जावे व्याकरणाच्या गावा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2021   
Total Views |

Marathi_1  H x
 
व्याकरण हा कुठल्याही भाषेचा जणू आत्माच. पण, दुर्देवाने शिक्षणापुरताच त्याचा मर्यादित विचार होताना आज दिसतो. त्यात हल्ली समाजमाध्यमांच्या गोतावळ्यात आणि चॅटिंगच्या गडबडीत अक्षर, शब्द, व्याकरण असे सगळेच ‘ऑटो करेक्ट’वर अवलंबून! तेव्हा, मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून व्याकरणाच्या संक्षिप्त इतिहासाबरोबरच मराठी व्याकरणातील काही नियमांचा केलेला हा ऊहापोहही तितकाच महत्त्वाचा ठरावा.
 
सर्व भाषांची जननी आणि सर्वात प्राचीनतम भाषा म्हणजे संस्कृत. संस्कृत भाषा संस्कारित, परिष्कृत आणि समृद्ध आहे. संस्कृत भाषेपासून भाषाशास्त्रीय व्याकरणाची परंपरा आपल्याला दिसते. मानवी इतिहासाच्या दृष्टीने चार ठळक परंपरा दिसतात. १) प्राचीन अभिजात भारतीय परंपरा (इ. स. पू. सहाव्या शतकापासून), २) युरोपीय परंपरा (इ. स. पू. चौथ्या शतकापासून), ३) चिनी परंपरा (इ. स. दुसऱ्या शतकापासून), ४) अरबी परंपरा (इ. स. आठव्या शतकापासून). अर्वाचीन मराठी विचारांवर पहिल्या दोघींचा प्रभाव दिसतो. व्याकरणाचा उद्भव वाङ्मय शिकण्याचे एक साधन म्हणून किंवा भाषा शिकण्याचे साधन म्हणून झाला. त्याला स्वतंत्र ज्ञानशाखेची प्रतिष्ठा नंतरच्या काळात लाभली.
 
प्राचीन अभिजात भारतीय परंपरा सुरुवातीला तरी संस्कृत भाषेशी निगडित होती. ‘व्याकरण’ म्हणजे फोड करून उलगडा करणे. वेद निर्माण झाल्यावर काही काळ लोटल्यावर वेदविद्या पुढे आली आणि तिला साहाय्यक म्हणून शिक्षा (उच्चारण), कल्प (धर्मविधी), व्याकरण किंवा शब्दशास्त्र, निरुक्त (अपरिचित शब्दांचा उगमाकडे जाऊन उलगडा करणे), छंदस् (पद्यरचना) आणि ज्योतिष (आकाशस्थ गोल आणि कालमापन) ही सहा वेदांगे पुढे आली. प्रथम व्याकरण हे ‘शास्त्र’पदाला पोहोचले. पाणिनीने संस्कृतला नियमबद्ध व्याकरण निर्माण करून दिले. अर्थातच, पाणिनीच्या आधीही काही वैय्याकरणी होते आणि नंतरही वैय्याकरणांची दीर्घ परंपरा संस्कृतला लाभली.
 
व्याकरणाची पाश्चात्त्य परंपरा जरी प्लेटो व अ‍ॅरिस्टॉटल यांच्या स्फुट विचारांपासून सुरू होते, तरी डायोनायसस थ्रॅकस (इ. स. पू. दुसरे शतक) याचा ‘पदविचार’ आणि अ‍ॅपोलोनियस डिस्कोलस (इ. स. दुसरे शतक) याचा ‘वाक्यविचार’ या ग्रीक व्याकरणग्रंथांमुळे ती स्थिर होते. प्रिसियन (इ. स. सहावे शतक) याच्या व्याकरणाचा पगडा सर्व शालेय व्याकरणावर होता. शुद्ध कसे बोलावे आणि लिहावे, हे व्याकरण शिकल्याने समजते, हा त्याचाच विचार अगदी दादोबा पांडुरंग तर्खडकरांपर्यंत येऊन पोहोचतो.
 
मराठीतील व्याकरण ग्रंथरचना
 
मध्ययुगापासून मराठीत विपुल ग्रंथरचना झालेली असली, तरी मराठीचा भाषिक दृष्टीने अभ्यास करण्याची परंपरा नसल्याने भाषेचे नियमन आणि व्यवस्थापन करणाऱ्या व्याकरणग्रंथांची मात्र रचना झाली नाही. भीष्माचार्य या महानुभाव पंथातील कवीच्या नावावर मोडणारी ‘पंचवार्त्तिक’, ‘नामविभक्ति’, यांसारखी स्फुट प्रकरणे किंवा रामदासी संप्रदायातील गिरिधराने रचलेले छोटेसे ‘व्याकरण’ यांखेरीज मराठीच्या व्याकरणासंदर्भात विशेष लेखन झाले नाही.
 
