जिद्दीपुढे आकाश ठेंगणे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Vinod Agrawal_1 &nbs
 
 
 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. या ‘लॉकडाऊन’मुळे अनेक उद्यमी, लघु उद्योजक तसेच ‘एमएसएमई’ क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योजकांसमोरही व्यवसाय टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. शिवाय कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताचाही मोठा प्रश्न निर्माण झाला. मात्र, या संकटाशी दोन हात करत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आरोग्याची खबरदारी घेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, ग्राहकांना उत्तम सेवा बहाल करणाऱ्या ‘एस टेक्नोलॉजी’चे संचालक विनोद अग्रवाल यांचा कोरोना काळातील यशस्वी लढा जाणून घेऊया.
 
‘एस टेक्नोलॉजी’ ही ‘ई-ऑफिस’ क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक कंपनी. या कंपनीची स्थापना २००६ मध्ये डिजिटल स्वाक्षरीच्या क्षेत्रातील सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून झाली. आज या कंपनीच्या देशभरात सात शाखा कार्यरत आहेत. जीएसटी, आरओसी, पीएफ, ई-टेंडरिंग, बँका, ऑफिस, कॉर्पोरेट इ.साठी डिजिटल स्वाक्षऱ्या पुरविणे, एसएसएल प्रमाणपत्रे (SSL certificate) जी वेबसाईट सुरक्षित करण्यासाठी लागतात, तसेच ई-फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी उपयोगात येतात. यासह ‘पीकेआय तंत्रज्ञान’ तसेच ‘ई-ऑथेंटिकेशन’ व ‘ई-सिक्युरिटी सोल्युशन’ आदी सेवा ही कंपनी पुरविते. देशभरातील बँका, एमएसएमई सेक्टर, राज्य सरकार, केंद्र सरकार, रेल्वे, संरक्षण, कॉर्पोरेट इ. क्षेत्रांना ‘एस टेक्नोलॉजी’ सेवा पुरविते. मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ‘लॉकडाऊन’नंतर लगेच काय घडेल, हे कोणालाही माहिती नव्हते. कोरोनाचा वाढता फैलाव आणि ‘लॉकडाऊन’मुळे मानसिक तणाव वाढत होता. अशावेळी व्यवसाय टिकतात का? जागतिक संकट पाहता नोकरी कायम राहील की नाही, याची काळजी सर्वच कर्मचाऱ्यांना होती. पूर्णतः चार भिंतींच्या आतून काम करणे भाग होते. अशावेळी आपले भविष्य काय? घरातून कसे काम करावे? कुरियर सुविधा नाही, वाहतूक नाही, असे असंख्य प्रश्न अग्रवाल यांच्यासमोर होते. या काळात विनोद अग्रवाल व त्यांची संपूर्ण टीम घरीच होती.
 

 
अशावेळी अग्रवाल यांनी ठरवले की, जिथे जग थांबलेय, तिथूनच आपण सुरुवात करायची. या आपत्तीनंतर पुन्हा एकदा जग सुरू होणार, देश सुरू होणार. अशावेळी आपला उद्योग अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन केले पाहिजे. हा प्राधान्यक्रम ठरवत असताना कंपनीतील कर्मचारी जे अग्रवाल यांच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत, त्यांना नोकरी किंवा पगाराची चिंता करू नका, असे आश्वासन देऊन, अग्रवाल यांनी त्यांचे मार्गदर्शन केले. ‘लॉकडाऊन’मध्ये त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यावर अग्रवाल यांनी भर दिला. त्यांनी ठरविले की, सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवून त्यांना कामासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अग्रवाल यांनी कोणतीही कर्मचारी कपात न करता, ‘लॉकडाऊन’मध्येही २० टक्के कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करून घेतली. जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली व वेगवान सेवा पुरविणे शक्य होईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आणि घरूनदेखील त्यांनी अविरतपणे काम सुरूच ठेवले. यामुळे कंपनीतील ग्राहकांना डिजिटल स्वाक्षऱ्या देण्याबरोबरच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या ग्राहकांना तांत्रिक साहाय्य करणे अग्रवाल यांना अधिक सोयीचे झाले.
 
