मुंबई मेट्रो दृष्टिक्षेपात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2021   
Total Views |

metro mumbai_1  
 
 
 
 
मुंबई मेट्रोच्या विविध मार्गांचे काम प्रगतीपथावर असून राज्याच्या अर्थसंकल्पातही त्यासंबंधी घोषणा देण्यात आल्या. त्यानिमित्ताने या मेट्रो मार्गांची माहिती एका दृष्टिक्षेपात...
मुंबईच्या जीवनवाहिनीवरचा मोठा ताण कमी करण्यासाठी मुंबई-मेट्रो मुंबई तसेच मीरा रोड, भाईंदर, विरार, ठाणे, भिवंडी, कल्याण भागांत तत्परतेने प्रवास करिण्याकरिता सज्ज होणार आहे. फक्त ‘मेट्रो कारशेड मार्ग-३’चा निर्णय आरे शेडमध्ये वा अन्य स्थानी लवकर घ्यावा, हे अजून ठरत नाही. त्यामुळे मेट्रो कामांच्या खर्चात वाढ झाली आहे. पण, ‘एमएमआरडीए’ने मुंबई महानगरात पर्यावरणपूरक वेगवान प्रवास होण्याकरिता मेट्रो प्रकल्पांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मार्ग २ अ’ व ‘मार्ग ७’ या मार्गिकांवर धावणाऱ्या पहिल्या गाडीचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो, प्रवासी कार्ड, मेट्रो परिचलन, नियंत्रण केंद्र आणि ‘मेट्रो ब्राण्डिंग मॅन्युअल’ यांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
 
 
मेट्रोकामाची वैशिष्ट्ये
 
 
मेट्रोभवन - मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या एकूण सुमारे ३३७ किमी लांबीच्या १४ मार्गांच्या परिचलनासाठी (नियंत्रण केंद्र २४,८८३ चौ.मी.; तांत्रिक कार्यालयांकरिता ८०,१७१ चौ.मी.; मेट्रो प्रशिक्षण संस्थेकरिता ९,६२४ चौ.मी.) गोरेगाव आरे कॉलनीमधील हरित क्षेत्रात मोडणाऱ्या २.३ हेक्टर जागेची निवड मेट्रोभवन इमारतीकरिता निवडण्यात आली आहे. परंतु, मेट्रोभवनाच्या विस्तृत आराखड्याची माहिती सरकारने गुलदस्त्यात का ठेवली आहे, अशी विचारणा करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार, ही ३३ मजली मेट्रोभवनची इमारत आठ हजार चौ.मी. जागेवर उभी राहणार आहे.
 
 
सर्व मेट्रोमार्ग एका छताखाली येण्याकरिता महामुंबई मेट्रो संचालन महामंडळ स्थापण्यात आले आहे. यात एक हजारांहून अधिक कर्मचारी असतील. गाड्यांचा ताफा, सिग्नल यंत्रणा, टेलिकॉम यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, वीजपुरवठा, सुरक्षा व्यवस्था आदी बाबींसाठी, शिवाय संचालन, रोलिंग स्टॉक, ग्राहक सेवा, तिकीट, पार्किंग आदी सुविधांसाठी कंत्राटी पद्धतीने काम केले जाईल.
 
 
चालकरहित अद्ययावत मेट्रो
 
 
या मेट्रोत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. मेट्रोचे सर्व डबे वातानुकूलित असतील व त्यात स्वयंचलित दरवाजे, उद्घोषणा व तांत्रिक माहिती देणारी व्यवस्था यात कार्यरत राहणार आहे. डब्यातील अंतर्गत भाग विना-घसरंडीचा आहे. प्रत्येक डब्यात आग वा इतर आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी मेट्रो यंत्रणाबद्ध राहील व प्रवाशांना मदत मागण्यासाठी तेथे एक बटणदेखील असेल. डब्यात व मेट्रो स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील असतील. वेगनियंत्रण व सुरक्षेसाठी त्यात अद्ययावत बदलणारे ‘व्होल्टेज’ व पुनरावृत्तीसह वापरता येण्याजोगे विविध प्रकारचे तंत्रज्ञान आहे. इंटरनेटच्या वापरासाठी ‘ऑप्टिकल फायबर’ वापरले जातील. प्रत्येक गाडी ताशी ८० किमी वेगमर्यादेने धावेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात मोटरमन नसेल व चालकरहित मेट्रो स्वयंचलित पद्धतीने गाडीची ये-जा सुरू राहणार आहे. मेट्रोमध्ये पर्यावरणसंवर्धनाला महत्त्व दिले जाईल. दिव्यांगांना चाकखुर्चीची व्यवस्था असेल.
 
 
एकात्मिक तिकीट यंत्रणा
 
 
‘मेट्रो’, ‘बेस्ट’, ‘एसटी’सह सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांकरिता एकात्मिक तिकिटांसाठी मुंबईकरांना अनिश्चित काळाकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे दिसते. कारण, युती सरकारच्या काळातील प्रकल्प म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून या प्रकल्पाला अडगळीत टाकल्याची माहिती समोर आली आहे. दि. ९ मे, २०१९ साली युती सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली. यामुळे २२ महिन्यांनंतरही या प्रकल्पाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.
 
