राजधानीत गुंजते मराठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2021   
Total Views |

Delhi_1  H x W:
 
 
 
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे होत असतात. चर्चा, परिसंवाद, व्याख्यान असे बरेच कार्यक्रम विविध संस्था आयोजित करीत असतात. याच दिवशी मराठी भाषेच्या भविष्याविषयी, मराठी शाळांविषयी चिंताही व्यक्त केली जाते. मराठी शाळांचा टक्का कसा घसरतो आहे, विद्यार्थी मराठी भाषेकडे कसे दुर्लक्ष करीत आहेत, यावर चर्चाही याच दिवशी झडतात. महाराष्ट्रात ही एक चिंता असताना देशाची राजधानी दिल्लीत मात्र मराठी भाषा जपण्याचे महत्त्वाचे काम ‘मराठा मित्रमंडळ’ आणि ‘चौगुले पब्लिक स्कूल’ १९५६ सालापासून करीत आहे. त्यांच्याविषयी...
करोलबाग. दिल्लीतील अगदी मध्य वस्तीतला भाग. करोलबागेपासून हाकेच्या अंतरावर संसद भवन. रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारची वस्ती असलेला सदैव गजबजलेला हा परिसर. आता दिल्लीतला एक प्रमुख भाग असल्याने येथे साहजिकच हिंदी भाषाच कानावर पडते. मात्र, झंडेवालान मेट्रो स्टेशनला अगदी लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या समोरच्या गल्लीत गेलो की, मराठी शब्द कानी पडू लागतात. आता अगदी महाराष्ट्राप्रमाणे सफाईदार मराठी नसली तरीही मराठी माणसाला समजेल अशी मराठी कानी पडते. आता करोलबागेमध्ये कोण मराठी बोलणार, असा प्रश्न साहजिकच पडतो. मग त्याचा शोध घेत पुढे गेल्यावर समोर दिसते ती ‘चौगुले पब्लिक स्कूल’ या शाळेची पाटी. मग आपल्याला वाटते की फक्त शाळेचे फक्त नाव मराठी असावे, बाकी काही नाही. मात्र, जेव्हा आपण शाळेमध्ये जातो, तेव्हा अगदी उत्तम प्रकारे मराठी बोलणारे अमराठी विद्यार्थी पाहून नाही म्हटले तरी आश्चर्य वाटतेच!
 
आता ‘चौगुले पब्लिक स्कूल’विषयी जाणून घेण्यापूर्वी ‘मराठा मित्रमंडळा’विषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. कारण, त्यातूनच दिल्लीत मराठी शाळा उभी राहिली. साधारणपणे १९५५ पासून दिल्लीमध्ये मराठी नोकरदारांची संख्या वाढायला लागली. तो तसा राजकीयदृष्ट्या अत्यंत ज्वलंत असा काळ होता. कारण, संयुक्त महाराष्ट्राचा लढा तेव्हा पेटायला लागला होता. त्यामुळे त्याचे पडसाद साहजिकच दिल्लीत नोकरीनिमित्त आलेल्या मराठी जनांमध्येही उमटायला लागले होते. दिल्लीतली मराठी मंडळी प्रामुख्याने करोलबाग परिसरामध्ये वास्तव्यास होती. आता चार मराठी डोकी एकत्र आली की, साहजिकच त्यांच्या मनात एखादी संस्था स्थापन करण्याचा विचार येतोच. त्यामुळे करोलबागेत राहणाऱ्या या मराठी मंडळींनी अजमल खान रोड आणि आर्य समाज रोड एकमेकांना जेथे छेदतात, तेथे असलेल्या ‘चंद्रभुवन’ या इमारतीमध्ये ‘मराठा मित्रमंडळ’ स्थापन केले. मग हळूहळू तेथे मराठी जनांचे एकत्रीकरण होण्यास प्रारंभ झाला.
 
आता जसजसे मराठी जन वाढू लागले, तसतशी आपल्या मुलांना शिक्षणासाठी मराठी शाळा असावी, हाही विचार मनात जोर धरू लागला. कारण, दिल्लीमध्ये असलो तरीही आपल्या मुलांना मराठीतच शिक्षण मिळावे, असा विचार त्यामागे होता आणि तोपर्यंत मराठी शाळेत शिकणे म्हणजे कमीपणाचे, असा विचार पालकांच्याही मनात नसल्याने शाळेची कल्पना पूर्णत्वास नेण्याचे सर्वांनी ठरविले. मग १९५६ साली ‘शिशु विहार’ची स्थापना झाली आणि दिल्लीमध्ये मराठी भाषेत शिक्षण मिळण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला जागेची अडचण असल्याने नारायण वैद्य यांच्या घरातच सुमारे एक ते दीड वर्षे ‘शिशु विहार’चा वर्ग भरत असे, अर्थात तेव्हा विद्यार्थीदेखील अवघे दहा ते १५ होते. मात्र, जसजशी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली, तशी मोठ्या जागेची निकड निर्माण झाली. त्यासाठी मग मराठा मित्रमंडळात सक्रिय असलेले चंद्रशेखर गर्गे, राजाभाऊ गोडबोले, मंडळाचे अध्यक्ष असलेले बी. डी. देशमुख आदी मंडळी प्रयत्नांना लागले. त्यानंतर करोलबागेमध्ये मराठी जनांना एक भूखंड मिळाला. अर्थात, भूखंड मिळाल्यानंतरचाही प्रवास सोपा नव्हता. दिल्लीमध्ये परवानग्या काढणे, त्यासाठी सरकारदरबारी वारंवार चकरा मारणे, अनेकदा नकार आणि विलंब सहन करणे, वर्गणी जमविणे, असे अनेक सोपस्कार पार पडले आणि अखेर शाळेची वास्तू उभी राहिली.
 
