त्यागमूर्ती माता रमाई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2021   
Total Views |

ramabai ambedkar_1 &


आज दि. ७ फेब्रुवारी रोजी माता रमाबाई आंबेडकरांची जयंती. भारतीय संस्कृतीतील स्त्रीजीवनाचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून माता रमाई अग्रणी आहेत. त्यांच्या जीवनातील काही घटनांचा इथे घेतलेला मागोवा.

बाबासाहेब म्हणाले होते की, चारित्र्य महत्त्वाचे! बाबासाहेब म्हणाले होते की, एखाद्या समाजाच्या स्थितीचे अवलोकन करायचे असेल, तर त्या समाजातील स्त्रियांची स्थिती पाहावी. बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा देताना अनेक दुर्गुणांना टाळण्याचा मार्ग सांगितला. जेव्हा आपण रमाईचे जीवनचरित्र पाहतो, तेव्हा रमाईने एकदातरी या सर्वांबाबत बाबासाहेबांशी संवाद साधलेला आहे. खरेच एका यशस्वी आणि समर्थ पुरुषामागे एक खंबीर स्त्री असते. रमाईला ‘माता रमाई’ का म्हणायचे? तर ‘तो होता म्हणून आम्ही आहोत’ असे समाजबांधव जेव्हा बाबासाहेबांबद्दल बोलतात, तेव्हा मी सांगू इच्छिते की, हे खरेच आहे. मात्र, ‘ती’ होती म्हणून ‘ते’ होते; असे रमाई आणि बाबासाहेबांचे सुमधुर नाते.


रमाई तशी अनाथ पोर. बाबासाहेबांशी लग्न झाले. पण, आईने सांगितलेले ती विसरली नाही. रमाईची आई नेहमी म्हणायची, “बाई सगळ्यांना सांभाळून घे. समजुतीने वाग. माहेरचे नाव काढ.” तेव्हा रमाईचे वय तरी किती असेल? बालिकाच होती ती. पण, आईच्या मृत्युपश्चात रमाईने आईचे विचार आयुष्यभर जतन केले. सासरी आली ती सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून! नव्हे नव्हे, सासरी असलेल्या सर्वांची माय म्हणूनच! तिच्या गुणांनी ती कुटुंबाची प्रिय बनली. रमाईच्या सासरीही माणसांचा गोतावळा होता. गरिबी होती. पती बाबासाहेब तर शिकण्यासाठी बाहेरगावीच. त्यामुळे घरातील ज्येष्ठांची सगळी सेवा तिलाच करावी लागली. पण, रमाईने कधीही माहेरची तर सोडाच, सासरचीही निंदा केली नाही. पती दूर परदेशात, पण तिने मुलाचीही उणीव घरातल्यांना भासू दिली नाही. बाबासाहेब परदेशी असताना ती सार्‍या कुटुंबाची आधारस्तंभ बनली. बाबासाहेबांना चारित्र्यवान माणसं आवडत. रमाई ही चारित्र्याची आणि गुणांची खाणच होती.


बाबासाहेब लंडनला शिकत असताना एका पत्रात ते म्हणतात की, लंडनला त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. कधी कधी तर पाणी पिऊन राहावे लागते. हे वाचून रमाईच्या जीवाला घोर लागतो. साहेबांना इथून पैसे पाठवायलाच हवेत, असे ती ठरवते. पण, पैसे कसे मिळवणार? कारण, कुणाकडूनही काही मागायचे नाही आणि ते बाबासाहेबांना आवडणार नाही. तसेच आपल्या मनालाही पटणार नाही. दिवसाउजेडी काम करावे तर शेजारणी म्हणत, “तू काय साहेबाची बायको. तुला काय कमी?” त्यामुळे दिवसाढवळ्या शेण्या-गोवर्‍या केल्या, त्या विकल्या तर साहेबांची इज्जत जाईल. मग रमाई सकाळी ४ वाजता उठायची. शेण्या-गोवर्‍या करून पहाटेच त्या विकायच्या. त्यातून तुटपुंजे पैसे यायचे. रमाई त्यातून दोन भाकर्‍या बनवायची. आत्याबाई, जाऊबाई आणि मुलांसाठी दोन-चार भाकर्‍या बनवायची. त्यातून पैसे राखून ठेवायची. ते पैसे ती लंडनला पाठवू लागली. अर्थात, त्या पाठवलेल्या थोड्या पैशांचा बाबासाहेबांना तसा काय उपयोग होणार होता? पण, रमाईने पाठवलेल्या पैशांना जी भावनिक श्रीमंती होती, ती आजच्या कोट्यवधी रुपयांना नाही.

