एवढी मोठी घटना होऊनही प्रशासन कारवाई करत नसेल, तर शोकांतिका आहे- चित्रा वाघ.
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये १० नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मध्यरात्री अचानक अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली होती. ज्यावर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. ही भंडारा दुर्घटना काळाआड जातेय न जातेय; तोच महाराष्ट्रात बालकांच्या जीवाशी राज्यातली आरोग्यव्यवस्था किती निष्काळजी आहे, याचा प्रत्यय आला. पोलिओ लसिकरणादरम्यान यवतमाळ येथे १२ बालकांना पोलिओ डोसऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती, पंढरपूर येथे एका बालकाने पोलिओ लसीच्या बाटलीचे झाकण गिळल्याची घटना घडली होती तर नाशिक येथे आरोग्य सेवकांऐवजी सुरक्षारक्षकानेच बालकांना लस दिल्याची घटना घडली होती.
याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने मुंबईतील दाटीवाटीच्या भागात असलेल्या खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालयांची झाडाझडती घेतल्यानंतर तेथील उणीवांमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईतील एकूण ११०९ खासगी नर्सिंग होमची आणि हॉस्पिटल्सच्या अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली. यामध्ये २१९ खासगी नर्सिंग होम, रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले.
या सगळ्या घटनांचा विचार करता, २०२० या वर्षात आपली आरोग्यव्यवस्था किती भक्कम असायला हवी, याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला. अनेकांनी सोशल मिडीयावर याबाबत नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकार आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर याबाबतीत राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आणि याबाबत "मुख्यमंत्री म्हणाले होते दोषींवर गुन्हे दाखल होतील, काय झाल त्याचं?" असा थेट सवालही त्यांनी केला आहे.