लांगुलचालनामुळेच दंगली!

    15-Mar-2021
Total Views |

agralekh_1  H x


भैंसामध्ये एकाएकी दुचाकीस्वार आणि पादचार्‍यातील वादामुळे हिंदू-मुस्लीम हिंसाचार पसरण्याची स्थिती का उद्भवली? दंगल माजवण्याची हिंमत संबंधितांकडे कुठून आली? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे उत्तर वर्तमानात नव्हे, तर तेलंगण सरकार आणि तेलंगण पोलिसांकडून मुस्लीम पंथियांना दिल्या जाणार्‍या विशेष वागणुकीतून मिळते.



तेलंगणच्या निर्मल जिल्ह्यातील भैंसा नगरपालिका क्षेत्रात-महागावात रविवार, दि. ७ मार्च रोजी उसळलेल्या दंगलीची धग अजूनही शमताना दिसत नाही. इथे अजूनही इंटरनेट सेवाबंदीसह जमावबंदीचे ‘कलम १४४’ लागू करण्यात आलेले असून स्थिती तणावपूर्ण आहे. तत्पूर्वी एका आठवड्याआधी दुचाकीस्वार आणि पादचार्‍याच्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसन संपूर्ण शहरभर फैलावलेल्या हिंदू-मुस्लीम हिंसाचारात झाले. दगडफेकीसह यावेळी परिसरात जाळपोळ करण्यात आली आणि त्यात दोन घरांसह नऊ वाहनांचे नुकसान झाले, तर पत्रकार व पोलिसांसह दहा जण जखमी झाले. एकूण घडामोड आणि त्यानंतर मुख्य प्रवाहातील स्थानिक, राष्ट्रीय व इंग्रजी माध्यमे आणि तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी धेंडांनी बाळगलेले सूचक मौन पाहता, भैंसामधला प्रकार नेमका कोणी केला असेल, याचे उत्तर सहज मिळते.अन्यथा, आतापर्यंत वरील सर्वच मंडळी हिंदू, हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप, रा. स्व. संघाच्या विरोधात थयथयाट करताना दिसले असते. पण, तसे काहीही झाले नाही व यावरूनच भैंसात दंगल पसरवली कोणी, हे लक्षात येते आणि महत्त्वाचे म्हणजे, यात खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली, तर हिंसाचारानंतर घटनास्थळी पीडितांना भेटण्यासाठी निघालेल्या भाजप खासदार सोयम बापू राव आणि धर्मपुरी अरविंद यांना पोलिसांकडून रोखण्यात आले, नजरकैद केले. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भैंसातील दंगलीबद्दलची माहिती दिली. मात्र, भैंसामध्ये एकाएकी दुचाकीस्वार आणि पादचार्‍यातील वादामुळे हिंदू-मुस्लीम हिंसाचार पसरण्याची स्थिती का उद्भवली? दंगल माजवण्याची हिंमत संबंधितांकडे कुठून आली? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे उत्तर चालू वर्तमानात नव्हे, तर भैंसात आतापर्यंत घडलेल्या दंगल, हिंसाचार, अराजकी कारवायांत तसेच तेलंगण सरकार आणि तेलंगण पोलिसांकडून मुस्लीम पंथियांना दिल्या जाणार्‍या विशेष वागणुकीतून मिळते.

२००८ साली भैंसामधील मशिदीपुढे हिंसाचाराला सुरुवात झाली होती. त्यावेळी दुर्गापूजेच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली आणि एकाएकी दंगल उसळली. त्यानंतर भैंसामध्ये हिंदू-मुस्लिमांत सातत्यपूर्ण हिंसाचाराचा सिलसिलाच सुरूच राहिला. गेल्यावर्षी १२ जानेवारी रोजी रात्री दोन्ही समुदायात दंगल उद्भवली. त्यावेळी ‘इज्तेमा’साठी जमलेल्या गर्दीतील धर्मांध मुस्लीमपंथीय युवकांनी रात्रीच्या वेळी सायलेन्सरशिवाय दुचाक्या चालवल्या व त्याच कर्कश आवाजाला हिंदूंनी विरोध केला. त्यानंतर झालेल्या वादातून जिहाद्यांकडून १८ हिंदूंच्या घरादाराला तोडफोड करत आग लावली गेली, तर २४ दुचाक्या, एक रिक्षा आणि एक कारही त्यांनी जाळली व यात १९ जण जखमी झाले. त्याचवर्षी १० मे, २०२० रोजी भैंसामध्ये हिंदू-मुस्लिमांत हिंसाचाराला सुरुवात झाली. नशा करून प्रार्थनास्थळात घुसलेल्या व्यक्तीमुळे आधी वादावादी झाली आणि नंतर त्याचे पर्यवसन दंगलीत झाले. दगडफेक, हाणामारी आणि पुढे हिंसाचार पसरला आणि त्यातही अनेक जण जखमी झाले.

