द्रष्टा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2021   
Total Views |
Prabodh Thakkar_1 &n
 
 
२०२० हे वर्ष संपूर्ण जगासमोरच आव्हानात्मक आणि संघर्ष उभे करणारे ठरले. त्याला कारणीभूत ठरली ती ‘कोविड-१९’ची महामारी आणि त्यापासून बचावासाठी लागू करण्यात आलेले ‘लॉकडाऊन.’ या संकटकाळात उद्योगविश्वालाही अशाच अनेकविध आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, या संकटातून संधी निर्माण करून, गेली ६० वर्षे अविरत कार्यरत असलेल्या ‘ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे अध्यक्ष प्रबोध ठक्कर यांच्या नेतृत्वाने तग धरून उभे कसे राहायचे, याचे एक मूर्तिमंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे. त्याचीच ही यशोगाथा...


प्रबोध ठक्कर हे उद्योगजगतातील एक विश्वासाचे आणि आघाडीचे नाव. उद्योगातील आदर्श मानाव्या, अशा दिग्गज कंपन्यांपैकी एक ‘ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी ‘कोविड’काळातील मोठी आव्हाने पेलली. एकूण दोन हजार समाधानी ग्राहकवर्ग असलेल्या आणि कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या कंपनीलाही कोरोनाची झळ बसली. मात्र, या सर्व संकटातून तावून-सुलाखून बाहेर पडत, नवे उदाहरण त्यांनी उद्योगविश्वापुढे ठेवले. याचे श्रेय कंपनीच्या व्यवस्थापनाला, नेतृत्वाला आणि मार्गदर्शक व संपूर्ण टीमला द्यावे लागेल. १९७३ मध्ये स्थापन झालेली ‘ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.’ ही कंपनी गेल्या पाच दशकांमध्ये ‘ग्रोथ विथ गव्हर्नन्स’ या त्यांच्या ब्रीदवाक्यानुसार सेवा देत आली आहे. ‘ग्लोबल’तर्फे विमाक्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन, कॉर्पोरेट विमा, रिटेल ब्रोकिंग, कन्सल्टन्सिंग आदी सेवा ही कंपनी देते. कोरोना काळात या सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू राहव्यात, यासाठी एक सुसज्ज अशी यंत्रणा तयार करण्यात आली. महामारी काळात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजीही घेण्यात आली.
 
 
 
संपूर्ण देशभरातील कार्यालयांमध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येते. ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत देण्यात आली होती. हा काळ खूप भीतिदायक होता. कोरोना रुग्णांची आकडेवारी, जगभरात सुरू असलेले मृत्यूचे थैमान, यात कर्मचाऱ्यांना एक मानसिक आधाराची आणि धीराची आवश्यकता होती. कोरोनाबद्दलची खबरदारी, लक्षणे आढळल्यावर वैद्यकीय सल्ला घेण्याची सोयही कंपनीतर्फे कर्मचारी व कुटुंबाला करून देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा वेगळा ताण जाणवला नव्हता. घरी राहून काम करण्याच्या प्रक्रियेमुळे येणारे कामातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न कंपनीतर्फे करण्यात आला. त्यासाठी कंपनीने विशेष व्यवस्था केली होती. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहावेत, यासाठी पाहणी करणारी एक टीम नेमण्यात आली होती. आपल्या कामाचा परिणाम कुठे ग्राहकांवर होऊ न देण्याचा निश्चय व्यवस्थापनातर्फे करण्यात आला होता. ‘वर्क फ्रॉम होम’ करत असतानाही ग्राहकांनाही तीच सेवा मिळावी, यासाठी कर्मचारी तैनात होते. अद्यापही कर्मचारी याच पद्धतीने कार्यरत आहेत. देशभरातून सुरू असलेल्या या कंपनीला पूर्णपणे कार्यक्षम बनविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुरेपूर मेहनत घेतली.
 
