मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला सूचक सल्ला दिला आहे. सचिनने रेहाना या आंतरराष्ट्रीय पॉप गायिकेच्या ट्विटवर भाष्य करताना भारतीय सार्वभौमत्वाचा उल्लेख करून अंतर्गत बाबींबद्दल इतरांनी बोलू नये, असे म्हटले होते. सचिनच्या याच भूमिकेबद्दल पवारांनी त्याला सल्ला दिला आहे. क्रिकेट सोडून म्हणजे त्याचे क्षेत्र सोडून विषयांवर बोलताना सचिनने काळजी घ्यायला हवी, असा सल्ला शरद पवार यांनी शनिवारी दिली.
आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रेहाना हिने एका खलिस्तानी संस्थेच्या करारानुसार १८ कोटी रुपये घेऊन शेतकरी आंदोलनाविषयक ट्विट केले होते. एका पीआर कंपनीने याबद्दल मध्यस्ती केली होती. स्वतःला पर्यावरण कार्यकर्ती म्हणवणारी ग्रेटा थनबर्ग हिनेही एका टुलकिटमधून याच संदर्भातील ट्विट केले. भारताविरोधात आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचे षड्यंत्र शेतकरी आंदोलकांनी याच माध्यमातून रचण्यात आले.
सचिन व भारतीय क्रिकेटपटूंनी अगदी ठोस भूमिका घेत भारताच्या अंतर्गत गोष्टींवर भाष्य न करण्याचे मत व्यक्त केले होते. यामुळे या सर्वांना सरकारची बाजू मांडली म्हणून टीकेचा मारा सहन करावा लागला होता. पवारही याच मुद्द्यावरून सचिनला लक्ष्य करत आहेत. दरम्यान, लता मंगेशकर यांनीही या संदर्भात सचिनप्रमाणेच भूमिका घेतली आहे.
सचिन नेमकं काय म्हणाला होता ?
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड आम्हाला मूळीच मान्य नाही. बाहेरच्या व्यक्तींनी अंतर्गत गोष्टी पाहाव्यात मात्र, त्यात हस्तक्षेप करू नये. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते इथल्या नागरिकांबद्दल ठरवतील.", असे ट्विट सचिनने केले. टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda त्याने केलेल्या या हॅशटॅगला मोठा प्रतिसाद मिळाला होता.