लाॅकडाऊन वर्षातही मुंबईत ध्वनीप्रदूषणामध्ये वाढ

    13-Mar-2021
Total Views |

sound pollution_1 &n


२०२० मध्ये मुंबईत ध्वनीप्रदूषण निश्चित मर्यादेच्या पार

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्यावर्षी मुंबईत पाच महिने लाॅकडाऊन असूनही ध्वनी प्रदूषणाची पातळी ही निश्चित मर्यादेपेक्षा उच्चतम नोंदविण्यात आली आहे. 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा'ने (सीपीसीबी) २०२० मध्ये केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या तपासणीतून ही माहिती समोर आली. या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत हा अहवाल मांडण्यात आला. मुंबईत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ध्वनीप्रदूषणामध्ये घट झाली असली, तरी ते निश्चित मर्यादेपेक्षा अधिक आहे.

देशातील सात राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या मदतीने 'सीपीसीबी' दरवर्षी सात मोठ्या शहरातील ध्वनीप्रदूषणाची तपासणी करते. यासाठी देशभरात ७० ठिकाणी स्वयंचलित ध्वनीमापक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईमध्ये प्रत्येकी २० यंत्रणा कार्यान्वित आहेत. याअंतर्गत २०२० मध्ये केलेल्या तपासणीत सकाळच्या वेळी हैदराबाद आणि रात्रीच्या वेळी दिल्लीमध्ये ध्वनीप्रदूषणाची पातळी सर्वोच्च असल्याचे नोंदविण्यात आले आहे. हैदराबादमधील कुक्काटपल्ली येथे सकाळच्या वेळी ध्वनीप्रदूषणाची पातळी ७७ डीबी होती, तर दिल्लीतील आयटीओ परिसरात रात्रीच्या वेळी ध्वनीप्रदूषण ७७ डीबी नोंदविण्यात आले.
 
 
मुंबईमध्ये ठाणे-चेंबूरमधील रहिवासी परिसरात, वाशी हाॅस्पीटल-अस्लफा या शांतता क्षेत्रात, वांद्रे-एमपीसीबी मुख्यालय-सीएसटीएम येथील व्यावसायिक क्षेत्रात आणि कांदिवली-अंधेरी-एल अॅण्ड टी पवई या औद्योगिक परिसरात तपासणी करण्यात येते. २०२० मध्ये सकाळच्या वेळीतील सर्वात जास्त आवाजाच्या सरासराची नोंद अंधेरी आणि सीएसएमटी परिसरात नोंदविण्यात आली. त्यावेळी या परिसरात आवाजाची पातळी ७२ डीबी होती. शिवाय रात्रीच्या वेळी अंधेरीतील औद्योगिक परिसरात आवाजाची पातळी सर्वोच्च म्हणजेच ७० डीबी होती. २०१९ साली अंधेरी परिसरामध्येच सकाळी (७९ डीबी) आणि रात्रीच्या (७८ डीबी) वेळेची आवाजाची पातळी ही सर्वाधिक नोंदविण्यात आली होती. २०२० मधील पाच ते सहा माहिने हे लाॅकडाऊनमधील शांततेत जाऊनही मुंबईत ध्वनीप्रदूषणाची पातळी ही विहित मर्यादेपेक्षा उच्च नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील ध्वनीप्रदूषणाच्या उगम स्त्रोताचा शोध आवश्यक आहे.

ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादेचे मानक

क्षेत्र                             सकाळची मर्यादा              रात्रीची मर्यादा
                                      (डीबी मध्ये)                    (डीबी मध्ये)
 
रहिवासी                                 ५५                                ४५
व्यावसायिक                            ६५                                ५५
औद्योगिक                                ७५                                ७०
शांतता                                      ५०                                 ४०