कुसुमाग्रज, मराठीचा गौरव तुम्ही...

    26-Feb-2021
Total Views |

Kusumagraj_1  H
 
आज मराठी राजभाषा दिन. कुसुमाग्रज, तुमच्या जयंतीने या दिवसाचा जन्म झाला. कुसुमाग्रज, तुमचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला इतके जवळचे की, आमच्या तोंडून तुम्हाला आपसूकच ‘तात्यासाहेब’ म्हणून संबोधले जाते. तात्यासाहेब, आज ‘जागतिक मराठी गौरवदिना’ला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे... बरंच काही सांगायचं आहे...तेच या पत्रातून मांडतो आहे.
बोलणारी, सांगणारी माणसं आता सहसा भेटत नाहीत. म्हणा, आता आततायीपणाने व्यक्त होण्याचे दिवस. कागदाची जागा आता ‘स्क्रीन’ने घेतली असून, व्यक्त होण्याची माध्यमंही बदलली. या इथल्या मातीवर, मातृभूमीवर प्रेम करणारी माणसं तुम्ही. तुम्ही खूप काही लिहून ठेवलंत. बराच काळ लोटला तरी तुमची साहित्यसंपदा ही तुमच्या अस्तित्वाची तितक्याच ठळकपणे आजही ग्वाही देते. कधी-कधी आतून-बाहेरून खचून जातो, मन पराभूत होते, तेव्हा तुम्हीच कळत-नकळत सावरता आम्हाला... शाळेत तुमची ‘कणा’ नावाची कविता अभ्यासाला होती. त्या कवितेने माझ्यासारख्या कित्येकांना सावरलं, धीर दिला. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!’या कवितेतील ‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!’ या एका ऊर्जावान वाक्याने अनेकांना जिद्दीची अदृश्यशक्ती दिली. तुम्हाला मानवतेबाबत कळवळा होता म्हणून तुम्ही माणसांबद्दल लिहिलं. तुम्ही भाषेबद्दल पोटतिडकीने बोलत होता. मातृभाषेचा अभिमान आणि मातृभूमीचा आदर इथल्या तरुणांमध्ये रुजावा, यासाठी तुम्ही लेखन केलंत. म्हणून तुमचा जन्मदिवस हा मराठी भाषेचा गौरव दिन झाला.
 
कवी, पत्रकार, कादंबरीकार ते संपादक आणि सामाजिक कार्यकर्ता, असा तुमचा प्रवास इथल्या भाषेला, संस्कृतीला आणि आपल्या अस्मितेला अभिमान वाटावा, असाच! माणसे राहतात तो गाव आणि जिथे एखादी संस्कृती नांदत असते ते राष्ट्र, याबद्दल आता राजकीय मतेच छापून येतात. राष्ट्रप्रेम, राष्ट्रचेतना आणि जाणिवा प्रगल्भ करणारी कविता या देशाने कायम स्वीकारली. कधी-कधी राष्ट्रावर संकट येते, तेव्हा तुमची कविता आम्हाला बळ देते, ऊर्जा देते. आपल्या देशावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. आपल्या देशाने कधी कुणावर आक्रमण केले नाही, हे खरेच. पण, जेव्हा-जेव्हा अशी आक्रमणे झाली, तेव्हा-तेव्हा आपण मराठी म्हणून तर पुढे होतोच. पण, मराठी माणसाने सदैव ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार अग्रस्थानी ठेवला. त्यामुळे आपण कायम अग्रेसर राहिलो. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम हे शिकविण्याचे विषय नसून ते अनुभवण्याचे विषय आहेत. हे तुमच्या कवितेने आम्हाला वारंवार सांगितले. तुमच्या १९६४ साली प्रकाशित झालेल्या ‘हिमरेषा’ कवितासंग्रहातील ‘निर्धार’ या कवितेत तुम्ही म्हणता-
 
 
समर भूमीचे सनदी मालक
शत युद्धांचे मानकरीरणफंदींची जात आमुची,
कोण अम्हा भयभीत करी!घोरपडीला दोर बांधुनी
पहाड दुर्घट चढलेलेतुटून पडता मस्तक खाली
धुंद धडाने लढलेलेखांदकातल्या अंगारावर
हासत खेळत पडलेलेपोलादी निर्धार आमुचा
असुर बलाची खंत नसेस्वतंत्रतेच्या संग्रामाला
विजयावाचुन अंत नसेश्रद्धा हृदयातील आमुच्या
वज्राहुनि बलवंत असेमरण मारुनी पुढे निघाले
गर्व तयांचा कोण हरीरणफंदींची जात आमुची,
कोण अम्हा भयभीत करी!भरतभूमिचा वत्सल पालक
देवमुनींचा पर्वत तोरक्त दाबुनी उरात आम्हा
आर्त स्वराने पुकारतोहे सह्याचल, हे सातपुडा,
- शब्द अंतरा विदारतोत्या रक्ताची, त्या शब्दाची
शपथ आमुच्या जळे जरीरणफंदींची जात आमुची,
कोण अम्हा भयभीत करी!जंगल जाळापरी मराठा
पर्वतश्रेष्ठा, उठला रे
वणव्याच्या अडदांड गतीला
अडसर आता कुठला रेतळातळावर ठेचुन मारू
हा गनिमांचा घाला रेस्वतंत्रतेचे निशाण अमुचे
अजिंक्य राखू धरेवरीरणफंदींची जात आमुची,
कोण अम्हा भयभीत करी!
 
