‘क्लीन स्वराज’ घडविणार्‍या उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2021   
Total Views |

swaraj _1  H x




नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला. या कोरोना काळातही अनेक महिलांनी सशक्तपणे देशाला हाताळलं. मग ते आरोग्य कर्मचारी असो, सफाई कर्मचारी असो किंवा घरातील गृहिणी असो. खर्‍या अर्थाने या संकटकाळात महिलांनी असामान्य कामगिरी केली. अनेक महिला तर अशा होत्या, ज्यांनी आपल्या पतीची नोकरी गेल्यावर घराची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. रस्त्यावर भाजीपाला, फळे अगदी वडापावसुद्धा विकला. पण, आपल्या घराला कोरोनापासून आणि कोरोना काळातल्या मंदीपासून सुरक्षित ठेवले. ‘त्या’ दोघीही अशाच लढवय्या उद्योजिका. दोघींनी कोरोना काळात मंदी अनुभवली, पण त्यातसुद्धा संधी शोधली आणि स्वत:चा व्यवसाय विस्तारला. या दोघी म्हणजे ‘क्लीन पेस्ट कंट्रोल’च्या कोमल नवरे आणि ‘स्वराज एंटरप्रायझेस’च्या निलांबरी गावडे-सावंत.
 
 
दादू नवरे आणि जयश्री नवरे हे दाम्पत्य जोगेश्वरीत राहायचे. दादू नवरे रिक्षा चालवायचे, तर जयश्रीताई या गृहिणी. या दाम्पत्यास तीन अपत्ये. दोन मुली आणि एक मुलगा. यातील मधली मुलगी म्हणजेच कोमल. कोमलचं सातवीपर्यंत शिक्षण जोगेश्वरीच्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. पुढे माध्यमिक शिक्षण जोगेश्वरीच्या स्वामी समर्थ विद्यालयात झालं. अकरावी-बारावी तिने जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ महाविद्यालयातून पूर्ण केलं. पुढील शिक्षण घेण्यापेक्षा घरी पैसे देणे गरजेचं होतं. त्यामुळे बारावीनंतर पुढे शिक्षण सुरु ठेवणं कोमलसाठी शक्य झालं नाही. नोकरी पण सहजासहजी मिळणं अवघडच होतं. सहा महिने काही नोकरी मिळाली नाहीच. शेवटी एका कंपनीमध्ये ‘टेलिकॉलर’ म्हणून नोकरी मिळाली.
 
ही कंपनी ‘पेस्ट कंट्रोलिंग’ची कंपनी होती. १५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर कोमल तिथे कामाला लागली. खरंतर ती एक डबघाईस आलेली कंपनी होती. मात्र, प्रशिक्षण घेतल्याने काम करणं अनिवार्य होतं. कसंतरी काम सुरू होतं. कित्येकदा तर पगारही मिळायचा नाही. अशा अवस्थेत सगळं चाललेलं. मात्र, कोमलचा एक स्वभाव, गुणधर्म होता तो म्हणजे संकटात सापडणार्‍याला हात द्यायचा, त्याला संकटातून बाहेर काढायचं. त्या कंपनीचे एक भागीदार होते. त्यांना कोमल म्हणाली की, “आपण कंपनीच्या वाढीसाठी काहीतरी करू. तुम्ही हार मानू नका. फक्त नवीन ग्राहक आणा.” श्रीधर यांनी एका जाहिरात कंपनीसोबत करार केला. जाहिराती येऊ लागल्या. परिणामी, ग्राहकसंख्या वाढली. अनेकदा तर असं होऊ लागलं की, तंत्रज्ञ कामावर न आल्याने कोमलच साईटवर जाऊन ‘पेस्ट कंट्रोल’चं तांत्रिक काम करू लागली.
 