मात्र, त्यानंतर शाळेची प्रगतीच होत गेली. कारण, मराठी जनांचा उत्साह पाहून ‘चौगुले उद्योगसमूहा’ने शाळेला मोठी देणगी दिली, त्यामुळे शाळेचा आर्थिक प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. मग शाळेचेही नावही ‘चौगुले पब्लिक स्कूल’ असे ठेवून ‘चौगुले उद्योगसमूहा’प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, १९७३ साली अण्णासाहेब शिंदे हे मंत्रिमंडळात होते, त्यांनीच उद्योजक विश्वासराव चौगुले यांच्याकडे मदत करण्यासाठी शब्द टाकला. त्यामुळे ‘चौगुले पब्लिक स्कूल’च्या आजवरच्या प्रवासात अण्णासाहेब शिंदे यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यानंतर १९७६ साली प्राथमिक, तर १९८१ साली माध्यमिक विभागाला दिल्ली प्रशासनाकडून मंजुरी मिळाली. पुढे १९८६ साली दहावीपर्यंत ‘सीबीएसई’ मंडळाची मान्यता मिळाली आणि १९८९ साली बारावीपर्यंत शाळेला मान्यता मिळाली. त्यानंतर आज शाळेची चार मजली इमारत, प्रशस्त मैदान, सुसज्ज विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम अशी प्रगती झाली आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनातही शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ‘मराठा मित्रमंडळ’ आणि ‘चौगुले पब्लिक स्कूल’ यांच्या वाटचालीमध्ये मंडळाचे अध्यक्षपद भूषविणारे केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, वसंतराव साठे आणि सुशीलकुमार शिंदे यांचेही मोठे योगदान राहिले आहे. शाळेला येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे अगदी चुटकीसरशी निवारण ही मंडळी करीत असत.
 
आता तुम्ही म्हणाल की, असा प्रवास तर सर्वच शाळांचा असतो, यात वेगळे ते काय? मात्र, ‘चौगुले पब्लिक स्कूल’चे वेगळेपण म्हणजे, या शाळेत आठव्या इयत्तेपर्यंत ‘मराठी’ विषय हा अनिवार्य आहे. मराठी-अमराठी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी तो अनिवार्य आहे, तर नववी ते बारावीसाठी ‘मराठी’ विषय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. त्याविषयी बोलताना शाळेच्या प्राचार्या पूजा साल्पेकर म्हणाल्या की, “दिल्लीच्या शैक्षणिक विश्वामध्ये ‘चौगुले पब्लिक स्कूल’चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या शाळेत दिले जाते. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज देशभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आपली शाळा ‘भाषिक अल्पसंख्याक’ या प्रकारात मोडते. त्यामुळे आपण शाळेत मराठी विषय शिकवतो आणि तो विषय अमराठी विद्यार्थीदेखील अगदी आवडीने शिकतात. मराठी भाषेसह मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठीही शाळा अग्रेसर आहे. ‘मराठा मित्रमंडळ’ आणि ‘चौगुले शाळा’ हे काही एकमेकांपासून वेगळे नाहीत. त्यामुळे मंडळाच्या दिल्लीतील सर्वात मोठ्या गणेशात्सवात शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक हे दिल्लीकरांचे आकर्षण असते. शाळेमध्ये शिवजयंती, गुढीपाडवा आणि अन्य सर्व मराठी सण अगदी उत्साहात साजरे केले जातात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शाळेच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे मोठे काम साध्य होत आहे. शाळा आणि ‘मराठा मित्रमंडळा’च्या माध्यमातून दिल्लीमध्ये मराठी जनांना एक हक्काचे स्थान मिळाले आहे.
 
एकूणच, देशाच्या राजधानीमध्ये मराठी भाषा केवळ टिकवून ठेवण्याचे नव्हे, तर अमराठी मंडळींना मराठी भाषा शिकविण्याचेही काम ‘चौगुले पब्लिक स्कूल’ करीत आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त दिल्लीत आलेल्या मराठी माणसांनी आज लहान-मोठी अशी ४० पेक्षा जास्त मराठी मंडळे विविध भागांमध्ये स्थापन केली आहे. गणेशोत्सव, शिवजयंती ते अगदी थाटामध्ये साजरी करीत असतात. प्रत्येक मंडळाचे काम तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कारण, दिल्लीमध्ये मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती यांनीच टिकवून ठेवली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@