अन् चाकोंनी चाकरी सोडली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2021   
Total Views |

PC Chako_1  H x
 
 
काँग्रेसला ‘घरघर’, ‘उतरती कळा’ अशा सगळ्याच अनिष्टाची लागण झालेली दिसते. एकीकडे ‘जी-२३’ गटातील काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी गांधी परिवाराविरोधात ताशेरे ओढून आपली जाहीर नाराजी प्रकट केली असतानाच, केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आणि माजी खासदार पी. सी. चाको यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकोंनी काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे आपला राजीनामा सुपूर्द करून आपल्या चाकरीला अखेरीस पूर्णविराम दिला. चाकोंसारख्या गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी ही वरकरणी चिंताजनक असली तरी काँग्रेसला त्याचे सोयरसुतक नाही. कारण, कोणाच्या पक्षप्रवेशाने किंवा पक्षातून बाहेर पडण्याने काँग्रेसचे अजिबात नुकसान होत नाही, हीच काँग्रेसी शिकवण. त्यामुळे चाकोंच्या गच्छंतीने आधीच मरगळलेल्या केरळ काँग्रेसमध्ये फार काही हालचाली होतील, याची शक्यताही तशी धुसरच!तरीही चाकोंना इतक्या वर्षांनी हा होईना, काँग्रेसच्या खऱ्या चेहऱ्याचा साक्षात्कार झाला, हेही नसे थोडके! चाकोंच्या मते, काँग्रेसमध्ये लोकशाही अजिबात नाही. उमेदवारांची यादीही राज्याच्या कमिटीसमोर मांडली गेली नाही. तसेच उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, निवडणुकीवरील एकूणच चर्चेसाठी केरळ काँग्रेसचे कुठलेही पॅनेल कार्यरत नाही. केरळमध्ये तर ‘काँग्रेस-आय’ आणि ‘काँग्रेस-ए’ असे दोन पक्ष असून त्यांची समन्वय समितीच राज्याचा काँग्रेस पक्ष म्हणून कारभार हाकते. एक गट माजी मुख्यमंत्री उमन चंडी यांचा, तर दुसरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्नीथाला यांचा. त्यामुळे अंतर्गत राजकारणाने केरळमध्ये काँग्रेस पक्षसंघटनेला पुरते पोखरले आहे. आता पक्षाचे माजी आणि भावी अध्यक्ष राहुल गांधी याच केरळमधील वायनाडचे खासदार आणि त्याच राज्यात काँग्रेसची ही गत, तर बाकी राज्यांबद्दल काय बोलावे? कोणे एकेकाळी फुटीरतावादी यासिन मलिकची तळी उचलेल्या चाकोंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची कारणं स्पष्ट केली असली तरी गेल्या वर्षी याच चाको महाशयांनी ‘जी-२३’ नेत्यांवर आसूड ओढले होते. पण, आज ते म्हणतात, “मी, फक्त काँग्रेससाठी ‘जी-२३’ मध्ये सहभागी झालो नव्हतो. पण, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत.” यालाच म्हणतात ‘देर आए, दुरुस्त आए।’
 
 

धक्क्यावर धक्के...

 
 
काँग्रेसला ‘अलविदा’ करायचे पी. सी. चाकोंना हे उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल. पण, आधी म्हटल्याप्रमाणे जे झाले, ते चांगल्यासाठीच! चाकोंसारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यालाही आपण ज्या पक्षात घाम गाळून मोठे झालो, नाव कमावले, त्याच पक्षातून निरोप घेण्याची वेळ यावी, यावरून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची केविलवाणी अवस्थाच समोर येते. चाकोंनी काँग्रेसचा अंतर्गत कलह असा चव्हाट्यावर आणून पक्षाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची फलनिष्पत्ती होईल, अशी आशा बाळगणे फोलच. कारण, काँग्रेसमधून वरपासून खालपर्यंत बहुतांशी निर्णय हे पक्षश्रेष्ठींकडूनच घेतले जातात. पण, सोनिया गांधींचे आजारपण आणि राहुल गांधींचे अनाडीपण, यामुळे कधी नव्हे ती काँग्रेसची अवस्था दयनीय झालेली दिसते. विरोधी पक्ष म्हणून ना केंद्रात, ना राज्यात आपला ठसा काँग्रेसला उमटविता आला आणि ज्या पंजाबमध्ये आज काँग्रेस सत्तेवर आहे, तिथेही कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या बळावरच ती तरलेली दिसते. तेव्हा, काँग्रेसची सर्वांगीण अवस्था केरळच नव्हे, तर इतर राज्यांतही फारशी वेगळी नाही.त्यातच ‘जी-२३’ नेतेमंडळींच्या, गांधी घराण्याच्या नेतृत्वाला जाहीर विरोधामुळे, काँग्रेसच्या तळागाळात उरल्या-सुरल्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण दिसते. या पार्श्वभूमीवर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी निश्चितच आव्हानात्मक असून पक्षाची कसोटी लागणार आहे. त्यातच तामिळनाडूमध्ये तर काँग्रेसने ‘आम्ही द्रमुकबरोबर एकत्र लढलो तरी सत्तेत सहभागी होणार नाही,’ असा अजब पवित्रा घेतल्याने मतदारही काँग्रेसच्या पारड्यात मत टाकताना १०० वेळा विचार करतील. कुठलाही पक्ष निवडणुका का लढवतो, तर साहजिकच जिंकण्यासाठी, मित्रपक्षांसोबत सत्ता उपभोगण्यासाठी. पण, तामिळनाडूमध्ये तर काँग्रेसने आधीच अशी अचानक माघार घेतल्याने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे. पुदुच्चेरीमध्ये तर काँग्रेस ‘क्रॅश’ झाली, आसाममध्ये चहाच्या मळ्यात प्रियांका गांधींनी केलेले पर्यटनही कामी येणार नाही, बंगालमध्ये तर थेट लढत ‘भाजप वि. तृणमूल’ अशी आहे. मग पाचपैकी उरलेसुरले केरळ हे एकच राज्य. पण, आता तिथेही काही आलबेल नाहीच. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर धक्क्यांवर धक्के बसलेला काँग्रेस पक्ष या पाच राज्यांत कशी कामगिरी करतो, ते पाहायचे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@