सुरुवातीला ‘टेलिकॉलर’ म्हणून काम करणारी कोमल आता ‘पेस्ट कंट्रोलिंग’चं काम असलेल्या ठिकाणी स्वत: जाऊ लागली. सेल्स, मार्केटिंग, एचआर, अकाऊंटिंग अशी जवळपास सगळीच काम हाताळू लागली. हे सगळं करताना तिच्या मनात सहज विचार आला की, आपण हा व्यवसाय सुरू केला तर... ‘नोकरीतून गरजा पूर्ण होतात, स्वप्न नाही’ कोमलचं हे आवडतं वाक्य तिने प्रत्यक्षात उतरवायचं ठरवलं. व्यवसाय नेमका कोणता करायचा, हा प्रश्न होताच. मात्र, आपल्याला जे जमतं तेच करावं यावर ती ठाम होती. पेस्ट कंट्रोलिंगचा व्यवसाय करायचे तिने निश्चित केले. स्वत: साठवलेले पैसे आणि काही बाहेरुन उसने घेतलेले पैसे, असे पैसे एकत्र करुन तिने व्यवसाय सुरू केला. घरातून व्यवसाय करण्याला विरोध होता. ‘लग्न करायचं सोडून काय ही अवदसा आठवली’ असंच काहीसं घरच्यांचं म्हणणं. कोमल मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. जुन्या ओळखीतून तिला काही नवीन कामं मिळाली. पण, ती अगदीच नगण्य होती. सर्व आलबेल होतं असंही नाही. संघर्ष सुरूच होता. दरम्यान, पॅम्पलेट, व्हिजिटिंग कार्ड्स, बॅनर्स, ऑनलाईन मार्केटिंग हे सारं कोमल स्वत:च करत होती.
 
काही महिने तिला कामं मिळाली नाहीत. मग तिने मोफत आरोग्य चिकित्सा मोहीम सोसायट्यांमध्ये राबविली. त्याचा तिला फायदा झाला. काही कामं मिळाली. दरम्यान, कोरोना आला आणि कामं ठप्प झाली. मात्र, हार मानेल ती कोमल कसली! तिने या संकटातसुद्धा संधी शोधली. अनेक गृहनिर्माण सोसायट्या निर्जंतुकीकरण करून घेत असत. त्यासाठी इतर कंपन्या १५ हजार रुपये शुल्क आकारायच्या. तिथे कोमलची कंपनी सोसायटीतील एका विंगकरिता एक हजार रुपये आकारू लागली. अशा १५ सोसायटीच्या निर्जंतुकीकरणाचं काम तिने पूर्ण केलं. खरंतर यामुळे नफा झाला नाही. मात्र, ओळखी खूप झाल्या. ‘पेस्ट कंट्रोल’वाले येतात आणि पाणी मारून जातात, हा बहुसंख्य लोकांचा समज आहे. तो बदलण्याचा मानस ती व्यक्त करते.
 
 
कोरोना अवघ्या जगासाठी ‘निगेटिव्ह’ ठरला. ‘कोरोना पॉझिटिव्ह’ म्हटलं तर त्या माणसापासून, त्याच्या कुटुंबापासून इतर जण दूर पळतात. त्याचा नकारात्मक परिणाम होऊ लागल्याने सरकारलासुद्धा सांगावं लागलं की ’आपली लढाई रोगाशी आहे, रोग्याशी नाही.’ कोरोनाने आर्थिक, सामाजिकदृष्ट्या विविध देशातील अर्थव्यवस्थांनाही डबघाईस आणले. मात्र, काहींसाठी हा कोरोना चांगलाच ‘पॉझिटिव्ह’ ठरला. या कोरोनाने अनेक चांगले उद्योजकसुद्धा घडवले. त्यातलंच एक नाव म्हणजे ‘स्वराज एंटरप्रायझेस’च्या निलांबरी गावडे-सावंत.
 
