१६ एप्रिलला सोमनाथ अवघडे देणार ‘फ्री हिट दणका’

    06-Feb-2021
Total Views |

somnath awghade_1 &n
 


चित्रपटाच्या कलाकारांच्या उपस्थितीत पोस्टर प्रदर्शित

मुंबई: कोरोनाच्या भयंकर काळानंतर 'फ्री हिट दणका’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत ’फ्री हिट दणका’च्या टीमने हा चित्रपट १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या टीमने चित्रपटातील नायकाच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे. अपूर्वा एस. या अभिनेत्रीसोबत नायक म्हणून ‘फँड्री’फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे.
 
 
 
 
‘फँड्री’नंतर बर्‍याच दिवसांनी सोमनाथ अभिनय करताना दिसणार आहे. सोमनाथचा या सिनेमातला ‘लुक’ पाहून आणि हातात बॅट पाहून हा सिनेमा क्रिकेटच्या अवतीभवती फिरणारा तर नाही ना? आणि चित्रपटाच्या नावातूनही या चित्रपटाचा क्रिकेटशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळतील. मात्र, सोमनाथच्या ‘फॅन्स’साठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही ‘हिट’ जोडी जाहीर करण्यात आली आहे. 'व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेतात.
 
 
 
 
‘एसजीएम फिल्म्स’प्रस्तुत ’फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची असून चित्रपटाचे निर्माते अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनील मगरे हे आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे. बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले असून चित्रपटाचे छायाचित्रण हजरत शेख (वल्ली) यांचे आहे.