कार्बनी रसायनशास्त्रातील झेप...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2021   
Total Views |

manasa_1  H x W


कार्बनी रसायनशास्त्रात अमूल्य योगदान देऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत असलेले डॉ. संतोष घारपुरे. त्यांचे विज्ञानक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वाचे आहे. त्यांच्याविषयी...


आपण ज्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत असू, तिथे समाज आणि देशकल्याणाचा विचार आणि कार्य केले पाहिजे,” असे डॉ. संतोष घारपुरे यांचे म्हणणे. डॉ. संतोष हे ‘आयआयटी मुंबई’ येथे कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. कार्बनी रसायनशास्त्रात विशेष योगदान दिल्यामुळे ते ‘आयआयटी’मध्ये या विषयाचे ‘परफ्युमरी चेअर’ प्राध्यापक आहेत. इतकेच नव्हे तर ‘आयआयटी’मध्ये ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रिन्युअरशिप’ या विभागाचे ते प्रमुख आहेत. तसेच तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रम वसतिगृहाशी त्यांचे स्नेहमय नाते. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा सर्व भार उचलणे, वसतिगृहाच्या दृष्टीने उपयोगी असलेले उपक्रम-योजना राबविणे यामध्येसुद्धा डॉ. संतोष सक्रिय आहेत. कार्बनी रसायनशास्त्रात विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, योगदान द्यावे, यासाठी ते ठिकठिकाणी व्याख्यान आणि सेमिनारही आयोजित करतात. महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या विद्यापीठांमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्या गुणवत्तेत परिपूर्णता आणणे यासाठी डॉ. संतोष प्रशत्नशील आहेत. या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये कार्यरत करण्यासाठी ‘आयआयटी’मध्ये दोन आठवडे निवास आणि शिक्षणाची संधी देणे, सकाळी विज्ञान विषयातील घटकांवर व्याख्यान आणि दुपारी त्या व्याख्यानांवर प्रयोग करणे, असे स्वरूप असते. इथे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते. त्यांच्या मनात ठसवले जाते की, तुम्हीसुद्धा तुमच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन करू शकतात. हे सगळे का? तर शहर, ग्रामीण किंवा गरीब, श्रीमंत असा भेद न करता, होतकरू विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यात काही तरी नवे करण्याची जिद्द निर्माण व्हावी म्हणून! ‘आयआयटी’पूर्वी डॉ. संतोष ‘मद्रास आयआयटी’मध्ये कार्यरत होते. मद्रास आणि मुंबई या दोन्ही ‘आयआयटी’मध्ये त्यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून पुरस्कृत केले गेले आहे.



डॉ. संतोष यांची मेहनत आणि देश, समाजासाठी कार्य करण्याचे विचार हे महत्त्वाचे आहेत. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते. डॉ. संतोष यांच्याबाबतीतही हे मान्य करावेच लागेल. घारपुरे घराणे हे मूळचे कासा, पालघर जिल्ह्याचे. १९३०साली डॉ. संतोष यांच्या आजोबांनी कासा गावात भिक्षुकी सोडून व्यवसाय करायला सुरुवात केली. त्यांनी दुकान थाटले. त्यानंतर संतोष यांचे पिता जनार्दन यांनीही व्यवसायातच लक्ष घातले, तर संतोष यांची आई सुनंदा यासुद्धा अत्यंत कार्यप्रवीण गृहिणी. संतोष लहानपणापासून हुशार. संतोष चौथी आणि सातवीला स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झाले. दहावीला ते मेरीटमध्ये आले. राज्यात १७वे आले. हे यश प्रचंड मेहनतीचे आणि अभ्यासाचे होते. यावेळी जनार्दन यांनी संतोष यांचा अभ्यास घेतला होता. त्यावेळी जनार्दन यांनी ‘अपयश मरणाहून वोखटे’ हा धडा संतोष यांना शिकवला. शिकवताना ते संतोष यांना म्हणाले की, “पानिपतच्या लढाईत प्रतिकूल परिस्थिती पाहून काही सैनिक परत फिरावे असे म्हणत होते. त्यावेळी सदाशिवभाऊ म्हणतात, परिस्थितीला पाठ फिरवून पळणे हे अपयश आहे. जीत किंवा हार हे ठरलेले आहे. पण, लढण्याआधी पळणे हे अपयश आहे. हे अपयश मरण्यापेक्षाही वोखटे म्हणजे वाईट आहे.” या क्षणाने संतोष यांना एकच शिकवले की, कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न केल्याशिवाय हार मानायची नाही.

