कोरोना काळातील बालकांचे स्वास्थ्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

CoVid_1  H x W:
 
 
 
घरात बरेच महिने राहिल्यामुळे व शाळा ‘ऑनलाईन’ असल्यामुळे या मुलांचा समवयस्कांशी संपर्क होत नाही. आभासी विश्वात रममाण होताना खऱ्या जगातील रितीभाती, पद्धती, जीवनशैलीपासून लहान वयातच मुले दूर जात आहेत आणि जर हेच आभासी जग खरं वाटू लागले, तर पुढील आयुष्यामध्ये मोठ्या समस्या उद्भवू शकतात. तसे होऊ न देणे, टाळणे हे तरी सध्या घरातील पालकांवर आणि वडीलधाऱ्यांवरच अवलंबून आहे.
 
 
'कोविड-१९’मुळे पहिले ‘लॉकडाऊन’ मार्च २०२० मध्ये झाले. याचा प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनावरथोडा-बहुत परिणाम झाला. बाहेर पडण्यावर बंदी, तोंडावर मास्क, हाताचे वारंवार ‘सॅनिटायझेशन’, गर्दीत न जाणे, सुरक्षित अंतर ठेवणे इ. सुरुवातीच्या काळात, ‘कोविड-१९’ म्हणजे नक्की काय, त्याचा परिणाम त्यावर उपाय इ. सर्वच अनिश्चित होते. लहान मुलांना जशी म्हाताऱ्या आजीची किंवा बागुलबुवाची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीमुळे बाळ ऐकते, तसेच काहीसे चित्र ‘कोविड-१९’ चे होते ‘कोविड-१९’ बद्दल अनेकांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली. लहान मुलांमध्येदेखील ही भीती जाणवत होती. एका नातेवाईकाने सांगितले की, त्यांच्या घरी जरी दारावरची बेल वाजली,तर त्यांचे बाळ “कोविडबुवा आला आहे. दार उघडू नका!” म्हणून सांगायचे आणि रडू लागायचे. काहींचे असे अनुभव आहेत की, घरांतल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनाही ‘घराबाहेर जाऊ नका’ म्हणून ही तान्हुली सांगत. खाली मैदानं ओसाड झालेली. हल्लीहल्ली काही लहान मुले खेळताना दिसतात. काही छोटी मुले अजूनही त्या भीतीतून बाहेर आलेली नाहीत. घराबाहेर जाण्यासाठी ते तयार होत नाहीत. सायकल चालवण्यास, झोपाळ्यावर खेळण्यास, बागेत जाण्यास चक्क नकार देतात आणि आग्रह करून नेले तर रडू लागतात.
 
शिशुवर्गापासून सर्व वर्गांच्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत. काहींची रोज दोन ते पाच तास असते, तर काहींची आठवड्यातून दोन-तीन वेळा असते. बहुतांशी वेळा आई-वडील आणि इतर मोठी मंडळी आपापल्या कार्यात मग्न असतात. लहान मुलांशी खेळण्यास, संवाद साधण्यास, वेळ देण्यास कुणाकडेच वेळ नाही. जी मुले पाळणाघरात जात, त्यांचे ते ‘रुटिन’ही बंद पडले. त्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले. त्याऐवजी वेळ घालविण्यासाठी ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’चे दालन मुक्तहस्ते खुले झाले. वेळ जात नाही, मग कार्टून लाव, ‘नर्सरी र्‍हाईम्स’ बघ. गोष्टी बघ इ. इ. यावरील गोष्टींमधून जे प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे ‘कोविड-१९’मुळे झालेल्या लहान मुलांमधील परिणाम व बदल. या गोष्टी चांगल्या नाहीत. मानसिक-बौद्धिक वाढीसाठी घातक आहेत, असे सांगितले जाई. ‘ऑनलाईन’ मनोरंजनाच्या आधारेच बहुतांशी पालक आपल्या बाळाला गुंतवून ठेवत आहेत. त्यात भर म्हणजे, आई-वडीलदेखील सतत लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात. मुलांना वाटते की, हेच बरोबर आहे. लहान मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना ‘असं कर’ आणि ‘तसं करू नको’ असं सांगून चालत नाही. पण आई-वडील, घरातील इतर मोठ्यांचे वागणे बघून ते आत्मसात करून ते आपापले जग निर्माण करत. मुलांसाठी पहिले गुरू त्यांचे आई-वडीलच असतात. जसे पालक वागतात, जगतात, ते त्यांच्या पाल्यांना (वयाच्या पहिल्या दहा वर्षांपर्यंत) ‘आयडियल’ वाटते व तसेच वागायचे, खायचे, जगायचे असेच ते करतात. उदा. घरात जर वडीलधारी व्यक्ती शिवीगाळ करत असतील, तर लहान मुले ऐकतात, तसेच स्वीकारतात आणि आचरणात आणतात. असेच सर्व गोष्टींबद्दल आहे. उठण्याची पद्धत, खाण्याच्या सवयी, व्यसने, घरातल्या माणसांमधील संवाद, व्यायाम, स्वभाव इत्यादी. त्यामुळेच लहान मुलांना जर चांगल्या सवयी लावायच्या असतील, तर घरातील ज्येष्ठांनी त्या सवयी अवलंबाव्यात, आचरणात आणाव्यात.
 
