मुंबई : रविवारी विविध कामांसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर, तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक घेण्यात येत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हार्बर मार्गावरील कुर्ला - वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी-बेलापुर-पनवेलसाठी जाणाऱ्या लोकल सेवा बंद राहणार आहेत. तर पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल बंद राहणार आहेत. दरम्यान, दुरुस्तीच्या कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान लोकल सेवा सुरु राहणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
पश्र्चिम रेल्वे मार्गावर मरीन लाइन्स - माहीम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी व माटुंगा रोड या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. दुरुस्तीच्या कालावधीत काही लोकल उशिराने धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.