वाह रे ठाकरे सरकार..!

    13-Mar-2021
Total Views |

nilesh rane_1  



मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. एकीकडे एमपीएससीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्य नाही, परीक्षा वारंवार कोरोनाचे कारण देऊन परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत तर दुसरीकडे राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागून आज आठ महिने झाली तरीही उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा वर्ग एक आणि वर्ग दोनच्या ४२० भावी अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात येत नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी  महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.






ट्विट करत निलेश राणे म्हणाले," राज्यात सत्तेवर आल्यावर मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती, मात्र सव्वा वर्षात त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही, राज्यात मोठया प्रमाणावर पदे रिक्त असतानाही अर्थसंकल्पात साधा याबाबत उल्लेखही नाही, वा रे ठाकरे सरकार...", असे म्हणत निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.


२०१९ साली राज्यसेवेची परीक्षा झाली आणि तिचा निकाल हा जून २०२०साली लागला. त्यावेळी जवळपास ४२० यशस्वी विद्यार्थांची यादी जाहीर करण्यात आली. नियमाप्रमाणे दरवर्षी एक ऑगस्टला या बॅचला नियुक्ती देऊन ट्रेनिंगसाठी पाठवणे आवश्यक होते. पण कोरोनामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ४ मे २०२० साली राज्य शासनाच्या वतीनं एक जीआर काढण्यात आला आणि त्यात कोरोना काळात कोणालाही नियुक्ती देण्यात येऊ नये असे सांगण्यात आले. नंतरच्या काळात ९ सप्टेंबरला राज्यातील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आणि या पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न टांगणीवर पडला.