आता ‘कोविड-१९’ची भीती कशी घालवायची? तर ते काही ‘स्वीच बटण’ नाही की बोटाने ‘ऑन’-‘ऑफ’ करता येत नाही. त्यासाठी प्रयत्न व सातत्याने संवाद गरजेचा आहे. वयानुरुप समजावणे, भीती दूर करणे महत्त्वाचे आहे. ‘त्यात काय... होईल नीट’ असे म्हणून सोडू नये. काही वेळेस घरातील, कॉम्पेक्समधील, कॉलनीमधील परिस्थिती अशी असते की, बाहेर नेणे शक्य नाही. अशा वेळेस या मुलांबरोबर संवाद साधणे, ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘क्वॉलिटी टाईम’ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या वयाला साजेसे खेळणे, गोष्टी सांगणे, पुस्तक वाचणे इ. शारीरिक हालचाल, बौद्धिक व मानसिक स्थैर्य व आधार देतात. अशा गोष्टी सहवासामुळे घडू शकतात. घरात बरेच महिने राहिल्यामुळे व शाळा ‘ऑनलाईन’ असल्यामुळे या मुलांचा समवयस्कांशी संपर्क होत नाही. आभासी विश्वात रममाण होताना खऱ्या जगातील रितीभाती, पद्धती, जीवनशैलीपासून लहान वयातच मुले दूर जात आहेत आणि जर हेच आभासी जग खरं वाटू लागले, तर पुढील आयुष्यामध्ये मोठ्या समस्या उद्भवू शकतात. तसे होऊ न देणे, टाळणे हे तरी सध्या घरातील पालकांवर आणि वडीलधाऱ्यांवरच अवलंबून आहे. आभासी विश्व गरजेचे आहे, पण तात्पुरतेच; कायमस्वरुपी नाही, हे त्यांच्या मनावर बिंबविणे महत्त्वाचे आहे. यासाठी रोजच्या दैनंदिनी दिनक्रमात या लहान मुलांना सामावून घ्या. घरातील छोटी-मोठी कामे त्यांना करायला द्या. त्यांच्याशी गप्पा मारा. संवाद साधा. काही कामं एकत्र करा. शरीराची क्षमता टिकविणे व वाढविणे महत्त्वाचे आहे. यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा. षड्रसात्मक आहार, ताजा आहार (रोजच्या रोज शिजविलेले अन्न) खाणे महत्त्वाचे. नावीन्यतेच्या नावाखाली काहीही करून चालणार नाही. सदसद्विवेक बुद्धीचा वापर करूनच आपण वर्तन करावे. मुलांसमोर काही विषय आवर्जून टाळावेत. काही कृती/व्यसने टाळावीत. मानसिक व आर्थिक ताण मुलांना जाणवू देऊ नये, पण सगळेच, अवाजवी लाड व हट्ट पुरवू नयेत.
 
शरीर, मन व बुद्धी यांचा विकास या वयात होत असतो, तो उत्तम व्हावा यासाठी सकस आहार तर हवाच, पण त्याचबरोबर चांगल्या सवयी व उत्तम आचरणही हवे. घराबाहेर पडण्यावर निर्बंध असल्यामुळे या गोष्टींचे दायित्व संपूर्णपणे घरातील ज्येष्ठ वडीलधाऱ्या व्यक्तींवर आहे. ‘ऑनलाईन’चे व्यसन जर या वयात लागले, तर मोठेपणी त्याचे नकारात्मक परिणाम निश्चित बघायला मिळतील. चांगले खाऊ घालून आपले कर्तव्य संपत नाही. शरीराबरोबरच मनानेही खंबीर व सकारात्मक असणे गरजेचे आहे. यासाठी खेळ वाचन-संवाद इ. उपयोगी पडते. त्याचा अवलंब करावा. ‘अ‍ॅक्टिव्ह पार्टिसिपेशन’ असेल अशी एखादी आवड, एखादा छंद जोपासावा. या पद्धतीने पुढच्या पिढीचे शारीरिक बळ व मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी ठेवणे शक्य आहे.
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@