सेवाशक्ती का गमावावी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2021   
Total Views |

Anushree Metkar_1 &n
 
कारकिर्द की कुटुंब, असा प्रश्न आधुनिक महिलांना नेहमीच भेडसावतो. हा प्रश्न अंजुश्री मेटकर यांनाही पडला. पण, त्या सगळ्या प्रश्नांना सामोरे जात अंजुश्रींच्या आतील एक समाजशील डॉक्टर जागृत आहे.
स्वत:च्या पोटच्या मुलांनी वृद्धाश्रमात टाकलेल्या आईबापांचे दु:ख खूप मोठे असते. अख्खं आयुष्य मुलांसाठी खर्च केल्यावर त्यांना मुलांकडून आलेला अनुभव भयानक असतो. म्हणूनच वृद्धाश्रमातील माता-पित्यांचे मन रमेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. गेली सात वर्षे त्या सतार शिकत आहेत. सतारवादनाचे कार्यक्रम वृद्धाश्रमात करावेत. त्यातून त्या मातापित्यांचे थोडे तरी मनोरंजन व्हावे, त्यांचे दुःख क्षणभर तरी दूर व्हावे, असा डॉ. अंजुश्री मेटकर यांचा प्रयत्न आहे. डॉ. अंजुश्री सध्या पुण्याजवळच्या एका सेवावस्तीमध्ये विनामूल्य आरोग्यसेवा देतात. तसेच एका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्या आरोग्य शिबिरांचेही आयोजन करतात.
 
दोन दशकांपूर्वी फलटण वगैरे परिसरात आरोग्यक्षेत्रात एक वेगळाच प्रवाह होता. महिलांना मासिक पाळीमध्ये कष्टाचे काम करणे आणि त्यात पारंपरिक नियम पाळून करणे जिकिरीचे वाटायचे. या महिलांना मासिक पाळीबद्दल काहीही समस्या निर्माण झाल्या, तर तेथील डॉक्टरही महिलांच्या समस्यांबाबत अंतिम उपाय म्हणून गर्भाशयाची पिशवी काढायचा सल्ला द्यायचे. अशीच एकदा एक तरुण मुलगी अंजुश्री यांच्याकडे आली. ती म्हणाली, “डॉक्टर, मला पिशवी काढायची आहे.” त्या विवाहित स्त्रीला तसा काही गंभीर आजारही नव्हता. अंजुश्री यांना आश्चर्य आणि वाईटही वाटले. त्यांनी मग त्या महिलेसोबतच परिसरातील महिलांचे समुपदेशन केले. छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्या, औषध आणि काही नियम पाळून बर्‍या होतात. त्यासाठी गर्भाशयाची पिशवी काढून आणखी आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देऊ नका, असे त्या महिलांना समजावू लागल्या. मुलींनी, महिलांनी निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत त्या शिबीर घेऊ लागल्या. महिलांना शिक्षण आणि स्वावलंबनाबरोबरच चांगले आरोग्य आवश्यक आहे, यासाठी त्यांनी समाजाची जागृती केली.
 
 
आरोग्यक्षेत्रासोबतच ग्रामीण भागातल्या मुलींनी उच्चशिक्षण घेण्यासाठी डॉ. अंजुश्रींनी कार्य सुरू केले. मुलींना शिकून काय करायचे आहे, असं म्हणणार्‍या पालकांचे समुपदेशन आणि हुशार मुलींचे मार्गदर्शनही केले. सेवाव्रती डॉक्टर आणि एक संवेदनशील साहित्यिक कवयित्री म्हणून डॉ. अंजुश्री मेटकर या परिसरात ओळखल्या जातात. अनेक सामाजिक समस्यांवर त्या ‘ब्लॉग’ लिहितात. नवीन कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे असून, नरेंद्र मोदी सरकारने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कायद्यांमध्ये तरतुदी समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे या कायद्यांच्या विरोधात होणारे आंदोलन कुचकामी आहे, हे त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यासंदर्भातही त्या जनजागृती करतात.
 
