वणंद गाव : समरस समाजाचे प्रतीक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2021   
Total Views |

vandan gav_1  H
माता रमाई आंबेडकरांचे जन्मगाव रत्नागिरी दापोलीतले वणंद. या गावाला ‘आमदार आदर्श ग्राम विकास योजने’अंतर्गत भाजप आमदार भाई (विजय) गिरकर यांनी दत्तक घेतले आहे. यावर्षीही रमाई जयंतीला वणंद गावी गेले. त्या गावाचे आणि रमाई स्मारकाचे बदलते रूप चटकन जाणवले. माता रमाई जयंतीनिमित्त आता रमाईच्या जन्मस्थळीही गर्दी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भगिनी इथे रमाई जयंती साजरी करायला येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींचा घेतलेला मागोवा...
 
 
वणंद गावात रमाईच्या स्मारकाची निर्मिती, त्याचे सुशोभिकरण, येणाऱ्या पर्यटकांसाठी सुसज्ज निवासस्थान, बाजूच्या बुद्धविहाराचे सुशोभिकरण, गावात व्यवस्थित दळणवळणासाठी रस्ते, पाण्याची व्यवस्था, तेथूनच जवळ असलेल्या काळकाई कोंड येथील बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या जुन्या वास्तूचे जतन आणि सुशोभिकरण, बाजूच्या वसतिगृहाचे बांधकाम आणि सुशोभिकरण असे अनेक उपक्रम विविध प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून ‘आमदार आदर्श ग्राम विकास योजने’अंतर्गत भाई गिरकरांनी राबविले. या सर्व कामासाठी चंद्रमणी गमरे यांचे अमूल्य सहकार्य लाभले. सोबतीला मयुर देवळेकर आणि योजना ठोकळे हेसुद्धा आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी या गावात रमाईच्या जयंतीनिमित्त गेले होते. तिथे ‘आदर्श गाव आमदार योजने’अंतर्गत सर्वत्र बांधकाम सुरू होते. नियोजनाप्रमाणे कार्यवाही होत होती. भाई गिरकर, चंद्रमणी गमरे, मयुर देवळेकर, योजना ठोकळे आदी मान्यवरसुद्धा या स्थळी आले होते. मात्र, हे सर्व जण केवळ माता रमाईला वंदन करण्यासाठी आले नव्हते. ‘आदर्श ग्राम योजने’अंतर्गत गावामध्ये काय काय योजना कार्यान्वित झाल्या, तसेच चौकटीबाहेर जाऊन आणखीन या गावासाठी आणि स्मारकासाठी काय काय करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी भाई गिरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जबाबदार कार्यकर्ते तिथे उपस्थित होते.
 