पुढे गंगाधरशास्त्री फडके यांचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण प्रसिद्ध झाले (१८३६). मराठीतील हे पहिले मुद्रित व्याकरण. याच वर्षात बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘बाल व्याकरण’ रचून तयार झाले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे मराठी भाषेचे व्याकरणही याच वर्षी प्रसिद्ध झाले. संस्कृत व इंग्रजीच्या व्याकरणांचा अभ्यास करून हे लिहिले होते व त्यात मराठी भाषेच्या रूपविचारांची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लाविली होती. १८५० मधील दुसऱ्या आवृत्तीमध्ये दादोबांनी या व्याकरणात बरेच फेरफार केले. १८८१ मध्ये त्यांनी याच व्याकरणाची एक पुरवणी प्रकाशित केली. व्याकरणविषयक अनेक प्रश्नांची सविस्तर चर्चा करणारे आणि पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरलेले व्याकरण म्हणून दादोबांच्या व्याकरणाचे महत्त्व विशेषत्वाने आहे. आपल्या याच व्याकरणाची एक छोटी आवृत्ती ‘लघु व्याकरण’ या नावाने दादोबांनी १८६५ मध्ये तयार केली होती.
 
दादोबांच्या व्याकरणाने मराठीत व्याकरण लेखनाची अखंड परंपरा निर्माण झाली. गंगाधर रामचंद्र टिळक (मराठी लघु व्याकरण, १८५८), कृष्णशास्त्री गोडबोले (मराठी भाषेचे नवीन व्याकरण, १८६७), रा. भि. गुंजीकर (लहान मुलांकरिता सुबोध व्याकरण, १८८६), रा. भि. जोशी (प्रौढबोध मराठी व्याकरण, १८८९), गो. ग. आगरकर (वाक्यमीमांसा) अशी अनेक छोटी-मोठी पुस्तके तयार झाली. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी व्याकरणविषयक अनेक मूलभूत प्रश्नांचा ऊहापोह करणारे लेख ‘शालापत्रक’ मासिकात लिहिले, ते १८९३ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. विसाव्या शतकाला प्रारंभ झाल्यानंतर १९११ मध्ये मोरो केशव दामले यांनी लिहिलेला ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा मराठी व्याकरणात मेरूमण्याप्रमाणे शोभणारा ग्रंथराज प्रकाशित झाला. पूर्वसुरींच्या प्रतिपादनाचा चिकित्सक परामर्श घेऊन मराठी व्याकरणातील विविध मतमतांतरांची सांगोपांग चर्चा करणारा प्रौढ ग्रंथ म्हणून दामल्यांच्या व्याकरणाचे स्थान अनन्यसाधारण आहे. म. पां. सबनीस कृत ‘मराठी उच्चतर व्याकरण’ (१९५१) या ग्रंथात दामल्यांच्या अनेक मतांचे आग्रहपूर्वक खंडन करण्याचा प्रयत्न आहे. अरविंद मंगरूळकरांनी ‘मराठी व्याकरणाचा पुनर्विचार’ (१९६४) या आपल्या पुस्तकात मराठीचे व्याकरण केवळ मराठीच्याच स्वभावानुरूप सिद्ध केले पाहिजे, या विचाराचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा केलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नवीन भाषाशास्त्राचा उदय होऊन त्यातील विचारप्रणालीच्या आधाराने मराठी भाषा व तिच्या पोटभाषा यांचे अध्ययन होऊ लागले.
 
 
भारतात व्याकरणाने मीमांसा, तर्क, अलंकार आणि तत्त्वज्ञान यांच्यामधील वादांमध्ये तटस्थ राहून स्वायत्तता जपण्याचे धोरण स्वीकारले. उलट पाश्चात्त्य व्याकरण थेट आधुनिक काळापर्यंत या वादांत पुष्कळदा अडकत गेले. पाणिनीय व्याकरणाचा परिचय झाल्यावर स्वायत्त व्याकरण किती परिपक्व असू शकते, याची जाणीच पाश्चात्त्यांना झाली आणि वर्णनात्मक भाषा-विज्ञानाची पायाभरणी सुलभ झाली. ‘ग्रामर’ म्हणजे ना केवळ लिहिण्याची कला, ना केवळ वाङ्मयाचा अन्वयार्थ लावण्याचे साधन, ना केवळ अलंकार, तर्क, तत्त्वज्ञान यांत शिरण्याचा उंबरठा, ही जाणीव होण्यास विसावे शतक उजाडावे लागले.
 