दरम्यान, जानेवारीत उद्भवलेल्या दंगलीने होरपळलेल्या विस्थापित हिंदूंच्या निवार्‍यासाठी ‘सेवा भारती’ने पुढाकार घेतला व घरबांधणीला सुरुवात केली होती. तथापि, तेलंगण सरकार आणि तेलंगण पोलिसांनी या प्रत्येक प्रकारावेळी हिंदूंना दडपण्याचे आणि मुस्लिमांना चुचकारण्याचेच काम केले, असे दिसते. कारण, तसे नसते तर भैंसामध्ये एकामागोमाग हिंदूविरोधी दंगली उसळल्या नसत्या आणि हिंदूविरोधी कुकृत्यांची पुनरावृत्ती झाली नसती. पण, तसे झाले व यात तेलंगण राष्ट्र समितीने एमआयएमला पुरेपूर साथ दिली.तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची ओळख कट्टर हिंदूविरोधक आणि मुस्लिमांचे वारेमाप लांगुलचालन करणारी व्यक्ती अशीच आहे. मुस्लीम मतपेढी गमावू नये म्हणून रमजानमध्ये मुस्लिमांना भेटवस्तू देण्यापासून ते मुस्लिमांना १२ टक्क्यांपर्यंत आरक्षणाचा वायदा करेपर्यंत, त्यांनी अनेक दाढी कुरवाळू पावले उचलली. परिणामी, राज्यातील मुस्लीम समुदायालादेखील आपण इतरांपेक्षा किंवा हिंदूंपेक्षा विशेष असल्याचे वाटणे साहजिकच. त्यातच तेलंगणचे गृहमंत्रिपद मेहमूद अली यांच्याकडे आहे आणि त्यांच्या मनात आपल्या समुदायाबद्दल आपुलकीची भावना आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येतो. सोबतच असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमकडून मुस्लीमहितैषी भडक राजकारण केले जाते. मुस्लिमांची मते फक्त आपल्याच पक्षाला मिळावीत, अशीच ओवेसींची व त्यांच्या पक्षाची धारणा असते. अशा परिस्थितीत तेलंगण राष्ट्र समिती व एमआयएममध्ये कोण सर्वाधिक मुस्लीम मते मिळवते, याची स्पर्धा लागते आणि त्यातूनच धर्मांध मुस्लिमांकडून होणार्‍या हिंसक कारवायांना पाठीशी घातले जाते, तर दोन्ही पक्षांच्या या मुस्लीमप्रेमी भूमिकेमुळे इथल्या मुस्लिमांत आमच्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही, होणार नाही, अशी भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.


भैंसामध्ये वारंवार होणार्‍या हिंदूविरोधी दंगली, हिंसाचारामागे हे एक कारण आहे. जर के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने दंगलखोरांविरोधात कठोर कारवाई केली असती, तर त्यांची सारखा सारखा हिंसाचार माजवण्याची हिंमतच झाली नसती. आणखी एक मुद्दा म्हणजे, भैंसा नगरपालिकेत एमआयएमची सत्ता असून भाजप खासदार धर्मपुरी अरविंद यांनी केलेल्या आरोपानुसार मुस्लीम समुदायाकडून इथे जमिनी बळकावण्याचे, जमिनीवर कब्जा करण्याचे प्रकार घडत आहेत, तर त्याविरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंचा सूड एमआयएमचे नेते-कार्यकर्ते घेतात, तसेच पोलीसही हिंदूंच्या तक्रारीची दखल न घेता केवळ मूकदर्शकाची भूमिका निभावतात. परिणामी, तेलंगण राष्ट्र समिती व राज्य सरकार, एमआयएमच्या मुस्लीम मतपेढीच्या लालसेने मिळालेले मोकळे रान, पोलिसांच्या कारवाई करण्याबाबतच्या उदासीनतेमुळे भैंसा शहरात सातत्याने हिंदूविरोधी दंगली, हिंसाचार माजवला जातो. असे केल्याने परिसरातील हिंदूंनी पलायन करावे, असाही त्यांचा हेतू असू शकेल. अर्थात, हिंदूंविरोधात जे षड्यंत्र काश्मीरपासून कैरानापर्यंत आणि मुंबईच्या मालवणीतही अमलात आणले जाते, तेच भैंसातही करण्याची धर्मांधांची योजना असावी. भाजपकडून याला विरोध केला जात आहेच; पण स्थानिक जनतेनेही आपले हित जपणार्‍यालाच पाठिंबा द्यायला हवा, तरच हिंदूंविरोधातील कुटील कारस्थाने धुळीस मिळू शकतील.