‘भारतनिर्भर विश्व’च्या दिशेने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Covid _1  H x W




‘कोविड’ काळानंतर ‘हायमीडिया’ या कंपनीसमोर अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. कोरोनाने तर ‘पीसीआर’ क्रांती घडवून आणली. त्यात या कंपनीचे मोलाचे योगदान आहे. एकूणच कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणांच्या हातात हात घालून जागतिक संकटाशी दोन हात करणार्‍या ‘हायमीडिया’ कंपनीचे कार्य सर्वार्थाने कौतुकास्पद आहे. तेव्हा, ‘हायमीडिया’मधील ‘सेल-कल्चर आणि इम्युनॉलॉजी’ विभागाचे संचालक डॉ. विशाल गंगाधर वारके व ‘मॉलेक्युलर बायोलॉजी’ विभागाच्या संचालिका डॉ. कविता मिलिंद खडके यांच्याशी साधलेल्या संवादातून कंपनीच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
 
 
 
‘हायमीडिया’ ही जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान उत्पादनातील जागतिक पातळीवर एक नावाजलेली कंपनी. कंपनीच्या इतिहासाविषयी सांगताना डॉ. विशाल वारके सांगतात की, “१९७३ साली वडील डॉ. गंगाधर वारके, काका व्ही. एम. वारके आणि आई सरोज वारके यांनी मिळून ही कंपनी सुरू केली. वडील ‘मायक्रोबायोलॉजी’मध्ये शिक्षण घेत असताना, सूक्ष्मजीवांच्या लागवडीसाठी त्यांना लागणारा ‘मीडिया’ सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत नव्हता. हा ‘मीडिया’ भारतात आयात होत असे, ज्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त होती. तेव्हा वडिलांना वाटलं की, हे असंच महाग मिळत राहिलं, तर भारतातील तरुण संशोधन कसं करणार, हा ‘मीडिया’ भारतातच मिळाला पाहिजे, हा निश्चय करून भारताला स्वावलंबी बनविण्याच्या जिद्दीने त्यांनी ही कंपनी स्थापन केली.
 
 
 
हातात पुरेशी साधनं उपलब्ध नव्हती. मात्र, जिद्दीने वडिलांच्या ‘मायक्रोबायोलॉजी’मधील प्रचंड अभ्यास व संशोधनाच्या जोरावर आज जगातील मुख्य तीन कंपन्यांमध्ये ‘हायमीडिया’ या भारतीय कंपनीचा क्रमांक लागतो. याचे उल्लेख अमेरिकन, रशियन पुस्तकांत आढळतात,” असे डॉ. वारके अभिमानाने सांगतात. काळाप्रमाणे ‘हायमीडिया’ने इतर क्षेत्रामध्ये आपले पंख पसरले. आज पारंपरिक सूक्ष्मजीवशास्त्राबरोबरच कंपनी ‘आरपीएम’, ‘एटीसी’, ‘पीटीसी’, ‘एमबी’, ‘इन्स्ट्रुमेंटेशन अ‍ॅण्ड ऑटोमेशन’, ‘केमिकल्स’, ‘प्लास्टिकवेअर’ ही उत्पादनेदेखील पूर्णतः भारतात बनवते. ‘मेक इन इंडिया’ या तत्त्वावरच गेले ४५ वर्षे ‘हायमीडिया’ यशस्वी वाटचाल करते आहे, हे डॉ. कविता खडके अभिमानाने सांगतात. कोरोना चाचण्यांसाठी लागणारी ‘कोविड पीसीआर’ मशिनरी व चाचणी किट बनविणारी ‘हायमीडिया’ ही भारतातील एकमेव कंपनी आहे.
 
 
तसेच ‘मॉलेक्युलर बायोलॉजी’साठी लागणारी सर्व उत्पादने ही कंपनी महाराष्ट्रातच बनवते. ‘कोविड’ चाचण्यांच्याच उत्पादनांबद्दल बोलायचे झाले, तर ‘कोविड आरटी-पीसीआर’ किटमध्ये चार जनुक एकाच ट्यूबमध्ये आहेत, असे किट भारतात कुठेही बनत नाहीत, हे उत्पादन घेणारी ‘हायमीडिया’ एकमेव कंपनी आहे, तर युरोप आणि अमेरिकेत सद्यःस्थितीत फक्त तीन ते चार कंपन्याच याचे उत्पादन करतात. अत्यावश्यक सेवेअंतर्गत कंपनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकार ‘हायमीडिया’सोबत संपर्कात होते. देशातील नागरिकांना आरोग्यसुविधा मिळण्यात कोणतीही दिरंगाई नको, अशी भारत सरकारची भूमिका होती. त्यामुळे कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक तो सर्व ‘मीडिया’ पुरविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील होती. ‘लॉकडाऊन’ असल्याने कर्मचार्‍यांना प्रयोगशाळेत व जिथे उत्पादने बनतात, तिथे सुरक्षित पोहोचविण्याचे सर्वात मोठे आव्हान कंपनीसमोर होते.
 
