विकासाच्या रुळावर सुसाट मुंबई लोकल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2021   
Total Views |

Mumbai Local_1  
 
 
 
 
दि. १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी काही ठरावीक वेळेत मुंबई लोकलचे दरवाजे खुले झाले. या ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबईतही रेल्वेच्या अनेकविध विकास प्रकल्पांची कामे सुरुच होती, तर काही प्रस्तावित आहेत. तेव्हा, विकासाच्या रुळावर सुसाट असलेल्या मुंबई लोकलसंबंधी विकासकामांचा आढावा घेणारा हा लेख...
 
मुंबईची ‘जीवनवाहिनी’ अर्थात उपनगरीय लोकल रेल्वेसेवा ‘टाळेबंदी’च्या काळात इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ३१४ दिवस सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद ठेवण्यात आली होती. दि. १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे अखेरीस खुले करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ, पैसा, श्रम यांची एकूणच बचत होणार असून पुन्हा एकदा मुंबईकरांचा प्रवास सुसाट झाला आहे. कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे भारतीय रेल्वेही कधी नव्हे ती ठप्प पडली. भारतीय रेल्वेला या ‘लॉकडाऊन’च्या काळात ३५ हजार कोटींहून जास्त तोटाही सहन करावा लागला. परिणामी, रेल्वेचे अतोनात नुकसान झालेच, पण बंद असलेल्या या वाहतुकीचा रेल्वेने विकासकामांसाठीही योग्य वापर करुन घेतला, हे निश्चितच कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
 
मुंबई लोकल सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत (१ ते ३ फेब्रुवारी) दररोज सरासरी उपनगरी रेल्वेमधून ८० लाखांऐवजी फक्त ३२ लाख लोकांनी प्रवास केला. परंतु, प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून ‘चेन्नई पॅटर्न’ वापरल्यामुळे लोकलच्या सध्याच्या वेळा प्रवाशांसाठी सोईच्या ठरलेल्या नाहीत. खरंतर रेल्वेने राज्य सरकारकडे कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा आग्रह गेल्या पाच वर्षांपासून धरला आहे. पण, समन्वयाअभावी आणि या धोरणाला प्रतिसाद नसल्याने अजून त्याबाबतीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. ‘लॉकडाऊन’ काळात उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये खंड पडला असला तरी रेल्वेने आता विविध सेवा, योजना प्रवाशांसाठी आखल्या आहेत. त्याची थोडक्यात माहिती करुन घेऊया.
 
महिला रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ‘व्हॉट्स अ‍ॅप समूह’द्वारे, ‘स्मार्ट सहेली योजना’, महिला प्रवासी, स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटनाद्वारे होते. मध्य व पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यात दुप्पट (३०० चे आता ६५०) पोलीस कर्मचारी तैनात असतील. तसेच मध्य रेल्वेच्या महिला डब्यातून आपत्कालीन प्रसंगाच्या वेळेस गार्डशीही थेट संपर्क साधता येतो. रेल्वे प्रवास होणार अधिक कल्पक : गाडी सुटण्याआधी बेल वाजणे, डब्यात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, ‘वॉटर कुलर’ असणे, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटांची प्रिंट मिळणे इत्यादी अनेक सुविधा प्रवाशांना पुरवायचे रेल्वेने ठरविले आहे.
 
वातानुकूलित गाड्या
 
रेल्वेने वातानुकूलित गाड्या सुरू केल्या असल्या, तरी या गाड्यांना प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळालेला दिसतो. या गाड्यांचे तिकीटदर परवडत नसल्याने ते कमी करावे म्हणून प्रवाशांनी मागणी केली आहे. म्हणून आता रेल्वेने पश्चिम व मध्य उपनगरी सेवांकरिता ७८ अर्धवातानुकूलित गाड्यांची घोषणा केली आहे. १२ डब्यांच्या गाडीत तीन किंवा चार डबे वातानुकूलित व उर्वरित विना-वातानुकूलित असणार आहेत.
 