 
‘सिव्हीलियन नेव्ही’मध्ये नोकरीस असणारे नंदकिशोर गावडे. त्यांची कन्या म्हणजे निलांबरी. निलांबरीने ‘इंटिरियर डिझाईनिंग’चा गरोडिया कॉलेजमधून अभ्यासक्रम पूर्ण केला. २०११ मध्ये तिने पहिली नोकरी केली, पगार होता अडीच हजार रुपये. २०२० मध्ये तिने अशा पाच-सहा ठिकाणी नोकर्‍या केल्या. दरम्यान २०२० मध्ये कोरोनाचं संकट आलं. ‘लॉकडाऊन’मुळे अवघं जग बंद. निलांबरीचं कामसुद्धा बंद होतं. याच काळात अनेकजण काहीना काही व्यवसाय करत होते. निलांबरीने पण स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा ठरवलं. सरळ नोकरीचा राजीनामा दिला. निलांबरीची सासू माधवी सावंत खर्‍या अर्थाने सुगरण. त्यांनी तयार केलेले लाडू, पापड, चटण्या अप्रतिमच. शेजारी, आप्तेष्ट यांच्यामध्ये सावंत काकूंच्या या खाद्यपदार्थांची भलतीच ‘क्रेझ’ होती. आपल्या सासूबाईंच्या पदार्थांनाच आपण ‘ब्रॅण्ड’ बनवायचं निलांबरीने निश्चित केलं. तिने हे पदार्थ नीट ‘पॅक’ करून विकण्यास सुरुवात केली. त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला.
 
 
या प्रतिसादामुळे निलांबरीचा उत्साह दुणावला. सासू माधवी सावंत, सासरे नंदकिशोर सावंत, पती सिद्धेश सावंत यांचा पाठिंबा तर होताच. आता पुढचं पाऊल म्हणून निलांबरीने चारकोपमध्ये दहा बाय दहाचं दुकानंच भाड्याने घेतलं. इथेच जन्म झाला ‘स्वराज एंटरप्रायझेस’चा. या ब्रॅण्डखाली ती कोकणातल्या उत्पादनांचीसुद्धा विक्री करू लागली. कोकणातील खाजा, पापड, पीठ, चटण्या, स्नॅक्स, सरबत, कोकम असं सगळं काही विकू लागली. खाद्यपदार्थांच्या दर्जामुळे निव्वळ चारकोप पुरतंच नव्हे, तर अगदी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अहमदाबाद, बडोदा, हैदराबादलादेखील हे खाद्यपदार्थ पोहोचले. इतकंच नव्हे, तर सातासमुद्रापार अगदी कॅनडा, न्यूयॉर्क, न्यूजर्सी या अमेरिकेतील शहरांतसुद्धा हा कोकणी स्वाद निलांबरीच्या ‘स्वराज’ने पोहोचविला.
 
 
‘स्वराज’च्या माध्यमातून दोन महिलांना रोजगार मिळाला. बोलताना अडखळणार्‍या प्रणालीला कोणी नोकरी देत नव्हतं. मात्र, निलांबरीने तिला आत्मविश्वास दिला. आज प्रणाली ‘स्वराज एंटरप्रायझेस’ची सेल्स प्रतिनिधी म्हणून काम करते. आता या क्षेत्रात अनेकजण आलेत. मात्र, आम्ही रास्त किंमतीत दर्जात्मक पदार्थांची सेवा देतो. त्यात तडजोड करत नाही. आपल्या या ‘ब्रॅण्ड’ला आणि कोकणातील खाद्यपदार्थांना जगभर नेण्याचा निलांबरी सावंत यांचा मानस आहे. छोट्या ‘स्वराज’ला सांभाळत उद्योगाचं साम्राज्य निळ्या गगनी नेण्याची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. कोमल नवरे आणि निलांबरी सावंत दोघी भिन्न क्षेत्रातील उद्योजिका. पण, कोरोनामध्येसुद्धा त्या डगमगल्या नाही. स्वत:ला उलट उद्योजिका म्हणून सिद्ध केलं. महिला दिन खर्‍या अर्थाने अशा महिलांच्या कर्तृत्वाने उजळून निघतो.

@@AUTHORINFO_V1@@