भाषेचे भाषाशास्त्रीय वर्णन करायचे, म्हणजे कोणत्या भाषेत कोणते प्रयोग उपलब्ध असतात, याची व्यवस्था स्पष्ट करायची. उपलब्ध असतात म्हणजे बोलणाऱ्याने/लिहिणाऱ्याने आपले मनोगत (अर्थ) शब्दोच्चार/लेखन (शब्द) यांच्या मदतीने व्यक्त करण्यासाठी उपलब्ध आणि ऐकणाऱ्याने/वाचणाऱ्याने शब्दश्रवण/वाचन (शब्द) यांच्या मदतीने ते मनोगत (अर्थ) जाणून घेणे. या प्रकारे शब्दांचा आणि अर्थांचा मेळ बसतो. तो भाषाप्रयोगांच्या मागे असलेल्या भाषाव्यवस्थेमुळे. शब्द म्हणजे, लहान-मोठी ऐकलेली वा वाचलेली बाह्य शब्दरूपे. अर्थ म्हणजे, व्यक्त झालेली आणि जाणून घेतलेली अंतर्गत अर्थरूपे.
 
 
शब्दरूप आणि अर्थरूप यांचा संबंध म्हणजे शब्दार्थसंबंध. शब्दकोशामध्ये हा शब्दार्थसंबंध विशेष पातळीवर दाखवला जातो. उदा. घ, ओ, ड, आ हे वर्ण या क्रमाने घेतले म्हणजे घोडा हे शब्दरूप चार पाय, आयाळ, केसाळ शेपूट इ. असलेला शाकाहारी सस्तन प्राणी म्हणजे अर्थरूप आणि पुल्लिंगी, एकवचनी नाम हा शब्दार्थसंबंध. याउलट व्याकरणात हा शब्दार्थसंबंध सामान्य पातळीवर दाखवला जातो. उदा. कर्त्याच्या जागी नाम, कर्माच्या जागी नाम, विधेयाच्या जागी क्रियापद ही सामान्यत: या क्रमाने ठेवली, म्हणजे वाक्य तयार होते. अवरोही सूर, एक बलकेंद्र, सलग उच्चारण हे त्याचे शब्दरूप (शब्दांकन) आणि अमुक वस्तुस्थिती असल्याचा दावा करणे, हे त्याचे अर्थरूप म्हणजेच अर्थांकन. रचना शब्दार्थसंबंध दाखवते. सामान्य पातळीवर राहणारे व्याकरण आणि विशेष तपशिलांत शिरणारा कोशही परस्परांना पूरक असतात.
 
व्याकरणगत रचनेचे नियम, शब्दांकनाचे नियम आणि अर्थांकनाचे नियम असे गट पडतात. या नियमांनी सिद्ध होणाऱ्या रचना एकात एक सामावलेल्या असतात. लहानात लहान पदघटक, नंतर पद, पदबंध, वाक्य, वाक्यबंध आणि शेवटी प्रबंध अशी श्रेणीव्यवस्था मानली, तर व्याकरणाचे पदविचार (पदांची पदघटकांतून सिद्धी) आणि वाक्यविचार (पदबंध, वाक्य, वाक्यबंध यांची सिद्धी) असे दोन भाग मानता येतील.
 
 
पदांची पदघटकांत फोड करताना मराठी भाषेच्या पदविचारात समास, साधित, अभ्यस्त, नामविकार, क्रियाविकार या रचना विचारात घ्याव्या लागतात. पदबंधांची पदांमध्ये फोड करताना विविध प्रधान-गौण-अन्वय दिसून येतात. उदा. ‘क्षणापुरती ओळख’, ‘स्वभावाची ओळख’, ‘मैत्रीण म्हणून ओळख’ या पदबंधांत ‘ओळख’ या प्रधान घटकाचा गौण घटकांकडून अनुक्रमे अर्थविस्तार, अर्थपुरण, अर्थविशदीकरण झाले आहे. वाक्याची पदबंधांत फोड करताना कर्ता-क्रियापद, कर्म-क्रियापद यांसारखे अन्वय दिसून येतात. वाक्यांची वाक्यबंधात जोड करताना ‘मी जिंकलो, मी हरलो’, ‘मी जिंकलो किंवा मी हरलो’ अशा विविध प्रकारची जोडणी होते.
 
वाक्यबंधांची प्रबंधात जोड करताना काही नियम असलेच, तर ते व्याकरणाचे नसून निबंधन (कम्पोझिशन), वादविवाद (डिबेट), अलंकार (र्हेटारिक) यांचे नियम असतात. एखाद्या रचनेची फोड करताना तिच्यामधील घटकांचे एकमेकांमध्ये नाते असते. ते अन्वयाचे असते किंवा जातीचे असते. जातो : जाईन - येतो : येईन.
 
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर ‘मराठी साहित्य महामंडळा’ने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक १४ नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये महामंडळाने यामध्ये आणखीन चार नियमांची भर घातली. ‘मराठी साहित्य महामंडळ’ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे या महामंडळाने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये या नियमावलीचे पालन करण्याचे ठरवले.
 