बाबासाहेब लंडनहून शिकून येतात. त्यांचा सत्कार करायला, सगळे जमतात. रमाईचे दीर तिला पैसे देतात अणि सांगतात, “साहेब येणार आहेत. जा मुलांना आणि तुला नवीन कपडे घे.” रमाई बाजारात जाते. घरातल्या सगळ्यांसाठी कपडे घेते. स्वत:ला नवीन कपडे घ्यावेत, असे तिला वाटलेही नाही. मुलाबाळांना, घरातल्यांना नवीन कपडे पाहून आनंद वाटेल, या विचारत ती घरी आली. मग सगळ्यांनी विचारले, “रमा, तू नाही कपडे घेतलेस?” यावर रमाई फक्त हसते. पण, साहेब येणार, त्यांचे स्वागत करण्यास जायला हवे. पण, कसे जायचे? नऊवारी साडीला असंख्य ठिगळे. पण, रमाई जाते. बाबासाहेब तिला दुरून बघतात, तर रमाई दूर उभी, भरजरी साडीत. त्यांना आनंद वाटतो. पण इथे रमाईने काय केलेले असते, तर बाबासाहेबांना शाहू महराजांकडून मान म्हणून शेला आणि फेटा मिळालेला असतो. रमाई त्याची साडी बनवते आणि ती साडी नेसून जाते. रमाईसारख्या घरादारासाठी आणि इज्जतीसाठी जगणार्‍या स्त्रिया आजही घरोघरी आहेत. बाबासाहेब समाजासाठी संघर्ष करत. त्यावेळी रमाई त्यांना म्हणाली, “साहेब, तुम्ही समाजासाठी इतकं करता, मग दारूड्यांचा का बंदोबस्त करत नाही? आजूबाजूच्या आयाबायांना त्यांचे नवरे दारू पिऊन मारतात, छळतात. त्यांना कोण न्याय देणार?” रमाईने बाबासाहेबांसमोर हा प्रश्न मांडला. आपण पाहतो की, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामध्ये महिलांचे जीवन सुलभ बनविण्यासाठी कायदेच कायदे आहेत.


रमाईचे दु:ख रमाईच जाणे. बाबासाहेब परदेशात शिकायला असताना, रमाईचे बाळ आजारी पडते. बाळाला ती डॉक्टरांकडे नेते, पण पैसे नाहीत म्हणून डॉक्टर अक्षरक्ष: तिला हाकलतो. त्यावेळी लहानग्या बाळाला घेऊन रमाई रडत बसली. तिने बाबासाहेबांना पत्राद्वारे सांगितले नाही. का? तर बाबासाहेब तिकडे शिकायला गेलेत. त्यांना त्रास नको. पण, इथे तिच्या डोळ्यांसमोर उपचाराअभावी तिचे लाडके बाळ मृत्युमुखी पडते. पती नसताना एका आईच्या समोर तिच्या लहानग्याचा झालेला मृत्यू... त्या दु:खाबाबत शब्दच संपतात. पण, रमाई रमाई होती. तिने जिद्दीने स्वत:ला सावरले. कारण, तिला माहिती होते की, साहेबांची ती जीव की प्राण होती. तिला दु:खात बघून साहेब दु:खी झाले असते. मात्र, जेव्हा बाबासाहेबांना हे कळते, तेव्हा ते खूप रडतात. ते रमाईला म्हणतात, “रामू,(रमू) मला माफ कर. हेही दिवस जातील. दु:खच माणसाला मोठे करते.” बाबासाहेब किती योग्य म्हणाले होते. कारण, रमाईने सहन केलेल्या हालअपेष्टा, पचवलेली दु:ख यातूनच ती अवघ्या समाजाची माता झाली. माता रमाई, तुझ्या कष्टाला, तुझ्या त्यागाला वंदन...! माता रमाई आंबेडकरांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विनम्र अभिवादन...!
@@AUTHORINFO_V1@@