मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नवी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ' (एमपीसीबी) कळंबोली येथे स्वयंचलित हवा गुणवत्ता मोजणी स्थानकाची निर्मिती करणार आहे. यासाठी पनवेल महानगर पालिकेकडून 'एमपीसीबी'ला ना हरकत दाखला मिळाला असून खारघर आणि तळोजा एमआयडीसी परिसरातही ही यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मुंबई बरोबरच नवी मुंबई देखील वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. 'वातावरण' संस्थेने १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर, २०२० दरम्यान खारघर, तळोजा, पनवेल शहर व कळंबोली येथील वायूप्रदूषणाचा अभ्यास केला होता. त्या अहवालानुसार सकाळच्या काही तासांमध्ये पीएम २.५ या वायू कणांचे प्रमाण हवेत सर्वाधिक होते. पनवेल शहरात पीएम २.५ ची पातळी सरासरी १०१.१२ इतकी होती. ही पातळी भारतीय मानकांच्या (६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत १.७ पटींनी तर 'डब्ल्यूएच'ओ मानकांच्या (२५ मायक्राेग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत चार पटींनी जास्त होती. तसेच खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील रहिवाशांना दिवसातील १७ तास प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. तळोजा एमआयडीसीमुळे आसपासच्या परिसरात वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला होता.
जानेवारी २०२१ मध्ये 'वातावरण'ने खारघर येथे दाट वाहतुकीच्या चौकात फुफ्फुसांची मोठी प्रतिकृती बसवली होती. ती पांढऱ्या रंगाची प्रतिकृती दहा दिवसांत पूर्णपणे काळी पडली. त्यामुळे खारघर, तळोजा, पनवेल शहर व कळंबोली येथील वायूप्रदूषणाची वाढती पातळी निदर्शनास आली. यापार्श्वभूमीवर आता 'एमपीसीबी'कडून कंळबोली येथे स्वयंचलित हवा गुणवत्ता मोजणी स्थानक बसविण्यात येणार आहे. ८ मार्च २०२१ रोजी माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही माहिती मिळाल्याचे 'वातावरण' संस्थेचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले. तसेच तळोजा औद्योगिक वसाहत आणि खारघरमध्ये स्थानकांच्या निर्मितीबाबत रायगड प्रादेशिक कार्यालयाकडून मुख्य कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.