अस्मानी संकटाचा सामना
 
कमी उंचीच्या ‘भेल’ बनावटीच्या लोकल गाड्या दि. २६ जुलै २००५च्या मुंबईच्या महापुरात मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या ‘बंबार्डिअर’ बनावटीच्या लोकल्स रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या. रोज ८० लाख प्रवासी वाहून नेणार्‍या रेल्वेकडे आपत्कालीन यंत्रणा नसल्याने दि. २६ जुलै, २००५ रोजी व २०१९ साली वांगणी येथे आलेल्या पुराचे संकट प्रकर्षाने जाणविले. या पूरपरिस्थितीत रेल्वेने त्यावेळी ‘एनडीआरएफ’च्या पथकांची मदत घेतली होती. म्हणूनच आता रेल्वे प्रशासनाने पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आठ आधुनिक बोटी व १०० हून अधिक प्रशिक्षित जवानांचा ताफा असलेली पथके स्थापन केली. इतर उपाययोजनांमध्ये रेल्वे रूळ उंचावण्याचे काम हाती घेण्यात आले. सखल भागातील साडेतीन किमी रुळांचे (कुर्ला, चुनाभट्टी, माटुंगा, माहिम, दादर) काम पूर्ण झाले आहे. ३३ धोकादायक ठिकाणी ‘हिल गँग’ची टेहळणीही सुरू केली आहे.
 
उपनगरीय स्थानके व टर्मिनसचेनूतनीकरण व सुविधा
 
‘लॉकडाऊन’च्या काळात पश्चिम रेल्वेवरील ५२ व मध्य रेल्वेवरील ७८ सरकते जिने कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आले होते, जे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे अपंग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होतात. प्रवाशांच्या तक्रारीनंतर हे जिने मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील, असे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. विमानतळाच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे केवळ १० रुपये सेवाशुल्क भरुन उपलब्ध असलेल्या आधुनिक प्रतिक्षालयालाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुंबई विभागातील इतर महत्त्वाच्या स्थानकांवरही अशी सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या दादर व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अशाप्रकारच्या प्रतिक्षालयाचे काम सुरू आहे. परळमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांनाही ही लोकल-टर्मिनससारखी व्यवस्था पुरविली जाणार आहे. वांद्रे टर्मिनस व जोगेश्वरी टर्मिनसमध्येही आगामी काळात ही सुविधा उपलब्ध होईल.
 
 
पश्चिम रेल्वेस्थानकांवरील कामे
 
 
नाना शंकरशेठसह (मुंबई सेंट्रलचे नवीन नाव) सहा इतर स्थानकांत केशकर्तनालय सेवा सुरु होणार आहे. चर्चगेट स्थानकातील पादचारी पूल, तिकीट आरक्षण केंद्र, सरकते जिने, प्रवेशद्वार, प्रतिक्षालय, स्थानकातील गर्दी रोखणे, गैरप्रकारांना आळा घालणे, यावर आता आधुनिक कक्षातून देखरेख ठेवली जाईल. चर्चगेट, लोअर परळ इत्यादी पश्चिम रेल्वेच्या २५ स्थानकांत हरित उपक्रमाची सोय करण्यात येणार आहे. चर्चगेट, ग्रँट रोड इत्यादी मुंबई विभागातील २२ स्थानकांत ‘रुफ टॉप सौरऊर्जे’ची उभारणी करण्यात येणार आहे. चर्चगेट ते विरार येथे १,५२९ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. चर्चगेटला स्थापत्यकामाच्या संरचनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे.
 
