(ठाण्यात भारतीय जय हिंद पक्षाच्या वतीने भिवंडी ठाणे रस्ता चक्का जाम करण्यात आला)
'चक्का जाम' करण्याची 'ही' आहेत कारणे
नवी दिल्ली : शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या ४० शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी चक्काजामचा नारा दिला आहे. राजस्थान, हरियाणा दरम्यान, शाहजहांपुर सीमेवर हा जाम लावण्यात आला आहे. पंजाब अमृतसह आणि मोहालीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यासाठी रस्त्यांवर धरणे धरले आहे. जम्मू-पठाणकोट हायवेवर शेतकऱ्यांनी रहदारी रोखून धरली आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या चक्का जाम आंदोलन सुरू झाले ते तीन वाजेपर्यंत सुरू होते. दिल्लीतील एहतियातन १० मेट्रो स्थानक बंद करण्यात आले आहे. मंडी हाऊस, ITO, दिल्ली द्वार, विद्यापीठ, खान मार्केट, नेहरू प्लेस, लाल किल्ला, जामा मस्जिद, जनपथ आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानकाचा सामावेश आहे. तिथे एकूण २८५ मेट्रो स्थानके आहेत.
शेतकरी संघटनांचा दावा आहे की, प्रदर्शन शांततापूर्ण राहील.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका, स्कुल बस आणि अन्य गाड्यांना रोखले जाणार नाही. या कायद्यांवर राकेश टिकैत म्हणाले, "दिल्लीत तर प्रत्येक दिवस हा चक्क जामच असतो. आता इथे चक्का जाम करण्याची गरज काय?" दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना चक्का जाम आंदोलनापासून का वेगळे ठेवले, या प्रश्नाचे उत्तर मात्र, त्यांनी दिले नाही. दोन्ही राज्यांतील आंदोलकांना जैसे थे राहण्यास सांगितले आहे. जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना बोलवण्यात येईल.
कृषी आंदोलनाचे अपडेट्स
दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. अतिसंवेदनशील भागांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावरून याबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. "अन्नदात्याचा शांतिपूर्ण सत्याग्रह देशहितासाठीच आहे. हे तीन कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठी नाहीत तर जनतेसाठीही घातक आहेत. या आंदोलनाला पूर्ण समर्थन"
अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल म्हणाल्या कि, "ही केवळ अफवा आहे की कृषी कायद्यांचा विरोध केवळ पंजाबमध्ये होत आहे. विरोध संपूर्ण देशभरात केला जात आहे. याशिवाय केंद्र सरकार याला पंजाबचा विरोध म्हणत आहे."
राजस्थान : सत्ताधारी काँग्रेस पक्षाने शेतकरी आंदोलनाला पूर्णपणे पाठींबा दिला. कोटामध्ये ट्रॅक्टर रॅली निघाली आहे. अलवरमध्ये शेतकऱ्यांनी १० ते १२ जागांवर दगडफेक केली होती. काटेरी कुंपणाच्या जाळ्या टाकून रस्ते जाम केले आहेत.
हरियाणा-पंजाब : शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. सार्वजनिक बसेस बंद करण्यात आल्या आहेत. भिवानी, जींद या भागात १५, यमुनानगर भागात १२, करनालमध्ये १० आणि कॅथलमध्ये पाच जागांवर चक्काजाम करण्यात आला आहे. हिसार आणि पानीपत भागात राष्ट्रीय महामार्ग जाम करण्यात आला आहे. पंजाबमध्ये भाजप वगळता सर्व पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. संगरूर, बठींडा, अमृतसर, पतियाळा, फतेहगड साहीब, फाजिल्का, मुक्तसर, कपूरथला, गुरदासपुर आणि जालंधरच्या वेगवेगळ्या भागात चक्काजाम करण्यात आले आहे.
तेलंगणा : हैदराबादमध्ये राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करणाऱ्या आंदोलकांना पोलीसांनी हुसकावून लावले.
२६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे वाढली सुरक्षा
२६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार भडकला. त्यामुळे प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. दिल्ली-NCR मध्ये पोलीसांनी निमलष्करी बल व राखीव सुरक्षा बलाच्या एकूण ५० हजार जवानांना तैनात करण्यात आले. दिल्लीमध्ये तैनात केलेल्या CRPF तुकड्यांना हिंसाचार रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बसवर संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या आहेत. दगडफेक होण्यापासून रोखण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.
चक्काजाम दरम्यान, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ता क्रमांक 56, NH-24, विकास मार्ग, जीटी रोड, जायराबाद रोड मार्गावर पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे. या भागातील बॅरीकेट्स लावून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली आहे.
चक्काजाम का ?
शेतकरी आंदोलनकर्त्यांनी चक्का जाम करण्याची भूमिका घेतली कारण, १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. दिल्लीतील सीमेवर होणाऱ्या आंदोलनाच्या जागेवर इंटरनेट बंद करण्यात आले आहे. त्याविरोधात हे चक्काजाम करण्यात येत आहे. शेतकरी संघटनांमधील बऱ्याच नेत्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. दिल्ली सीमेवर संपूर्ण बॉर्डर ब्लॉक करण्यात आला आहे. या कारणांमुळे हा चक्काजाम केला जात आहे.
शांतता बाळगण्याचे आवाहन
राकेश टिकैत म्हणतात, "शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २६ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. आता आम्ही जास्त सजग राहणार आहोत. त्यामुळे आमच्याविरोधात होणाऱ्या कारवायांपासून बचाव केला जाऊ शकतो. आंदोलकांनी आपल्या भावनांवर ताबा ठेवायला हवा."
सिंघु बॉर्डरवर परतला 'तो' आरोपी
प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार भडकावणारा आरोपी लक्खा सिधाना हा देशव्यापी चक्काजाम करण्यापूर्वी पंजाबमध्ये परतला. लक्खाने शुक्रवारी सायंकाळी सिंघु बॉर्डरवरून आंदोलकांशी संवाद साधला.