कर नाही तर त्याला डर कशाला?

    08-Feb-2021
Total Views |

Sachin_1  H x W
मनुष्याने एखादा अपराध केलेला नसेल, त्याला त्याबद्दलची भीती वाटण्याचे कारण नाही. ज्याच्या अंगी दोष नसतो तो उजळ माथ्याने फिरतो आणि जो अपराधी असतो त्याला नेहमी धास्ती वाटत असते, असे म्हटले जाते. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटनंतर सुरू झालेल्या गदारोळाबाबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरून सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सचिनने चुकीचे केले की बरोबर, हा विषय नसून त्याने नेमके केले काय, हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर काही परदेशातील कलाकारांनी भाष्य केल्यानंतर ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने ट्विट करत नागरिकांना विशेष आवाहन केले. “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात. पण, हस्तक्षेप करू शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया,” असे आवाहन सचिन तेंडुलकरने केले. सचिनचे खरे ट्विट पाहता त्याने आवाहन करताना शेतकऱ्यांना विरोध आणि सरकारची बाजू लावून धरल्याचे कोठेही स्पष्ट होत नाही. सचिनने कोणत्याही प्रसारमाध्यमांसमोर तसे विधानदेखील केलेले नाही. तरीदेखील काही जणांकडून सचिनच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आपल्या मुलाला ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेत खेळण्याची संधी दिल्याच्या बदल्यात सचिन तेंडुलकर शेतकऱ्यांना विरोध, तर सरकारच्या बाजूने बोलत आहे, असे आरोप करण्यात आले. सरकारची बाजू लावून धरण्यासाठी सचिनवर दबाव टाकण्यात येत आहे, असाही अंदाज काही जणांकडून बांधण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याचा ‘भारतरत्न’ हा सन्मानदेखील काढून घेण्याची मागणी काँग्रेसच्या खासदारांनी केली. संपूर्ण देशभरात यावरून गदारोळ झाल्यानंतर हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चिला जात आहे. मात्र, हे कितपत योग्य आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. आपण ना विरोध केला, ना सरकारची बाजू लावून धरली, हे स्पष्ट असल्यानेच इतका गदारोळ होऊनही सचिनने आतापर्यंत याबाबत प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलेले नाही. ‘कर नाही त्याला डर कशाला?’
 
 

कटू, पण अखेर सत्यच!

 
 
सत्य कटू असते; पण ते नेहमी सत्यच असते, असा सुविचार पूर्वापारपासून अगदी प्रचलित. शेतकरी आंदोलनाबाबत सध्या काहीसे असेच सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटनंतर सुरू झालेला विरोध म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती न पाहताच सुरू झालेला एक प्रकारचा गदारोळ म्हणता येईल. अनेकांकडून टीका करण्यात आल्यानंतरही सचिन अद्याप शांत आहे. त्याने याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. बहुधा तो देणारही नाही. कारण ते त्याच्या स्वभावातच नाही. सचिनचा क्रिकेटमधील इतिहास पाहिल्यावर ते चटकन लक्षात येते. सचिनच्या २३ वर्षांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक प्रतिस्पर्ध्यांनी त्याला चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळातच शांत स्वभावाच्या असणाऱ्या सचिनने आपल्या मुखातून प्रत्युत्तर देत कधीच वाद आपल्या अंगावर ओढवून घेतला नाही. याउलट आपल्या खेळीतूनच चोख प्रत्युत्तर देण्याच्या त्याच्या या शैलीमुळेच त्याला एक महान क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. सचिनला विरोध होण्याची ही काही पहिली वेळ नाही. ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी निवड होतानाही अनेकांनी त्याला विरोध केला. त्याही वेळी तो शांत होता आणि आजही आहे. एका मुलाखतीदरम्यान ‘आपण सर्वात प्रथम भारतीय आहोत’, असे विधान केल्यानंतरही सचिनवर टीका करण्यास सुरुवात झाली होती. मराठी अस्मितेसाठी झगडणाऱ्या काही राजकीय पक्षांनीही त्याच्या या विधानाचा बाऊ केला होता. मात्र, सचिन तेव्हाही शांत राहिला आणि लोण्यातून अगदी केस बाजूला काढावा, अशा अलगद पद्धतीने सचिनने या वादावर पांघरूण घातले. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरही राष्ट्राच्या एकतेसाठी आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे आवाहन खरे तर त्याने यावेळी केले. शेतकऱ्यांची बाजू किंवा सरकारचे समर्थन यांपैकी कोणतीही भूमिका त्याने मांडली नाही. परंतु, हे लक्षात न घेताच अनेकांनी आगपाखड करत त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. याबाबत त्याने मत मांडले तर काय चुकले, याचाही विसर अनेकांना पडला असावा बहुधा. जे शेतकऱ्यांची बाजू मांडतात तेच आपले आणि सरकारचे समर्थन करणारे ते विरोधकच असा समज करून घेणाऱ्यांसाठी कदाचित हे सत्य पचणार नाही. असो. मात्र, सत्य हे कडू असते; पण अखेर सत्यच असते! हे तरी मान्य करायलाच हवे.
 
 
- रामचंद्र नाईक