 
 
 
Vinod Agrawal_1 &nbs
 
 
नियोजनाची दुसरी बाजू म्हणजे, सर्व काही एक दिवस सुरू होईल, त्या दिवसाची वाट पाहत असतानाच, त्या दिवसासाठी स्वत:ला सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही तयारी केल्याचे अग्रवाल सांगतात. सर्व कल्पना आणि सूचनांसह कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने नियमित चर्चा करत ‘आपले घर, आपले कार्यालय’ बनवत वेगवान आणि कोणत्याही समस्यांशिवाय काम करण्यावर अग्रवाल यांनी भर दिला. काही कर्मचाऱ्यांना घरी वैयक्तिकरीत्या अग्रवाल यांनी लॅपटॉप पोहोचविले. अशा रीतीने कामाचे उत्तम नियोजन अग्रवाल यांनी केले. आता कामाचे नियोजन तर झाले होते. मात्र, बाजार बंद होता. अशावेळी आव्हान होते ते मागणी नेमकी कुठे आहे, ते ओळखण्याचे. कुठे आणि काय सुरू होणार आहे, याची माहिती अग्रवाल यांनी घेतली. कोणाला आपली उत्पादने व सेवा हव्या आहेत, याचा अभ्यास अग्रवाल यांनी सुरू केला. या काळात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, महापालिका, स्थानिक संस्था, रेल्वे, पीएसयू, संरक्षण इत्यादी केंद्र आणि विविध राज्य सरकारांना त्यांच्या प्रकल्प, ई-टेंडरिंग, ई-ऑफिस इत्यादींसाठी डिजिटल स्वाक्षऱ्यांची तातडीने गरज होती. सर्वांचेच काम घरून सुरू होते म्हणून ग्राहकांना वितरण, तांत्रिक साहाय्य आवश्यक होते. यातील बरेच जण आधीपासूनच आमचे ग्राहक होते.
 

अग्रवाल यांनी त्यांच्याशी बोलणी करून वेगवान होम डिलिव्हरीची हमी दिली, जेणेकरून त्यांचे काम कायम राहिले. स्वत: अग्रवाल यांनी खासगी टोकन अत्यावश्यक सरकारी सेवेंतर्गत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत घरपोहोच पोहोचविले. सर्व सरकारी कार्यालये डिजिटली चालविण्यासाठी अग्रवाल यांची सेवा आवश्यक होती. त्यामुळे ‘एस टेक्नोलॉजी’च्या वेगवान कार्यशैलीने राज्य सरकार व केंद्र सरकारकडून अग्रवाल व त्यांच्या टीमचे कौतुक होऊ लागले. कालांतराने बँका आणि आयटी सेवा सुरू झाल्या. त्यांनाही अग्रवाल यांच्या कंपनीने डिजिटल स्वाक्षऱ्या व सोल्युशन्स पुरविले. अग्रवाल व टीमचे कौशल्य आणि तांत्रिक माहितीमुळे डिजिटल स्वाक्षऱ्या वापरून या क्षेत्राचे कार्य सुरू ठेवण्यास मदत झाली. यावेळी या क्षेत्रासमोर कागदपत्रे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्याचे आव्हान होते. ही गरज ओळखून अग्रवाल यांनी काही सॉफ्टवेअर तयार केले. ज्यामुळे डिजिटल स्वाक्षरीसह ही कागदपत्रे मेलवरून हस्तांतरित करणे शक्य झाले. अशाप्रकारे कनेक्टिव्हिटी, डिलिव्हरी, पेमेंट्सच्या विविध आव्हानांवर मात करत उत्तम व्यवस्थापन आणि सांघिक कौशल्यामुळे ‘एस टेक्नोलॉजी’ने कंपनीच्या इतिहासातील विक्रीच्या सर्व नोंदी मोडीत काढत ‘लॉकडाऊन’ काळात विक्रमी नोंदी केल्या. आजही कंपनीचे अनेक कर्मचारी घरून काम करत आहेत, तर काही कार्यालयातून काम करत आहेत. या काळात अग्रवाल यांनी सामाजिक भान जपत आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसह इतर कंपन्यांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप केले. काही सामाजिक संस्थांच्या बरोबरीने अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी अन्नाचे पाकीट तयार करून त्यांचे गरजवंतांना वाटप केले. दरम्यान, कंपनीतील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली, तसेच अग्रवाल यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र, या सर्वांच्या पाठीशी विनोद अग्रवाल खंबीरपणे उभे राहिले. तसेच सर्व मित्रपरिवार व सहकारी या काळात धीराने अग्रवाल यांना साथ देत होते.
 
 
 
"‘कोविड’ काळानंतर आता एक नवीन जग अनेक संधी घेऊन उभे आहे. नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवे विचार आणि कौशल्ये जे आत्मसात करतील, ते यशस्वी होतील. काळाच्या पुढे जाऊन आम्ही विचार केला म्हणूनच या संकटातही आम्ही यशस्वी होऊ शकलो."


@@AUTHORINFO_V1@@