 
तसे पाहिले तर सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या डॉ. अंजुश्री मेटकर या पूर्वाश्रमीच्या अंजुश्री निकुंभ. त्यांचे वडील वसंतराव हे पशूंचे डॉक्टर, तर आई गृहिणी. निकुंभ कुटुंब मूळचे येवला-नाशिकचे. पण, वसंतराव कामानिमित्त पुण्यात आले. निकुंभ दाम्पत्य मुलगा-मुलगी असा भेद न मानता, मुलांचे संगोपन करत होते. वसंतराव मुक्या प्राण्यांची सेवा करायचे. ते पाहून अंजुश्री यांनी ठरवले की, आपणही डॉक्टरच व्हायचे. डॉक्टर होण्यासाठी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे होते. त्यामुळे अंजुश्री अभ्यासात कधीच मागे राहत नसत. पहिली ते दहावी नेहमीच त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. दहावीला त्यांनी पहिल्या १०० मुलांमध्ये ८७वा क्रमांक पटकावला. त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला. आपण नक्कीच डॉक्टर होऊ, केवळ अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकास करायला हवा, असा निर्धार त्यांनी केला. या काळात अंजुश्री यांनी वक्तृत्व स्पर्धेतही अनेक पारितोषिक पटकावली. हिंदी भाषेत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. पुढे त्या वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, त्यांचा विवाह पंढरपूरच्या मेटकर कुटुंबातील डॉक्टर अशोक मेटकर यांच्याशी झाला. मेटकरही त्यावेळी शिकतच होते. शिक्षणासाठी तेही शहराबाहेरच होते. त्यामुळे विवाह होऊनही तीन वर्षे अंजुश्री आणि अशोक यांना एकत्र राहता आले नाही. सुट्टी पडल्यावर ते कधीतरी घरी येत. पुढे अंजुश्री वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करत डॉक्टर झाल्या. पण, त्याचीही कहाणी आहे. त्यावेळी त्या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या.
 
‘इंटर्नशिप’ संपली आणि त्याच्या दुसर्‍या दिवशीच त्यांना मुलगा झाला. त्याच वेळी अशोक यांचेही शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांना मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव येथे नोकरी लागली. त्यावेळी अंजुश्री यांनी सासरी विचारले की, “आपण इथे दवाखाना उघडूया का?” तर घरच्यांनी नकार दिला. लग्न होऊनही एकत्र राहता येत नाही म्हणून आणि वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग व्हावा, म्हणून मग अंजुश्री यांनीही मुंबईत नोकरी मिळवली. पतीसोबत मुलाला आणि आपल्याला राहता येईल, हा हिशोब. पण, त्यांच्या सासूबाईंनी मुलाला परत बोलवून घेतले. अशोक यांनी नोकरी सोडली. त्यामुळे अंजुश्रीही मुलाला घेऊन पंढरपुरात आल्या. आपली चांगली शेतीभाती आहे. श्रीमंत आहोत, आपल्याला काय करायचा दवाखाना काढून, असे सासूबाईंचे म्हणणे होते. पण, अशोक हे जवळच्या गावातील इस्पितळात डॉक्टर म्हणून रुजू झाले. अंजुश्रीही तिथे गेल्या. तिथे एक खोली, ना न्हाणीघर होते, ना शौचालय. तिथे मग अंजुश्री यांनी आरोग्यसेवा सुरू केली. त्याचबरोबर त्याच परिसरातल्या दुर्गम भागातही आरोग्यसेवा सुरू केली. घरचं आटपून ९ वाजता त्या दुर्गम भागात जात. संध्याकाळी घरी येत. मग गावात रुग्णांना तपासत. पुढे मुलगा मोठा झाला. त्याच्या शिक्षणाचा प्रश्च होताच. तसेच अशोक यांची बदलीही झाली. पण, पंढरपुरात दवाखाना उघडायचा नाही, हे सासरकडच्यांचे म्हणणे. मग मुलाच्या शिक्षणासाठी अंजुश्री पुण्यात आल्या. पुण्यात त्यांनी पुन्हा वैद्यकीय सेवा आणि साहित्य सेवा सुरू केली. ‘समाजभान जपणार्‍या डॉक्टर’ म्हणून त्यांचा लौकिक आहे. अंजुश्री म्हणतात की, “भूतदया हा मोठा गुण आहे. आपल्याकडे सेवा करण्याची शक्ती आहे, तर ती का गमवावी?”
 
 
@@AUTHORINFO_V1@@