मध्य रेल्वे स्थानकांवरील कामे
 
मध्य रेल्वेच्या १५ रेल्वे स्थानकांवर ‘ई-पास’ योजना कार्यान्वित केली जाणार आहे, तर ठाणे स्थानकावर तिकीटधारकांना ‘ईसीजी’ सेवा फक्त ५० रुपयांत पुरविण्यात येणार आहे. ८० स्थानकांवर ‘एक्सलेटर’ व ५० स्थानकांवर लिफ्ट बसविण्याचे कामही सुरु आहे. तसेच सीएसएमटी, दादर, लो. टिळक टर्मिनस आदी स्थानकांवर पिकदाणी बसविण्यात येणार आहे. १६० वर्षं जुन्या असलेल्या भायखळा रेल्वे स्थानकाचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. सीएसएमटी व इतर आठ स्थानकांवर कुल्हड (मातीच्या भांड्यात) चहाचाही आस्वाद प्रवाशांना घेता येईल. त्याचबरोबर ११ रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन कक्षाची स्थापना केली जाईल आणि १३ रेल्वे स्थानकांतील पायाभूत सेवांमध्ये सुधारणा होणार आहे. सीएसएमटीच्या परिसरातील पुनर्विकास कामांना गती प्राप्त होणार असून त्यासाठी ६० वर्षे कंत्राटदार-देखभालीचा करार करण्यात येईल.कळवा-ऐरोली जोडमार्ग स्थानकाची उभारणी दोन वर्षांमध्ये होणार असून लवकरच ठाणे-दिवा वेगवान प्रवास मार्ग सुरू होणार आहे. हार्बरवर गोरेगाव-पनवेल लोकलकरिता पावसाळ्यानंतर विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
 
 
लांबपल्ल्याच्या नवीन गाड्या
 
 
आगामी चार वर्षांत पनवेल-कर्जत थेट लोकल सेवा कार्यान्वित करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने निर्धारित केले आहे. तसेच नेरुळ-बेलापूर/खारकोपर सेवा मार्ग २० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. पुणे-कोल्हापूर जलद रेल्वेमार्गाची तयारी लवकरच सुरु होणार आहे. तसेच एका तासामध्ये प्रवास पूर्ण व्हावा, असा प्रस्ताव पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाकरिता विचाराधीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारीत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला जोडणार्‍या आठ रेल्वेमार्गांचे उद्घाटन केले. ‘मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस’ १४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. तसेच सप्टेंबरपासून वेगवान ‘राजधानी एक्सप्रेस’ (सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन) रोज सुरू होणार आहे. दि. ९ ऑक्टोबरपासून ‘सुपरफास्ट’ आणि ‘इंद्रायणी’ मुंबई-पुणे मार्गाच्या गाड्या सुरू होतील. दि. १७ डिसेंबरपासून भारत सरकारने पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंतची रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माथेरानची राणी’ (अमर लॉज ते माथेरान) गाडी नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ‘बुलेट ट्रेन’ (मुंबई-अहमदाबाद) मुंबईतूनच धावण्यासाठी वांद्रे-कुर्ला स्थानक (भूमिगत टर्मिनस) उभारणीची निविदा १९ फेब्रुवारीला खुली होणार आहे. त्या निविदांना प्रतिसाद देण्याकरिता सात कंपन्या सज्ज झाल्या आहेत. २८ पूल बांधणीच्या कामाचे निविदा काम पूर्ण होऊन १,३९० कोटींचे कंत्राट ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीला देण्याचे ठरले आहे. ‘बुलेट ट्रेन’ एकूण ५०८ किमी कामापैकी वापी ते वडोदरा (२३७ किमी रेल्वे काम) ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीला (रु. २४,९८५ कोटींचे कंत्राट) देण्याचे ठरले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ‘बुलेट ट्रेन’ला टोकाचा विरोध असल्याने वांद्रे-कुर्ला संकुलातील स्थानक उभारण्याच्या क्रियेवर राज्य सरकार काय भूमिका घेते, ते पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
 
कामाकरिता निधीचे बळ
 
मुंबई-अहमदाबाद या ५०८ किमी लांबीच्या ‘बुलेट ट्रेन’ कामाकरिता एकूण ७,८९७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात २३ टक्के व गुजरातमध्ये ८३ टक्के भूसंपादन झाले आहे. मुंबई शहर परिवहन प्रकल्पकामासाठी अर्थसंकल्पात ६७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये १०.९ कोटी टन मालवाहतुकीतून (कोळसा, लोखंड, अन्नधान्य, खते, सिमेंट इत्यादी) रेल्वेने विक्रमी १०,६५७ कोटींची कमाई केली आहे. रेल्वेने अशा विविध सेवा प्रवाशांकरिता पुरवायचे ठरविले आहे. परंतु, योग्य समन्वयाकरिता मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे एकत्रीकरण होणे आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@