'हिरण्यकेशी'च्या रक्षणासाठी आंबोलीकर एकवटले; संवर्धनासाठी ठाकरेंचे पत्र

    11-Mar-2021
Total Views |

hiranyakeshi fish _1 

'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्याची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी आंबोलीकर एकवटले आहेत. गुरुवारी महाशिवरात्रीचे निमित्त साधून या प्रदेशनिष्ठ माशांबद्दल गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. जगात केवळ आंबोलीमध्ये सापडणाऱ्या या माशाच्या संवर्धनासाठी मंदिर परिसराला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा देण्याची मागणी 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'कडून करण्यात आली आहे.
 
 
 
गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या शोधाविषयीचा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला. या नव्या प्रजातीचा उलगडा डाॅ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला आहे.गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या हा मासा प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच तो केवळ आंबोलीतील महादेवाच्या मंदिरासमोरील कुंडामध्ये आणि त्याशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशी नदी उगमाच्या मुखाशी आढळतो. म्हणूनच या माशाचे अधिवास क्षेत्र लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी गुरुवारी आंबोलीमध्ये जनजागृती अभियान पार पडले. 'ठाकरे वाईल्ड फाऊंडेशन' (टीडब्लूएफ) आणि 'मलाबार नेचर काॅन्झर्वेशन ट्रस्ट'च्या (एमएनसीटी) संयुक्त विद्यमाने हे अभियान पार पडले.


fish _1  H x W: 
 
महाशिवरात्रीचे निमित्त साधून महादेवाच्या मंदिरात गावकऱ्यांना आणि भाविकांना 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच या माशाचा अधिवास का महत् आहे आणि याठिकाणी वावरताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी लोकांना सांगण्यात आले. यावेळी 'टीडब्लूएफ'चे स्वप्निल पवार आणि 'एमएनसीटी'चे काका भिसे उपस्थित होते. या माशाच्या संवर्धनासाठी 'टीडब्लूएफ'चे प्रमुख आणि वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांनी वन विभागाच्या सचिवांना पत्र लिहले. या पत्रात त्यांनी 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाचा अधिवास असणाऱ्या महादेव मंदिराचा परिसर 'हिरण्यकेशी लोच जैवविविधता वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून आपण स्थानिकांच्या मदतीनेच या प्रदेशनिष्ठ माशाचे संवर्धन करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.