शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2021   
Total Views |

Mangesh Kadam_1 &nbs
 
 
 
एसएनडीटी विद्यापीठामध्ये दूरस्थ शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक मंगेश कदम. वाट्याला आलेल्या ‘नाही रे’ परिस्थितीला प्रचंड मेहनत आणि समन्वय सलोख्याने ‘आहे रे’ परिस्थितीत त्यांनी बदलवले. त्यांच्या जीवनचरित्राचा मागोवा...
 
"तथागत गौतम बुद्धांनी अंहिसा शिकवली, माणूस म्हणून जगण्याचा मार्ग सांगितला. त्यामुळे कुणाही व्यक्तीचा, संस्थेचा आणि समाजाचाही द्वेष करणे टाळायला हवे. समाजातील युवकांना आता प्रगतीच्या भरपूर संधी आहेत. नकारात्मक गोष्टी दुर्लक्षित करून सकारात्मक जीवन जगणे हाच जीवनाचा मंत्र आहे. अत दीप भव,” असे एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ केंद्राचे प्रभारी संचालक मंगेश कदम सांगतात. डॉ. मंगेश कदम हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी एम.ए. राज्यशास्त्र, युजीसी नेट, पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि पीएच.डी.ही केली आहे.
 
 
एसएनडीटी विद्यापीठामध्ये रुजू झाल्याबरोबर त्यांनी अनेक नवे उपक्रम कार्यान्वित केले. ते म्हणजे, तृतीयपंथींना उच्चशिक्षणाची द्वारे खुली करणे, तुरुंगातील भगिनींना तुरुंगात जाऊन शिकवणे आणि त्यांना उच्चशिक्षणासाठी प्रेरीत करणे, त्यांना शिक्षण देणे, तसेच ‘एचआयव्ही’बाधितांना दूरस्थ शिक्षणाचा लाभ देणे, ग्रामीण भागातील महिलांना दूरस्थ शिक्षण उपलब्ध करून देणे. त्यांनी ‘पीएच.डी.’ केली, तीही ‘राज्यशास्त्र’ विषयातून. त्यांचा विषय होता, ‘स्थानिक राजकीय नेतृत्व - मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांचा अभ्यास’. आपल्या प्रबंधातून त्यांनी निष्कर्ष काढले की, सामाजिक, राजकीय, आर्थिक संस्थात्मक आधार हे घटक निवडणुकीत उमेदवारांचे भविष्य ठरवतात. असो. मंगेश यांची कारकिर्द आणि कार्य पाहिले की वाटते, मंगेश यांच्या घरी शिक्षणाचा वारसा असावा आणि त्यांना आयुष्याच्या वाटेवर भक्कम आधार असावा. मंगेश यांच्या आयुष्याचा पट पाहिला तर जाणवते की, डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. बाबासाहेबांचे हे वचन मंगेश आजही यथार्थ जगत आहेत.
 
 
कदम कुटुंब मूळचे रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खोपी गावचे. हरिश्चंद्र कदम आणि सरस्वती कदम यांना पाच अपत्ये. चार मुले आणि एक मुलगी.कामानिमित्त हरिश्चंद्र मुंबईत स्थायिक झाले. ते रेल्वेत चतुर्थश्रेणी कामावर. पगार तसा यथातथाच. कुटुंबाला दोन वेळचे अन्नही मिळणे मारामार. या पगारात मुलांचे शिक्षण होणे अशक्य. मुलांनी शिकायलाच हवे, अशी सरस्वतीबाईंची इच्छा. त्यामुळे मुंबईतील खर्च टाळण्यासाठी त्या मुलांना घेऊन पुन्हा खोपी गावात आल्या. हरिश्चंद्र मनिऑर्डर पाठवत. त्यावर सरस्वतीबाई घर चालवत. दारिद्य्रासोबत येणारे सारेच घटक या कदम कुटुंबाकडे हजर होते. वस्तीतले वातावरणही असे की, मुलांना शिक्षणाची गोडी लागू नये. या सगळ्या वातावरणात सरस्वतीबाईंनी मुलांना कोणतीही वाईट संगत किंवा संस्कार घडू नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या मुलांना सांगत, “कुणी आपल्याशी कसाही वागो, आपण त्याच्याशी चांगलेच वागायचे. नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय?” मंगेश यांनी आईचे उद्गार कायम स्मरणात ठेवले.
 
 
मंगेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. कदम कुटुंबातली मुलं अभ्यासू आणि शिस्तप्रिय. सर्वांशी मिळून-मिसळून राहायची. गावातली उच्चभ्रू कुटुंबं कदम कुटुंबातल्या मुलांची नावं काढायची. त्यांच्या मुलांना मंगेश आणि त्यांच्या भावंडांचे दाखले द्यायची. जातीयतेचा अनुभव मंगेश यांना शाळेत कधीही आला नाही. शाळेत शिंदे नावाचे शिक्षक होते. त्यांनी समाज आणि देशप्रेमाचे संस्कार मंगेश यांच्यावर केले. पुढे शिक्षणासाठी ते मुंबईला आले. येथे त्यांचे तीन भाऊ आणि वडील एकत्र राहू लागले. त्यांनी कीर्ती महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण, तेही घरातल्यांच्या आग्रहाखातर. त्यांना कला शाखेत शिक्षण घ्यायचे होते. विज्ञान शाखेची आवड नसल्याने, तसेच मुंबईतल्या छोट्याशा खोलीत अनंत अडचणींना तोंड देत राहत असल्याने, तसेच त्याच काळात अभ्यासात हुशार असलेल्या मोठ्या भावाला परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण न घेता कामाला रुजू व्हावे लागले; त्याची निराशा, त्यातच वडिलांचे दारूचे व्यसन. या सर्वांचा एकत्रित परिणाम मंगेश यांच्या मनावर झाला.
 
 
ते कसेबसे अनपेक्षितपणे बारावी उत्तीर्ण झाले. मग त्यांनी ठरवले की, आपण कलाशाखेत प्रवेश करायचा आणि त्यांनी कलाशाखेत प्रवेशही घेतला. तिथे प्रा. डॉ. अरुणा पेंडसे यांनी मंगेश यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप मेहनत घेतली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरे तर मंगेश शिकणार नव्हते. डॉ. अरुणा यांनी मंगेश यांना सांगितले की, “पुढील शिक्षणासाठी तुझी व्यवस्था पुण्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केली आहे. तू व्यवस्थित शिक.” त्यावेळी त्यांच्या घरातल्यांचे म्हणणे होते की, “बस झाले शिक्षण. नोकरी करावी, कशाला पुण्याला जायचे?” पण, मंगेश यांनी पुढील शिक्षणाचा निर्णय घेतला. पुण्याला आले आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. तिथे डॉ. यशवंत सुमन सर यांनी मंगेश यांच्या प्रगतीसाठी भरपूर प्रयत्न केले. मंगेश यांनी २००५ साली ‘नेट’ परीक्षा दिली. यशवंत सुमन सरांनी त्यांच्या नोकरीसाठीही प्रयत्न केले. त्यातूनच २००७ साली मंगेश एसएनडीटी महाविद्यालयात नोकरीसाठी रुजू झाले. आज ते दूरस्थ शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक आहेत. मंगेश म्हणतात, “शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून सुशिक्षित समाजाची पिढी घडावी, हेच माझे उद्दिष्ट आहे.”
@@AUTHORINFO_V1@@