्यामुळे सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ब्रिगेड परेड मैदानावरील सभेस सुमारे २० लाख लोक उपस्थित होते, असा दावा भाजपने केला असला तरी ममता बॅनर्जी यांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या पोलीस खात्याने मात्र या सभेस फक्त चार लाख लोक उपस्थित असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला लोकांनी उपस्थित राहू नये म्हणून सत्ताधारी पक्षाकडून बाधा आणण्याचेही प्रयत्न झाले. पण, या सभेसाठी जो जनप्रवाह लोटला होता, तो अडविणे मात्र तृणमूल काँग्रेसला शक्य झाले नाही. भाजपने प. बंगालमधील विविध मतदारसंघांमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्या अनेक निष्ठावान सहकार्‍यांनी तृणमूलचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या, भाचा आणि आत्या यांच्या घराणेशाहीच्या, भ्रष्टाचारी राजकारणाला त्रासलेली जनता भाजपला मोठ्या प्रमाणात समर्थन देऊ लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. “मी, बंगालची मुलगी असल्याने माझ्यामागे उभे राहा, ‘बाहेरच्यांना’ अजिबात थारा देऊ नका,” असे आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी आतून हादरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्या नंदिग्राम मतदारसंघातून लढणार आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये प्रचारासाठी गेल्या असता तेथे घडलेल्या एका घटनेचे भांडवल करून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. आपल्यावर विरोधकांनी केलेल्या हल्ल्यामुळे आपण जखमी झाल्याचा कांगावा त्यांनी केला. पण, प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा यंत्रणेतील हलगर्जीपणामुळे त्यांना दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. निवडणूक आयोगानेही त्या घटनेसंदर्भातील सर्व माहिती मागवून घेतली. ममता बॅनर्जी यांच्याबाबत जी घटना घडली, तो घातपात नसून तो अपघात असल्याचे उघड झाल्याने त्यांचा खोटारडेपणा उघडा पडला. आपल्यावर विरोधकांनी हल्ला केल्याने त्यामध्ये आपण जखमी झाल्याचे भासविण्याचा त्यांच्या प्रयत्न पूर्णपणे फसला. पायाला दुखापत झाल्याची छायाचित्रे झळकावून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. आपण व्हीलचेअरवरून प्रचार करणार असल्याचे त्यांनी घोषित केले! नंदिग्राममधील घटनेचे भांडवल केल्यास त्याचा लाभ होईल, असे ममतादीदी यांच्या सल्लागारांना वाटत आहे. पण, प. बंगालची जनता अशा नाटकबाजीला बळी पडण्याची चिन्हे दिसत नाहीत.

प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षास मिळत असलेला वाढत प्रतिसाद लक्षात घेऊन त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनीही हिंदू समाजास चुचकारण्यास प्रारंभ केला आहे. आपणही हिंदू असल्याचे त्यांना जाहीरपणे सांगावे लागले. पण, आपले हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या प्रचारादरम्यान मंदिरांना भेटी देऊन हिंदू मतदारांवर प्रभाव पाडण्याचाही प्रयत्न त्यांनी चालविला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचे पाहून भारतीय जनता पक्षाचे विरोधक ममता बॅनर्जी यांच्या मदतीला धावून येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये आघाडीवर आहेत ते यशवंत सिन्हा! माजी केंद्रीय मंत्री असलेले यशवंत सिन्हा यांनी भाजपला पराभूत करण्याचा जणू विडाच उचलला आहे. बिहारमधील निवडणुकीत मतदारांवर काहीच प्रभाव पाडू न शकलेले यशवंत सिन्हा यांनी नुकताच तृणमूल काँग्रेमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच, ममता बॅनर्जी किती धडाडीच्या नेत्या असल्याचे दाखले देत त्यांच्यावर त्यांनी स्तुतिसुमनेही उधळली. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात, ममतादीदी यांनी कंदाहारला जाण्याची तयारी कशी दर्शविली होती, याचे स्मरण करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, जनता यशवंत सिन्हा यांच्यासारख्या व्यक्तीमागे उभी राहत नसल्याचेच अलीकडील काळात अनेकदा दिसून आले आहे. प. बंगालमध्येही त्यांची अशीच अवस्था होणार आहे. यशवंत सिन्हा यांच्याप्रमाणेच दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत असलेले संयुक्त किसान मोर्चाचे नेतेही कोलकात्यास धावले. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी, ‘मतदारांनी भाजपला मते देऊ नये,’ असे आवाहन केले. टिकैत यांच्याप्रमाणेच भाजपला विरोध करण्यासाठी मेधा पाटकर याही प्रचारात उतरल्या आहेत. भाजपला विरोध करण्यासाठी नेहमीचे हे ‘अयशस्वी चेहरे’ निवडणूक रिंगणात उतरतात आणि तोंडघशी पडल्याचे जनतेला दाखवून देतात! ममता बॅनर्जी या आपल्या अपघाताचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असले तरी त्यामध्ये त्यांना यश मिळेल असे वाटत नाही. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या डोक्यात, डाव्या पक्षाची जवळजवळ ३४ वर्षांची सत्ता घालविल्याने जी हवा गेली होती, ती गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही प्रमाणात उतरली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ती पूर्णपणे उतरण्याची चिन्हे आहेत.

प. बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारत असताना तृणमूल काँग्रेसची आणि डावे पक्ष, काँग्रेस आणि ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ यांच्या आघाडीची स्थिती काही चांगली नाही. धार्मिक राजकारणास विरोध करीत असलेल्या डाव्या आघाडीने या निवडणुकीत चक्क ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’शी साटेलोटे केले आहे. या आघाडीत ‘सेक्युलर फ्रंट’ असल्याने काँग्रेसचीही पंचाईत झाली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिगेड परेड मैदानावर या आघाडीची सभा झाली होती. त्या सभेत काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी हे भाषण करण्यास उभे असताना ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’च्या समर्थकांनी त्यांच्या भाषणात अनेकदा व्यत्यय आणला होता. फ्रंटचे नेते आणि फुरफुर शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांच्यासाठी अधीररंजन चौधरी यांना गप्प करण्याचे प्रयत्न त्यांच्या समर्थकांकडून चालले होते. डावे पक्ष, काँग्रेस आणि ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ यांची आघाडी या निवडणुकीत उतरली आहे. या आघाडीचा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांवर प्रभाव पडणार नाही. या आघाडीमुळे तृणमूल काँग्रेसचेच नुकसान होणार आहे.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जो कथित घातपात किंवा अपघात झाला होता, त्याबद्दल काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती त्यांना चांगलीच भोवल्याचे दिसून येत आहे. चौधरी यांनी ती घटना म्हणजे, ‘राजकीय नौटंकी’ असल्याचे म्हटले होते. पण, त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसमधील नेते संतापले. चौधरी यांनी जे वक्तव्य केले, ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसकडून करण्यात आले. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून काँग्रेसने अधीररंजन चौधरी यांना मुक्त केले! त्यांच्या जागी रवनीतसिंह बिट्टू यांची नेमणूक करण्यात आली. प. बंगालमध्ये निवडणुका असल्याचे कारण सांगून त्यांना या पदावरून दूर सारण्यात आले. अधीररंजन चौधरी हे प. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी त्या पदावरूनही चौधरी यांची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता आहेच. आता प. बंगालवरही भाजपचा झेंडा फडकविण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. केरळमध्येही भाजप पूर्ण ताकदीनिशी डाव्या आघाडीस आणि काँग्रेस आघाडीस तोंड देण्यास सिद्ध झाला आहे. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकसमवेत भाजपने युती केली असल्याने तेथे या युतीकडेच सत्ता राहण्यासाठी युतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तामिळनाडूमध्ये हिंदू मतदारांना चुचकारण्याचे द्रमुकचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत हिंदू देवदेवता यांचा अपमान करणार्‍या या पक्षास हिंदू समाजास दुखवून चालणार नाही, हे लक्षात आले आहे. पाहूया, या निवडणुकांमध्ये काय होते ते! पण, हिंदू मतदार, हिंदू समाज यांची उपेक्षा करणे आपल्या राजकीय अस्तित्वाचा विचार करता परवडणारे नाही, हे या निवडणुकीच्या निमित्ताने विविध नेत्यांच्या लक्षात येऊ लागले हेही नसे थोडके!
@@AUTHORINFO_V1@@