दहावीनंतर त्यांनी ‘बीएसी’ करायचे ठरवले. त्यामुळेच दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ते ठाण्याला त्यांच्या काकांकडे आले. त्यांचे आधीचे शिक्षण मराठीतून झाल्याने महाविद्यालयातले इंग्रजी माध्यमातले शिक्षण पहिले सहा महिने तरी कळाले नाही. पण, मनात एकच प्रेरणा होती अपयश मरणाहून वोखटे. त्यांनी यावरही मात केली. पुढे ‘एमससी’साठी त्यांनी ‘आयआयटी’मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी तिथे ते धरून २७ विद्यार्थी होते. ‘एमएससी’नंतर ‘पीएच.डी.’साठी २५ विद्यार्थी परदेशी गेले. पण, संतोष ‘पीएच.डी.’साठी बंगळुरूला गेले. या सगळ्या काळात त्यांच्या मनात हेच होते की, ‘माझ्या क्षेत्रात मी असे काम करीन की समाज आणि देशाचे नाव उंच करेन. संतोष देशप्रेमी आणि समाजनिष्ठ असणे यात काही नवल नाहीच.’ कारण, त्यांचे वडील म्हणत की, ‘देशात देशासाठी आणि समाजासाठी त्याग करणारी आणि कार्य करणारी एकच संघटना आहे, ती म्हणजे रा. स्व. संघ.’ त्यावेळी घारपुरेंच्या घरी विनायक कुलकर्णी नावाचे प्रचारक यायचे. पुढे साठे, नितीन कुलकर्णी हे प्रचारकही यायचे. तसेच मुकंदराव काणे ते अप्पा जोशी यांच्याशीही घारपुरे कुटुंबीयांचा स्नेह. या सगळ्या प्रचारक आणि संघ स्वयंसेवकांचे जगणे संतोष यांनी अगदी जवळून पाहिलेले. संतोष हे संघ स्वयंसेवक. संतोष सांगतात की, “लहानपणी एक बातमी आली की, अप्पा जोशींवर कुणीतरी प्राणघातक हल्ला केला. अप्पा जोशी तर अत्यंत निःस्वार्थी आणि निरलसपणे समाजाची सेवा करायचे. प्राणघातक हल्ला होऊनही त्यांनी त्यांचे समाजकार्य सोडले नाही. मीसुद्धा माझ्या आयुष्यात ठरवले आहे की, प्रत्येक स्तरातील विद्यार्थी हा विज्ञानक्षेत्रात पुढे यावा यासाठी कार्य करायचे. कितीही बाधा आली तरी मागे सरायचे नाही. कारण, अपयश मरणाहून वोखटे.”

कार्बनी रसायनशास्त्रात अमूल्य योगदान देऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत असलेले डॉ. संतोष घारपुरे. विज्ञान क्षेत्रासोबतच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वाचे आहे. ‘बी टेक’, ‘एमएससी’ व ‘पीएच.डी.’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अनेक कंपन्यांसोबत मार्गदर्शक सल्लागार म्हणून काम, सरकारच्या अनेक शैक्षणिक उपक्रमांत मार्गदर्शन, ‘स्टार्ट अप’ची स्वप्न पाहणार्‍या तरुण पिढीला मार्गदर्शन, अशा विविध पातळ्यांवर त्यांचे समाजकार्य अविरतपणे चालू आहे. त्यांच्या या भरघोस यशाबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे अनेक शुभेच्छा.

@@AUTHORINFO_V1@@