 
मुख्य उत्पादनांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाची इतर देशांतून आयात होत होती, त्यात अडथळे निर्माण झाले. देशातील इतर राज्यांमध्ये स्वदेशी कच्च्या मालाची गणती अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने कारखाने बंद होते. त्यामुळे तो कच्चा माल मिळणे कठीण झाले होते. एकीकडे सरकार सांगत होतं विक्रमी उत्पादन हवं. मात्र, दुसरीकडे प्रचंड अडथळे निर्माण झाले. यादरम्यान, अनेक गोष्टी चीनकडून आयात होत होत्या. मात्र, तिथेदेखील काही दर्जात्मक आणि गुणात्मक मर्यादा आल्या. अनेक परवानग्या घ्याव्या लागल्या. मात्र, या सर्व आव्हानांवर ‘हायमीडिया’ने यशस्वीपणे मात केली. केंद्र सरकार, स्थानिक प्रशासन व देशवासीयांनी कंपनीला खूप सहकार्य केल्याचे डॉ. वारके सांगतात.
 
 
‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कंपनीतील कर्मचारी व संचालक यांच्यात समन्वय होता. कंपनीत कर्मचार्‍यांना ये-जा करण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली. तसेच देशाबाहेरून येणार्‍या कच्च्या मालाऐवजी स्वदेशी कच्चा माल वापरण्यास प्राधान्य दिले गेले. ज्यामुळे आमचीही किटच्या एकूण किमतीत २५ टक्क्यांनी बचत होऊ लागली, असे डॉ. खडके सांगतात. यावेळी डॉ. वारके यांनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना एक उदाहरण दिले. नाशिकस्थित कारखान्यात काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. यावेळी नियमानुसार सर्व कर्मचार्‍यांचे ‘विलगीकरण’ करणे आवश्यक होते, तसेच कारखानाही काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
 
 


Covid _2  H x W
 
त्यानुसार डॉ. वारके यांनी सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करत सर्वांना व्यवस्थित उपचार मिळावे याची व्यवस्था केली, तर दुसरीकडे एक संपूर्ण मंगल कार्यालयच भाडेतत्त्वावर घेत सर्व १०० हून अधिक कर्मचार्‍यांना तेथे ‘क्वारंटाईन’ करण्याची व्यवस्थाही केली. या काळात कोणतीही पगारकपात नाही. कोणालाही कामावरून काढून टाकण्यात आले नाही, उलट ज्यांना काम हवं होतं, अशांना नोकर्‍या देण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉ. वारके सांगतात, तर दुसरीकडे आर. डी. लॅबमधील कर्मचार्‍यांना शिफ्टमध्ये कामावर बोलविण्यात येऊ लागले. या विभागाने प्रामुख्याने या काळात केवळ कोरोनासंबंधित उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले. उत्पादन विभागातील कर्मचार्‍यांनी २४ X ७ काम केले. अशा सर्वांना वेळेवर पगार, बोनस तसेच ‘ओव्हरटाईम’ देण्यात आला. सर्व सरकारी कर तसेच बँकांचे कर्जाचे हफ्तेदेखील कंपनीने वेळेवर भरले. सामाजिक कार्यातही कंपनी मागे नव्हती. ‘पीएम केअर’साठी सर्व कर्मचार्‍यांनी एक महिन्याचा पगार, तसेच कंपनीचा निधी मिळून ३० लाखांचा निधी देण्यात आला.
 
 
तसेच ‘अक्षय पात्रा फाऊंडेशन’ला पाच लाखांचा निधी दिला. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात काही ‘पॅथोलॉजी लॅब’च्या सोबतीने फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना मोफत कोरोना चाचण्या उपलब्ध करून दिल्या. डॉ. वारके यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोशल मीडियाच्या माध्यमातून योगसाधनेचे महत्त्व लोकांना पटवून दिले. उत्तम दर्जाच्या भारतीय बनावटीच्या किट्सचे महत्त्व तज्ज्ञांना पटले. एक नवीन किट ‘हायमीडिया’ने तयार केले आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर खरंच रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे का? हे मोजणारे किट कंपनीने तयार केले आहे. हे किट लवकरच बाजारात येईल, सध्या कंपनी ‘आयसीएमआर’कडून मान्यता मिळविण्यासाठी प्रतीक्षेत आहे. मृदामुक्त शेती संदर्भात संशोधनदेखील सुरू आहे. आधुनिक शेतीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे. भारताला केवळ आत्मनिर्भर करणं, हा कंपनीचा हेतू नसून भविष्यात ‘भारतनिर्भर विश्व’ करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल होण्यास कंपनी हातभार लावते आहे.
 
 
 
"भविष्यात तुमच्या समोर प्रचंड संधी आहेत. फक्त तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचे आहे. संपूर्ण जगातून भारतात गुंतवणूक होण्यास प्रारंभ झाला आहे. तेव्हा, वेळीच हे नवे बदल आत्मसात करून जिद्दीने ध्येयाचा मागोवा घ्या, यश तुमचंच आहे!"


@@AUTHORINFO_V1@@