मुंबई : भारतामध्ये येत्या काही दिवसातच इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची सुरुवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेचे समालोचन इतर भाषांप्रमाणे मराठीतही असावे, असा इशारा मनसेने नोव्हेंबर २०२०मध्ये स्टार इंडियाला पत्र लिहून दिला होता. त्यावर आता स्टार स्पोर्ट्सने अधिकृतरीत्या पत्र लिहित मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर आयपीएलचे मराठी समालोचन ऐकायला मिळणार आहे.
आयपीएल सामन्यांचे समालोचन हे मराठीत व्हावे, यासाठी नोव्हेंबर २०२०मध्ये मनसे पक्षातर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. हिंदी, तेलगु, कानडी, बंगाली अशा भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन होते. पण, मराठीमध्ये का नाही? असा प्रश्न मनसेने स्टार इंडियाला विचारला होता. याबद्दल मनसेकडून पाठपुरवा केला जात होता. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे ही मागणी पूर्ण होण्यास थोडा उशीर झाला. मात्र, येत्या आयपीएल २०२१मध्ये मराठीत समालोचन होणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.