 
 
Prabodh Thakkar_1 &n
 
 
 
कोरोना काळ म्हटले की, ‘लॉकडाऊन’ आणि २०२० हे वर्ष साऱ्यांना कल्पनेच्या बाहेर एक नवी अनुभूती देणारे ठरले. कोरोनाची सुरुवात जरी २०१९ या वर्षात झाली होती, तरीही त्याला महामारीचे स्वरूप हे २०२० या वर्षात प्राप्त झाले. एका छोट्या विषाणूने अवघ्या जगाला धारेवर धरले. त्यामुळे या महामारीच्या परिणामाला जगाप्रमाणे देशालाही सामोरे जावे लागले, अर्थात ‘ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.’ ही कंपनीदेखील त्याला अपवाद नव्हती. मात्र, यातूनच शिकायचे कसे, नव्या आव्हानांचा सामना कसा करायचा, हा धडा घेऊन सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याचे कंपनीने ठरवले. परिस्थितीच्या एक पाऊल पुढे राहण्याची तयारी असणाऱ्या प्रबोध ठक्कर यांनी ‘जनता कर्फ्यू’ आणि ‘लॉकडाऊन’च्या आधीच ‘होम वर्क’ पूर्ण केला होता. ‘लॉकडाऊन’जाहीर झाल्यानंतर त्यानुसार कार्यप्रणालीत बदल करण्यापेक्षा त्यांनी कर्मचाऱ्यांना एका नव्या आव्हानांसाठी सुसज्ज राहण्यासाठी मार्गदर्शन केले. दि. २२ मार्च, २०२० म्हणजे ‘जनता कर्फ्यू’ आणि ‘लॉकडाऊन’पूर्वीच ‘ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.’चे सर्व कर्मचारी सुसज्ज होते. फायनान्स, आयटी, एचआर आदी विभागांसह आणि संपूर्ण टीमने या आव्हानांवर मात केली. येणारी आव्हाने, संकटे यांची माहिती कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात आली. ‘कोविड’ काळात घ्यावी लागणारी सुरक्षा, त्यातूनही काम सुरू ठेवण्याची प्रेरणा कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखून पूर्वीपेक्षा अधिक जोमाने या संकटाचा सामना केला. अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्यावर ठक्कर आणि व्यवस्थापनातर्फे सर्व कर्मचाऱ्यांना कौतुकाची थापही मिळाली. अजूनही कोरोनाचा संघर्ष सुरू आहे. अनेक कर्मचारी ‘कोविड योद्ध्यां’प्रमाणे आपले ध्येय गाठण्याची धडपड करत आहेत. या काळात स्वतःला सिद्ध करून, आदर्श नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण ठक्कर यांनी सर्वांसमक्ष ठेवले आहे.
 
 
‘ग्रोथ विथ गव्हर्नन्स’ या कंपनीच्या ब्रीदवाक्यानुसार, समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून कंपनीने ‘सीएसआर’ उपक्रमही राबविले. कोरोना काळात गरजूंना उपयोगी वस्तूंसाठी जमेल त्या पद्धतीने आर्थिक मदत केली. ‘एका हाताने केलेले दान हे दुसऱ्या हाताला कळू नये’ अशीच या कंपनीची तत्त्वे आहेत. कर्मचाऱ्यांनीही तीच अवलंबली. कोरोना काळातील केलेल्या मदतीचा उल्लेख नको, असा आग्रह ठक्कर यांनी यावेळी केला, हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. कोरोनाने आपल्या सर्वांना गेल्या नऊ महिन्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. अचानक लागू झालेले ‘लॉकडाऊन’, त्याचे बरे-वाईट परिणाम साऱ्यांनी पाहिले, अनुभवले. सरकारतर्फे आवश्यक त्या उपाययोजनाही लागू केल्या जात होत्या. कंपन्यांना अटी-शर्तींवर परवानगी दिली जात होती. कर्मचाऱ्यांची मर्यादित उपस्थिती आणि इतर गरजा ओळखून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवायचे होते. ही आव्हाने पूर्ण करण्यात कंपनीला यश मिळत होते. अजूनही परिस्थिती निवळलेली नाही. संकटे आजही तीच आहेत. अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. कोरोना लसीकरण मोहीम सुरू होत आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचविण्याची तयारी सरकार करत आहे. देशातील फार्मा कंपन्यांनीही यावेळी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला आघात सुधारण्याची संधी आता प्रत्येकाला आहे. उद्योजकांना कोरोनामुळे नव्या संधी उपलब्ध होत आहेत, असे भविष्य ठक्कर यांनी पाहिले आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्वीपेक्षा वेगाने रुळावर येईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे भविष्यातील नव्या संधी शोधण्याची तयारीही त्यांनी केली आहे.
 
 
"कोरोना काळात आलेल्या संकटांनी जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. कोरोना महामारी आणि संकटांनी नव्या गोष्टी शिकण्याची संधी दिली. काही नकारात्मक अनुभव आले. मात्र, त्यातूनही सावरून नव्या वाटा शोधू शकलो."
 
 
@@AUTHORINFO_V1@@