‘रुद्रा क्रिएशन्स’ची उद्योग भरारी...

    11-Mar-2021
Total Views |






उद्योग-व्यवसायामध्ये ‘आव्हानातून संधी’ हा यशाचा एक मूलमंत्र आहे. हा मंत्र जो उद्योजक कटाक्षाने पाळतो, तो यशस्वितेच्या शिखरावर पोहोचतो. कोरोना काळात आपल्या उत्पादनाला वेगळी दिशा देत, ‘रुद्रा क्रिएशन्स’ने उद्योगाला नव्या क्षेत्रात स्थिरावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कंपनीचे सीईओ संजय पवार आणि संचालक प्रीती पवार यांनी अपार मेहनत केली. तसेच कोरोना केअर सेंटर्स उभारणीतही, संबंधित वस्तूंच्या पुरवठ्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि ते काम यशस्विपणे पूर्णही केले. तेव्हा, कोरोना काळातील त्यांच्या या मेहनतीवर टाकलेला हा प्रकाश...
 
‘नियोजनबद्धता’ हा उद्योगाचा मूळ पाया. उद्योगामधील प्रत्येक काम अगदी नियोजितपणे करणे हे त्या उद्योगव्यवसायाच्या यशाचे गमक. कठीण समयी उद्योगापासून पळ काढण्यापेक्षा त्यातूनच आपल्याला नवे विश्व कसे उलगडता येईल, नव्या वाटा कशा शोधता येतील, हे गुण उद्योजकांच्या ठायी असणे आवश्यक आहे. ’रुद्रा क्रिएशन्स’चे संजय पवार आणि त्यांच्या पत्नी प्रीती पवार यांना हेच गुण ‘लॉकडाऊन’मध्ये फायदेशीर ठरले. ग्राहकांच्या गरजेनुरूप त्यांनी आपल्या उत्पादनाला आकार दिला. त्यामुळे कोरोनाच्या कठीण प्रसंगातही त्यांच्याशी नवनवीन ग्राहक जोडले गेले. कॉर्पोरेट क्लोथिंग, बॅग, प्रमोशनल मर्चंडाईज् आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग या क्षेत्रात ’रुद्रा क्रिएशन्स’ गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनीचे ‘हिंदुस्तान लिव्हर’, ‘डाबर’, ‘कोलगेट’, ‘नेस्ले’, ‘आयडीएफसी बँक’, ‘युएस दूतावास’, ‘जेएनपीटी’ इ. ग्राहक आहेत.
 
‘लॉकडाऊन’च्या काळात इतर उद्योगधद्यांप्रमाणेच ’रुद्रा क्रिएशन्सकडे’ही ग्राहकांकडून येणार्‍या मागण्या एकाएकी कमी झाल्याचे प्रीती पवार यांनी सांगितले. त्यात ग्राहकांकडून येणारी देणी रखडल्याने कंपनीचे आर्थिक चक्र विस्कळीत झाले. ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ हा अत्यावश्यक सेवेचा भाग नाही. त्यामुळे कोरोना काळात या गोष्टींना मागणी नसल्यामुळे ’रुद्रा क्रिएशन्स’समोर उद्योगात टिकून राहण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या आव्हानावर मात करण्यासाठी संजय पवार यांना कंपनीकरिता आखलेली मूल्ये कामी आली. ‘टीमवर्क’ आणि ‘ग्राहकांची सेवा’ ही कंपनीची मूळ तत्त्वं असल्याने पवार हे त्यांच्या कर्मचार्‍यांशी आणि ग्राहकांशी सातत्याने संपर्कात होते. साप्ताहिक बैठकांमध्ये या संकटातून आपल्याला कसे बाहेर पडता येईल आणि कोणत्या संधी असतील, यावर चर्चा घडत होत्या. यामधून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे ’मागणी तसा पुरवठा.’ ‘कोविड’संबधी वस्तूंची मागणी वाढत असल्याने कंपनीने त्यासंबंधी वस्तूंचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. पवार आणि त्यांची पत्नी ग्राहकांशी सातत्याने संपर्कात असल्याने त्यांच्याकडून मास्क, ‘पीपीई किट’, ‘सॅनिटायझर’ स्टॅण्ड, फेसशिल्ड, ऑक्सिमीटर अशा गोष्टींची मागणी येण्यास सुरुवात झाली.
 