 
वणंद गावात आता कमालीची गर्दी झाली होती. लेकराबाळांना घेऊन आयाबाया बसमधून वणंदच्या रमाई स्मारकाला भेट द्यायला आल्या होत्या. पांढऱ्या साड्या नेसलेल्या, पांढरे पोषाख परिधान केलेल्या शेकडो महिला रमाई स्मारकाच्या आजूबाजूला जमल्या होत्या. दरवर्षीपेक्षा ही संख्या जास्त होती. कारण, आता ‘आदर्श ग्राम योजने’अंतर्गत तिथे निवासस्थान होते, अंघोळ आणि प्रात:विधीसाठी शौचालये होती. परिसर स्वच्छ केलेला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची चांगलीच सोय झाली होती.
यावेळी एक महिला म्हणाली, “माय औंदा इथं चांगली येवस्था हाय. आमी किती वर्सापासून येतो. आबाळ व्हायची पण रमाईसाठी यायचो. आता कसं गोड वाटतं.” तिला महिलांनी दुजोरा दिला. त्यांच्या प्रतिक्रिया पाहून वाटले की, ‘आदर्श ग्राम योजने’अंतर्गत भाई गिरकर आणि पर्यायाने भाजपने केलेल्या या कार्याला लोकपसंतीची पावतीच होती. पण अर्थातच काही लोकांचा आक्षेप नको म्हणून तिथे भाजपचा झेंडा लावलेला नव्हता. परिसरात भाई गिरकरांच्या स्वागताचे एक दोन बॅनर होते. पण रमाई स्मारकाच्या गेटसमोर सगळ्यात मोठे बॅनर होते ते बहुजन समाज पक्षाचे आणि त्यावरील ‘बहन मायावती’चे. ‘भारतीय बौद्ध पंचायती’चे बॅनर लागलेले होते. येणाऱ्या बहुतेक बसेसवर ‘भारतीय बौद्ध पंचायती’चे बॅनर होते. आयाबाया दर्शन घेऊन स्मारकाच्या आजूबाजूच्या सावली असलेल्या जागेत बसल्या होत्या. आपापल्या सोबत आणलेले जेवणाचे डब्बे त्या खात होत्या. या महिला मंडळांशी बोलले. बहुसंख्य महिला म्हणाल्या की, “धम्माचं काम आहे. त्यामुळे इथं यायलाच पाहिजे.” धम्माचे काम कसं? विचारल्यावर त्यातील एक जण म्हणाली, “आम्ही बौद्ध आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी माणूस बनवलं. त्यांना साथ दिली ती रमाईनं. त्यामुळे आम्ही इथं येतो.” काही जणींचे म्हणणे की, स्थानिक राजकीय पक्षांनी या महिलांना इथपर्यंत येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
वातावरणाला जत्रेचे स्वरूप आले होते. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांचे फोटो, पुतळे तिथे विक्रीला होते. निळी जाकिटे, निळा रुमाल, निळी टोपी विक्रीला होती. मेणबत्या आणि अस्टरची फुले असलेल्या स्टॉल्सना भरपूर गर्दी होती. तसेच इथे तथागतांचा आशीर्वाद म्हणून गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा असलेले कॅलेंडर होते. त्याचप्रकारे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा असलेलेही कॅलेंडर होते. गावातील स्थानिक महिलांनीही तिथे विक्रीसाठी खाद्यपदार्थ ठेवले होते. करवंदाचे लोणचे, आंब्याचे लोणचे, कोकम सरबत, सोलकढी, चटण्या आणि खूप काही. पण या वस्तू कुणीही घेताना दिसले नाही. पण या सगळ्या गर्दीत सगळ्यात मोठे जे तीन स्टॉल्स होते ते सर्व बुक स्टॉल्स होते. दोन वर्षांपूर्वी हे स्टॉल नव्हते. कल्याणचे ‘नागसेन बुक स्टॉल’वालेही येथे होते आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीला स्टॉल लावणारेही येथे होते. या बुक स्टॉल्सना तशी गर्दी नव्हतीच. एक-दोन लोक पुस्तक पाहायला जात. त्या बुक स्टॉल्सकडे गेले. ‘शिवाजी कोण होता?’ ‘महात्मा रावण’, ‘बहुसंख्याकांची क्रूर संस्कृती’, ‘मराठाही शुद्र’, ‘मनुस्मृती’, ‘हिंदूंची अवनती’, ‘खरे रामायण’ वगैरे वगैरे पुस्तके होती. शेकडो पुस्तक होती. त्यातली दहा टक्के पुस्तके केवळ बाबासाहेबांवर आधारित होती. त्या स्टॉलवर असलेल्या काही पुस्तकांवरून तर समाजात वादळं उठलेली. आता त्या पुस्तकांना तिथे कुणी खरेदी करत नव्हते, हा भाग वेगळा. काही फायदा नसताना हे स्टॉल इथे का लागलेे असतील? त्यातील एका माणसाला विचारले. त्याचे म्हणणे की, बहुजन समाजाला आपला खरा इतिहास आणि खरा शत्रू कोण हे समजायला पाहिजे. या सगळ्या पुस्तकातून लोकांना हे सत्य कळेल. आज ना उद्या हे मोठे पर्यटनस्थळ होणार. इथे तेच लोक येणार ज्यांची बाबासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यातील एक-दोन जणांना जरी या पुस्तकांतल्या विचारांबद्दल ओढ निर्माण झाली तर बस्स! ”
पुढे भाई गिरकर आणि त्यांच्या गटासोबत एक बैठक होती. भाई म्हणाले की, “आपण पुढच्या वर्षीपासून येथे अन्नदान आणि इतर सेवाकार्य असलेला स्टॉल लावायचा. आता इथे येणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे. आपण त्यांच्या सेवेत कुठेही कमी पडता नये.” हे ऐकून वाटले की, “विखारी विचारांना अल्पकाळ भुलतो. मात्र, स्नेह आणि सेवा ही अशी माध्यमे आहेत जी दोन परस्पर धु्रवांवर असलेल्या लोकांनाही जोडतात.” इतक्यात बैठकीला वंदना कोचरे, उपायुक्त कोकण प्रांत, समाज कल्याण या आल्या. त्यांनी भाई गिरकर यांचे आभार मानले. कारण, भाई गिरकरांनी बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या काळकाई कोंड येथील बाबासाहेबांचे निवासस्थान आणि रमाईचे जन्मस्थान प्रशासनाच्या माध्यमातून विकसित करत आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून या दोन्ही वास्तूंची पूर्ण प्रगती करण्याची जबाबदारी वंदना यांच्यावर होती. बाबासाहेबांचा आणि रमाईचा सहवास लाभलेल्या वास्तूबाबत काम करण्याची संधी मिळाली म्हणून वंदना कृतकृत्य झाल्या होत्या. यावेळी भाई गिरकर यांनी या सर्व उपक्रमांबद्दल चर्चा केली. चंद्रकांत गमरे, मयुर देवळेकर, योजना ठोकळे यांनीही आपापली मते व्यक्त केली.
 
 
 
वणंद गावात विविध समाज गुण्यागोविंदाने नांदतो. मी ब्राह्मण, मी गुर्जर, मी मराठा, मी वाणी वगैरे असा कोणताही भेदभाव न मानता सगळा समाज रमाबाईच्या स्मारक सुसज्जतेसाठी सज्ज होता. रमाई आमच्या गावची लेक म्हणून सगळे अभिमानाने सांगत होते. हे सगळे पाहून वाटले की, समाजात हा ब्राह्मण, तो मराठा, हा इतर मागासवर्गीय, तो मागासवर्गीय असा भेदभाव करणारे आणि समाजात विद्वेष पसरवणाऱ्या समाजकटंकांनी या गावाला आणि गावातील रमाईच्या स्मारकाला एकदा तरी भेट द्यावी. इतकेच काय, भाजप भटा-ब्राह्मणांचा आणि शेटजी-भटजींचा पक्ष असे म्हणणाऱ्यांनीही इथे यावे. भाजपच्या आमदार भाई गिरकर यांनी डॉ. बाबासाहेबांचे वंशज भीमराव आंबेडकर यांच्या सहकार्याने इथे रचलेला इतिहास या लोकांनी पाहावा. कारण, रमाईचे वणंदगाव हे समरस समाजाचे प्रतीकच आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@