 
सुकर प्रवासासाठी...
 
 
मेट्रो स्थानकांच्या ५०० मी. त्रिज्येत बहुवाहतूक परिवहन प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यात पादचारी मार्ग रुंदीकरण व सायकल ट्रॅक, वाहतूक जंक्शन सुधारणा, रहदारी सिग्नल, पार्किंग, पथदीप, बस थांबा सुधारणा, पादचारी पूल, स्कायवॉक इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश आहे. यात सुमारे १५५ मेट्रो स्थानकांचा समावेश असेल.
 
 
मेट्रोतील पदे व प्रशिक्षण
 
 
मेट्रोच्या १,०५३ विविध पदांसाठी एक लाख, पाच हजार ३१३ अर्ज आले असून, ८७ हजारांहून अधिक अर्ज वैध ठरले आहेत. अर्जदारांच्या लेखी परीक्षा, मुलाखती इत्यादी प्रक्रिया सुरू आहेत. काही मेट्रो पदांच्या अधिकाऱ्यांना सिंगापूरला प्रशिक्षण देण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.
 
 
 
metro_1  H x W:
 
 
 
काही मेट्रो मार्गांविषयी विशेष माहिती
 
 
मार्ग १ (वर्सोवा-घाटकोपर) : हा मार्ग टाळेबंदीनंतर १ सप्टेंबरपासून पुन्हा सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळात सुरू करण्यात आला. १८ जानेवारीपासून सकाळी एक तास वाढविण्यात आला. स्थानकाबाहेरील सायकल सुविधेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
 
मार्ग २ अ (दहिसर-डीएननगर) पिवळ्या रंगात व ७ (दहिसर-अंधेरी) लाल रंगात : या मार्गांवरचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे व गाड्यांची परिचालनाच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. पहिली मेट्रो गाडी मे वा जूनपासून सुरू होईल. या मार्गांवरील डब्यांची क्षमता ३८० प्रवासी (५२ बैठे व ३२८ उभे); एका मेट्रो गाडीतून एका वेळी २,२८० प्रवाशांचा प्रवास शक्य होऊ शकतो. या मार्गांकरिता ओव्हरहेड केबल टाकण्याचे आणि सायनेज बोर्ड बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
 
 
मार्ग २ ब (डीएननगर-मंडाले) : फक्त सात टक्के काम संपल्यावर प्रकल्पसंबंधित तीन निविदा ‘एमएमआरडीए’कडून रद्द केल्या गेल्या आहेत. या प्रकल्पावर गेले वर्षभर कंत्राटदार नेमला गेलेला नाही. तीन आयकॉनिक पुलांचे काम व मेट्रो डेपोचे कामही रखडण्याची चिन्हे आहेत. काम सुरू करण्यासाठी कदाचित कामाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
मार्ग ३ (कुलाबा-सीप्झ) : प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूमिगत कामातील ९० टक्के भुयारीकरण व ६० टक्क्यांहून जास्त स्थापत्यकाम पूर्ण झाले आहे व पहिल्या टप्प्याचे संपूर्ण काम २०२२ मध्ये पूर्ण होणार असले तरी कारशेडकरिता ती चालू होण्याकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. मेट्रो ट्रॅकच्या स्लीपरसाठी स्विस तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. या अद्ययावत स्लीपर बॉक्समुळे कंपन क्षमता २२ ‘व्हीडी’हून जास्त होईल. संवेदनशील इमारती व दाटीची वस्ती असल्याने या मार्गासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
 
मार्ग ४, ४ अ (वडाळा-कासारवडवली; वडाळा-जीपीओ) : या मेट्रोसाठी ‘केएफडब्ल्यू’ या जर्मन विकास बँकेकडून एकूण ५४५ दशलक्ष युरो (रु. ४००० कोटी) इतक्या रकमेचे कर्ज ‘इंडो जर्मन विकास साहाय्य’ अंतर्गत मंजूर झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई व ठाणे ही महानगरे जोडली जाणार आहेत. या मार्गासाठी ३५७ खारफुटीची झाडे तोडावी लागणार आहेत. कॅनेडियन कंपनी ‘बंबार्डिअर’ या मेट्रो मार्गांकरिता २३४ डबे तयार करणार आहे.
 
मार्ग ५ (ठाणे-कल्याण) : या मार्ग उभारणीला वेग आला आहे. याचे काम डिसेंबर २०२४ मध्ये संपेल, अशी अपेक्षा आहे. हा मार्ग उल्हासनगरपर्यंत वाढविण्यात यावा, या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी ‘दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन’ची नियुक्ती झाली आहे.
 
मार्ग ६ (समर्थ नगर-विक्रोळी) : ‘जेव्हीएलआर जंक्शन स्टेशन’ येथे विविध अडथळे पार करीत ‘एमएमआरडीए’ने सर्वात आव्हानात्मक असे ‘पाईल कॅप’चे काम पूर्ण केले. जमिनीत खोलवर खडकांपर्यंत सांभाळून खोदकाम करावे लागते कारण इतर महत्त्वाच्या सेवा वाहिन्यांना धक्का बसण्याची शक्यता असते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@