मे महिन्याच्या सुरुवातीला पवार यांना आयडीएफसी बँकेकडून ‘कोविड’संबंधी वस्तूंचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर पूर्ण करताना पवार आणि त्यांच्या पत्नीसमोर अनेक अडचणी आल्या. संपूर्ण भारतातील आयडीएफसी बँकेच्या शाखांमध्ये ‘कोविड’संबंधी वस्तूंचा पुरवठा करायचा असल्याने कुरिअर सेवा गरजेची होती. मात्र, त्यावेळी बहुतांश कुरिअर सेवा बंद होत्या. अशावेळी मुंबई आणि आसपासच्या परिसरांत कंपनीच्या कर्मचार्‍यांनी स्वत: जाऊन वस्तू पोहोचवल्या. दूरवरच्या वितरणासाठी कुरिअर सेवेची मदत घेऊन सर्व वस्तू त्याठिकाणी पोहोचेपर्यंत कर्मचार्‍यांनी पाठपुरावा केला. या घटनेमधून ’रुद्रा क्रिएशन्स’च्या कर्मचार्‍यांची आपल्या कंपनीप्रति असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसते. याच बांधिलकीमुळे ‘लॉकडाऊन’च्या कठीण प्रसंगातही संजय आणि प्रीती यांनी आपल्या कर्मचार्‍यांची साथ सोडली नाही. कंपनीसमोर आर्थिक संकटं उभी असतानाही अगदी नवख्या आलेल्या कर्मचार्‍यालाही त्यांनी पगार दिला.
 

 
 
’रुद्रा क्रिएशन्स’च्या आजवरच्या कामाचा आवाका हा कॉर्पोरेट आणि त्यासंबंधीच्या क्षेत्रांपुरताच मर्यादित होता. मात्र, ‘लॉकडाऊन’च्या कठीण प्रसंगात संजय आणि प्रीती या दोघांनी नवीन क्षेत्रांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. कंपनीने आजवर महानगरपालिका, रेल्वे, पोलीस अशा शासकीय क्षेत्रांमध्ये काम न केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामधून त्यांनी शासकीय संस्थांकडे मोर्चा वळविला व त्यातच त्यांना ’जेएनपीटी’साठी ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्याची निविदा मिळाली. उरणमध्ये ’जेएनपीटी’ला १२० खाटांचे ’कोविड केअर सेंटर’ बांधून हवे होते. सुदैवाने ही निविदा ’रुद्रा क्रिएशन्स’ला मिळाली आणि अवघ्या ४८ तासांमध्ये कंपनीने या ‘केअर सेंटर’ची उभारणी केली. ‘कोविड सेंटर’मध्ये आवश्यक असणार्‍या सगळ्या वस्तूंचा पुरवठा काही तासांमध्ये करण्यात आला. आजवर काम न केलेल्या क्षेत्रामध्ये ’रुद्रा क्रिएशन्स’ने टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरले, सोबतच त्यामध्ये केलेल्या कामामध्येही घवघवीत यश मिळाले.
 
‘कोविड’ काळात नव्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करायला संजय पवार यांना त्यांचे धाकटे बंधू संदीप पवार यांची साथ मिळाली. भिवंडीमध्ये असणारा कारखाना संदीप यांनी त्यांच्याकडील यंत्र आणि कामागारांना ‘कोविड प्रॉडक्ट्स’ तयार करण्यासाठी सुसज्ज केला. म्हणूनच ‘लॉकडाऊन’च्या कठीण प्रसंगात त्यांना यश मिळू शकले. कंपनीच्या संचालक आणि संजय पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रीती पवार यांचीदेखील संजय यांना खंबीर साथ मिळाली. टेक्नोलॉजी आणि डिजिटल माध्यमांवर उद्योग मोठा करण्यासाठी मुलगा रुद्राक्षचीही मदत झाली. कठीण प्रसंगात कंपनीला पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी उद्योजक मित्रांच्या अनुभवांची शिदोरीही कामी आल्याचे ते सांगतात.
 
सध्याचा औद्योगिक काळ हा डिजिटल माध्यमांवर भर देणारा आहे. त्यामुळे संजय पवार यांनीदेखील ’रुद्रा क्रिएशन्स’ची वाटचाल त्याच मार्गाने करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन आणि त्यातही ‘अ‍ॅपबेस’ उद्योग सुरू करून एका क्लिकवर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय संजय यांच्यासमोर आहे. तसेच कॉर्पोरेटबरोबरच ‘रिटेल’ बाजारपेठेमध्येही कशा पद्धतीने गुंतवणूक वाढवता येईल, यासंबंधीचे काम सुरू आहे. पुढील दहा वर्षांमध्ये शासकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपला उद्योग वाढवता येईल, याबाबत 'रुद्रा क्रिएशन्स' काम करत आहे.
 
"व्यवसाय हा ‘टेस्ट मॅच’सारखा आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्ही ‘विकेट’ न पडता पाय रोवून ‘पीच’वर उभे राहणे आवश्यक आहे. हे जर केले, तर यश तुमचेच आहे. मराठी मुलांनी उद्योगजगताकडे वळण्यासाठी आम्ही ‘इंटरप्रेनिअर सागा’ ही मोहीम सुरू केली आहे."