या कवितेने आम्हा मधला राष्ट्राभिमान जागा होतो. यामुळे आम्हाला नवचेतना मिळते. तेव्हा भारत-चीन युद्ध सुरू असेल आणि तुमच्यातील कवीने हे प्रेरणा देणारे काव्य लिहिले असेल, असा संदर्भ घेऊन जेव्हा आम्ही ही कविता वाचतो, तेव्हा तुमचे राष्ट्रप्रेम आम्हाला समजत जाते, उलगडत जाते. तात्यासाहेब, तुम्हाला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ सारखा मराठीतला सर्वोच्च पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’ या नाटकाला ‘साहित्य अकादमी’चाही पुरस्कार मिळाला. मराठी मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकृती तुम्ही लिहिल्या. आपल्या भाषेची, इथल्या माणसांची नस तुम्ही ओळखलीत. म्हणून आज जगातल्या दहाव्या क्रमाकांच्या बोलल्या जाणाऱ्या आपल्या मराठीबद्दलही तुम्ही बरंच काही लिहून ठेवलं. तुम्ही मराठीतून लिहिलेल्या साहित्याला ‘ज्ञानपीठ’ मिळाला खरा; पण आपली मराठी भाषा ‘ज्ञानभाषा’ होण्यासाठी आमचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. तुम्हाला माहिती असेलच, पण तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतानाचे एक उदाहरण. त्यामध्ये कावेरी नदीच्या बांधकामावेळी जे कारागीर होते, ते मराठी बोलत होते, याचा पुरावा आहे. म्हणजेच एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना, जे पुरावे दिले जातात आणि त्यामध्येही आपल्या मराठीचा उल्लेख असतो. म्हणजेच, आपली भाषा अभिजात असावीच ना? आज मराठी भाषेचा गौरव दिन. मराठीबद्दल खूप काही सांगणे आहे. मराठीबद्दल अभिमान वाटावा, अशाच बाबी अधिक. पण, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळून भाषेच्या संवर्धनासाठी जे काही प्रयत्न होतील, त्यासाठी दर्जा मिळणे गरजेचे झाले आहे. असं म्हणतात, भाषा आंदोलन करून नाही, तर आचरण करून टिकते.
 
पण, आज आचरण करण्यासाठी आपल्यासारखी प्रेरणा देणाऱ्या माणसांचे साहित्य रुजलं पाहिजे, टिकलं पाहिजे, हीच मनापासूनची भावना आहे. १९८९ रोजी मुंबई येथे भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’त तुम्ही दिलेल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाला होता, “भाषा म्हणजे शब्दांचं संकलन नव्हे. समाजाचं वैचारिक आणि जाणिवात्मक संचित काळातून पुढे नेणारी आणि परिणामत: समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता, आकार आणि आशय देणारी भाषा ही एक महाशक्ती असते. सूत्रात ओवलेल्या मण्याप्रमाणे समाजजीवनातल्या साऱ्या धारणा आणि विकासाच्या प्रेरणा तिच्यात ओवलेल्या असतात. म्हणून मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही; ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील लोकांच्या भवितव्यावरील संकट आहे. समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते, असे क्रांतिकारकांच्या प्रणेत्यानं म्हटलेलं आहे,” असं तुम्ही म्हणालात. ‘मराठी माती’, ‘किनारा’, ‘विशाखा’, ‘महावृक्ष’, ‘समिधा’ आदी कवितासंग्रह आणि तुमच्या इतर साहित्यकृतींमधून तुम्ही मानवी भावभावनांचा वेध घेतलात. ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या कवितेमध्ये तुम्ही म्हणता-
 
परभाषेतही व्हा पारंगत
ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे
परकीचे पद चेपु नका॥भाषा मरता देशही मरतो
संस्कृतिचाही दिवा विझे।गुलाम भाषिक होऊनि अपुल्या
प्रगतीचे शिर कापु नका॥
 
हे सारे तुम्ही सांगितलंत की, मराठी टिकणार आहे. जोपर्यंत इथल्या मराठी भाषकाला इथले साहित्यिक, कलाकार वाचता येतील, सांगता येतील, तोपर्यंत भाषा टिकणार आहे. तुमचा जन्मदिवस हा मराठी भाषेचा गौरव दिवस म्हणून साजरा होतो, ही किती अभिमानाची बाब! जन्म देणारी आई आणि जन्माने मिळालेली भाषा म्हणजे मातृभाषा यांची नाळ जन्मभर तुटत नाही, सुटत नाही. तुम्हाला तुमच्या जन्मदिवसाला शुभेच्छा देताना हाच आशावाद तुम्हाला अभिमानाने सांगू वाटेल. तुम्ही जपलेले मराठीपण आम्ही नक्की जपू, हा विश्वास तुम्हाला आज देऊ वाटतो. तात्यासाहेब, मराठी आईला तुमच्यासारखी लेकरं मिळाली आणि जणू मराठी दिवसेंदिवस समृद्ध झाली. तुम्ही दिलेले योगदान मोठं आहे. आम्हाला तुमचा अभिमानच आहे.धन्यवाद!
 
- स्वप्निल करळे