स्टीलच्या संरक्षक कठड्यांमुळे ‘मरिन ड्राईव्ह’ सौंदर्यीकरणास बाधा

    15-Mar-2021
Total Views |

marine drive_1  



स्थानिक व पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी


मुंबई: गुप्तचर यंत्रणांच्या दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या इशार्‍यानंतर पालिकेने ‘मरिन ड्राईव्ह’ येथे संरक्षक कठडे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम हाती घेताना तेथील सौंदर्यीकरणासदेखील बाधा येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 
 
 
 
मुंबईच्या समुद्र किनार्‍याच्या सर्वाधिक आकर्षणाचा बिंदू असलेल्या ‘मरिन ड्राईव्ह’कडे पालिकेकडून सुरक्षेच्या कारणांवरून स्टीलचे संरक्षक कठडे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबईत ‘२६/११’ हल्ल्यावेळी समुद्रमार्गाचा वापर करून दहशतवादी शहरामध्ये शिरले. त्यानंतर वारंवार सागरी सुरक्षेविषयी सतर्कता दाखविण्यात येत आहे. त्याचधर्तीवर ‘मरिन ड्राईव्ह’ भागातील किनार्‍यालगत समांतर असलेल्या मार्गावरुन चालणार्‍यांसाठी धोका उद्भवू शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला. त्याची दखल घेत पालिकेने ‘मरिन ड्राईव्ह’ येथे स्टीलचे संरक्षक कठडे उभारण्याचे ठरविले असून त्याचे काम सुरू करण्यात आल्याने पुढील कालावधीमध्ये संपूर्ण ‘मरिन ड्राईव्ह’वर कठडे बसविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
 
 
 
 
‘मरिन ड्राईव्ह’ येथे जोडणार्‍या रस्त्यांवरून वाहनांमधून तिथल्या पादचार्‍यांना लक्ष्य केले जाउ शकते, या दृष्टीने कठडे बांधले जात आहे. त्यामुळे, पादचार्‍यांच्या सुरक्षेचा हेतू साध्य होऊ शकतो, असे पालिका अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी स्थानिकांनी या ठिकाणच्या सौंदर्यीकरणास बाधा येण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘मरिन ड्राईव्ह’ हा भाग पुरातन वारसा अंतर्गत येतो. पुरातन वारसा अंतर्गत येणार्‍या वास्तूंमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी ‘मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन समिती’ची (एमएचसीसी) मंजुरी आवश्यक असते. पालिकेने हे काम करण्यापूर्वी समितीची परवानगी घेतली आहे. या ठिकाणी कठड्यांची उंची किमान राहणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा भाग असतानाच सुविधा, सौंदर्यीकरणास बाधा येऊ नये, असा आग्रह स्थानिकांनी उपस्थित केला आहे.