भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाकरे सरकाराला सवाल
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर ट्विट करत जोरदार निशाणा साधला आहे. अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला !” असा आरोप करत तुम्ही मराठा समाजासाठी काय केले?,” असा सवाल चंद्रकातदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
चंद्रकांतदादा पुढे म्हणतात,"मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली !सत्तांतर झाल्यांनतर भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन केले. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला.आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण १०२ व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वीचे आहे. आम्ही हे ठामपणे उच्च न्यायालयात मांडले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण या सरकारने सर्वोच्च न्यायालयात विषयाला फाटे फोडून मराठा आरक्षणात गोंधळ निर्माण केला." असाही आरोप पाटील यांनी केला.
तसेच, मराठा समाजाला आरक्षणासाठी मी आणि स्वतः देवेंद्रजी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहे. आतातरी ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावलं उचलावी व आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.