केशवसुतपूर्वकालीन पद्य (केशवसुतांचा काव्यरचनाकाल - १८८५ ते १९०५) व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य (चिपळूणकरांचा लेखनकाल - १८७४ ते १८८२.) यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. त्यानंतरचे केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह लेखन ‘मराठी साहित्य महामंडळा’च्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे. त्यातील महत्त्वाचे नियम पाहूया.
 
नियम १ - शीर्षबिंदू देण्यासंबंधीचा
 
स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
 
उदाहरणार्थ : गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. तत्सम शब्द लिहिताना ‘परसवर्ण’ पद्धतीचा वापर करण्यास हरकत नाही. तसे अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
 
उदाहरणार्थ : वेदांत = वेदांमध्ये, वेदान्त = तत्त्वज्ञान, देहांत = शरीरांमध्ये, देहान्त = मृत्यू.
 
नियम २: इकारान्त आणि उकारान्त शब्द लिहिण्याबाबतचा
 
 
तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द मराठीत दीर्घान्तच लिहावेत.
 
उदाहरणार्थ : कवि = कवी, बुद्धि = बुद्धी, गति = गती. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ : पाटी, जादू, पैलू. परंतु, ‘परंतु’, ‘यथामति’, ‘तथापि’ ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्तच लिहावेत. उदाहरणार्थ : हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू. ‘आणि’ व ‘नि’ ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे.
 
उदाहरणार्थ : बुद्धि - बुद्धिवैभव, लक्ष्मी - लक्ष्मीपुत्र. साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. उदाहरणार्थ : बुद्धि - बुद्धिमान, लक्ष्मी - लक्ष्मीसहित. विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन् यांसारखे ‘इनन्त’ शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या ‘न्’चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु, हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावे.
 
उदाहरणार्थ : विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.
 
मराठी अकारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
 
उदाहरणार्थ : कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल. तत्सम अकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ : गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यूह. मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ : चिंच, डाळिंब, भिंग, खुंटी, पुंजका, भुंगा, छिः थुः किल्ला, भिस्त, विस्तव, कुस्ती, पुष्कळ, मुक्काम. परंतु, तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
 
उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन कुटुंब, चुंबक,निःपक्षपात, निःशस्त्र, चतुःसूत्री, दुःख, कनिष्ठ, मित्र गुप्त, पुण्य, ईश्वर, नावीन्य, पूज्य, शून्य.
 
काही नियम हे अगदीच सामान्य आहेत. पण, अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातील एक म्हणजे पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. उदाहरणार्थ : नागपूर, तारापूर, सोलापूर. ‘कोणता’, ‘एखादा’ ही रूपे लिहावीत. ‘कोणचा’, ‘एकादा’ ही रूपे लिहू नयेत. ‘खरीखरी’, ‘हळूहळू’ यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु, पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील, तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ: दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु. एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे. एकारान्त करू नये. अर्जामध्येही याच नियमाचा वापर करावा. परंतु, कायदेशीर भाषा या नियमाचा अपवाद ठरू शकते.
 
उदाहरणार्थ : करणे - करण्यासाठी, फडके - फडक्यांना.
 
क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान् यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावेत.
 
उदाहरणार्थ : क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान.
 
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल, तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
 
उदाहरणार्थ : ब्रिटिश, टी
 
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे, राहाणे, पहाणे, पाहाणे, वहाणे, वाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा, पाहा, वाहा यांबरोबरच रहा, पहा, वहा अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही. असे अनेक छोटे-मोठे नियम मराठीच्या व्याकरणासंदर्भात साहित्य मंडळाने दिलेले आहे. कवितालेखनामध्ये मात्र ‘मीटर’, मात्रा याबाबत स्वातंत्र्य असल्यामुळे व्याकरणाच्या नियमांमध्ये सवलत आहे.
 
माणसाच्या भाषेवर प्रादेशिक आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात. या परिणामापासून कोणतीही भाषा अलिप्त राहू शकत नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात ती वेगवेगळ्या बोलीच्या रूपांमध्ये अवतरलेली दिसेल. प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले, तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठेतरी एक आणि समान असावी लागते, प्रमाण असते. तिच्या लेखन रूपात एकसूत्रता, समानता राहावी, यासाठी लेखन व्यवहारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता असते. याकरिता काही लेखनविषयक नियम केले आहेत. भाषा ही प्रवाही आहे. कालपरत्वे भाषेत बदल होत जातो. म्हणजे तिच्या लेखनपद्धतीतही बदल होणे साहजिकच आहे. असे जरी असले तरी आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा, प्रमाणबद्ध करण्याचा प्रयत्न आपण या मराठी राजभाषा दिनापासून करूया.
 
 
- वसुमती करंदीकर
 
@@AUTHORINFO_V1@@