कझाकस्तानचे स्वातंत्र्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2021   
Total Views |

Kazhakistan_1  
 
कझाकस्तान सध्या रशिया आणि चीनच्या विरोधात आवाज उठवत आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात नवव्या क्रमांकावर असलेला हा देश. या देशात तुर्की आणि रशियन वंशाची लोकसंख्या जास्त आहे. २० टक्के लोक रशियन वंशाचे आहेत; असणारच, कारण १९९१ पूर्वी कझाकस्तान हा रशियाचा भाग होता. सोव्हिएत युनियनचे तुकडे पडले, त्यातूनच एक भूभाग बाहेर निघाला तो म्हणजे कझाकस्तान. कझाकस्तान हा मुस्लीम बहुसंख्य देश. हा देश कधी काळी आपल्यात समाविष्ट होता, हे रशिया विसरायला तयार नाही. त्यामुळे रशियन नेते जेव्हा संधी मिळेल, तेव्हा जाहीररीत्या म्हणतात की, कझाकस्तान हा रशियाचे एक राज्य होते आणि आणि आता वेगळा देश म्हणून राहण्यापेक्षा कझाकस्तानने रशियामध्ये पुन्हा सामील व्हावे, तर दुसरीकडे चीनचाही डोळा कझाकस्तानवर आहे. चीन कझाकस्तानमध्ये अनेक वित्तीय गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इतकेच नव्हे, तर चीनने आता असे म्हणायला सुरुवात केली आहे की, कझाकस्तान हा पूर्वी चीनचाच भाग होता. अर्थात, चीनचा विकृत विस्तारवाद सगळ्या जगाला माहिती आहे. रशिया आणि चीन दोघेही कझाकस्तानला आपला भूभाग सांगत आहेत. मात्र, रशिया आणि चीन या दोन्ही कम्युनिस्ट राजवटी असलेल्या देशांचा मनसुबा कझाकस्तानला अजिबात पसंत नाही. त्यामुळे रशियाने जेव्हा नुकतेच म्हटले की, कझाकस्तानने पूर्वीसारखे रशियात सामील व्हावे, तेव्हा कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट टोकाय यांनी पहिल्यांदा रशियाला आणि चीनला प्रत्युत्तर दिले की, कझाकस्तान हा स्वतंत्र देश आहे.
 
 
त्यामुळे रशिया आणि चीनने कझाकस्तानबाबत असे म्हणू नये. कारण, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध खराब आणि तणावपूर्ण होतात, तर दुसरीकडे कासिम यांनी देशवासीयांना असेही आवाहन केले आहे की, हा देश आपल्या पूर्वजांच्या वारशाने मिळाला आहे. या देशाचे सर्वतोपरी रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रपती कासिम यांच्या या आवाहनाला कझाकस्तानच्या नागरिकांनी शतप्रतिशत समर्थन दिले. कझाकस्तान आता रशियाचा किंवा चीनचा अंकित भूभाग नाही, तर हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. या राष्ट्राची एक संस्कृती; एक इतिहास आहे, असे म्हणत कझाकस्तानी नागरिक देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करत आहेत. ‘हम सब एक हैं’ वगैरेचे आपण जसे नारे देतो, तसेच तिथेही सर्व ‘कझाकस्तान एक आहे,’ असा आदर्शवाद जपणारी समाजव्यवस्था निर्माण होत आहे. तसेच राष्ट्राचे हित आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी कझाकस्तानची तरुणाई प्रयत्नशील आहे. हा देश मुस्लीम बहुसंख्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक ख्रिश्चन समुदायाचा आहे. दोघांनाही धार्मिक कर्मकांड करणे आवश्यकच आहे. रशिया आणि चीन कम्युनिस्ट असल्यामुळे तिथे कझाकस्तानच्या नागरिकांना त्यांचे धार्मिक रीतिरिवाज पाळता येत नाहीत. त्यामुळे इथल्या नागरिकांना रशिया आणि चीनपेक्षा स्वतंत्र कझाकस्तानच प्रिय आहे. रशियाने ‘युरेशियन इकोनॉमिक युनियन’ स्थापन केली.
 
 
 
पण, त्या संघटनेमध्येही कझाकस्तान सामील झाला नाही. दुसरीकडे कझाकस्तानमधले हजारो मुस्लीम चीनमध्ये आहेत. त्यांना चीनमध्ये उघूर मुस्लिमांसारखेच कडक बंदिवासात राहावे लागते. त्यांच्यावर अक्षम्य अत्याचार होतात. कझाकी नागरिकांना चीनबद्दल आत्मीयता वाटावी म्हणून चीनने काही कझाकी मुस्लिमांची मुक्तता केली. त्यानंतर चीनने २०१६ साली शेतीप्रगतीच्या नावाने कझाकस्तानकडे प्रस्ताव मांडला. त्यात चीन-कझाकस्तानमध्ये शेतीसाठी जमीन घेणार होता, यात कझाकस्तानला भरपूर आर्थिक साहाय्य मिळणार होते. पण, कझाकस्तानचे लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी चीनचा शेतीप्रगती प्रस्ताव नाकारावा, यासाठी कझाकस्तानच्या सरकारवर दबाव आणला. त्यामुळे चीनचा हा प्रस्ताव प्रशासनाने नामंजूर केला. २०१९ साली चीनने पुन्हा कझाकस्तानला औद्योगिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवला. मात्र, त्यावेळीही ‘चीनची मदत नाकारा’ म्हणत, लाखो नव्हे तर सगळा कझाकस्तान रस्त्यावर उतरला. मदतीच्या नावाने इतर देशांवर कब्जा करण्याचा चीनचा डाव कझाकी नागरिकांनी उधळून लावला. आता कझाकस्तानमध्ये भाषा आणि संस्कृतीद्वारे तेथील नागरिकांमध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रशिया आणि चीनच्या विरोधात कझाकी नागरिकही आता कझाकस्तानसाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या तयारीत आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@