प्रयोगशील राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2021   
Total Views |

राहुल गांधी _1  



राहुल गांधी यांना आता दक्षिण भारतातून राजकारण करायला आवडते, म्हणजेच १५ वर्षे राहुल गांधी त्यांच्या मनाविरुद्ध अमेठीतून निवडून जात होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पणजोबा, आजोबा, आजी, वडील, काकासुद्धा उत्तर भारतातून निवडून जात होते आणि त्यांची आई सोनिया गांधी यादेखील रायबरेलीतून दीर्घकाळपासून खासदार आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळीदेखील वरवरचे राजकारण करूनच राजकारणात सत्तापदांपर्यंत पोहोचले, असेच राहुल गांधींना म्हणायचे असावे.



स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव प्रयोगशील राजकारणी म्हणजे काँग्रेसचे ‘माजी’ (आणि मनात येईल तेव्हा ‘आजी’ होऊ शकणारे) अध्यक्ष राहुल गांधी. राजकारणात विविध नेत्यांना विविध छंद असतात, तसा राहुल गांधी यांना छंद आहे तो प्रयोग करण्याचा. यावरून त्यांना ‘छंदीफंदी’ म्हणण्याचा अगोचरपणा काही लोक करतील. पण, त्यांना तसे संबोधणे हे अजिबातच समर्थनीय नाही. कारण, देशातील एकमेव प्रयोगशील राजकारण्याचे कौतुक करायलाच हवे आणि त्याला आवश्यक तो सन्मान द्यायलाच हवा. कारण, त्यांच्यासारख्या प्रयोगशील राजकारण्यामुळेच भारतीय राजकारणात नवे प्रवाह निर्माण होत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा उल्लेख ‘भारतीय प्रयोगशील राजकारणाचे उद्गाते’ असा केला तरीही ते वावगे ठरणार नाही. अर्थात, त्यांचे राजकीय प्रयोग हे नेहमीच फसतात, याकडे त्यांचा काँग्रेस पक्ष सोयीस्कर दुर्लक्षही करतो. आता पक्षाची मालकी असणार्‍यांविरुद्ध बोलणे हे काँग्रेसच्या संस्कृतीत नसल्याने त्यांना ते चालून जाते. मात्र, राहुल गांधी यांच्या प्रयोगशील राजकारणामुळे देशात दुहीची बीजे पेरली जात असल्याने त्याविरोधात अन्य लोकांनी बोललेच पाहिजे.



राहुल गांधींच्या प्रयोगाची चर्चा करताना फार मागे जायची गरज नाही, त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्याच प्रयोगांची चर्चा करूया. ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या सौद्यावरून त्यांनी मोदी सरकारवर दलाली खाल्ल्याचा आणि अनिल अंबानी यांना लाभ करून दिल्याचा आरोप केला होता. आता राहुल यांचे वडील राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ‘बोफोर्स’ प्रकरण घडले असल्याने संरक्षण सौद्यांमध्ये दलाली खाल्ली जातेच, असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे मोदी सरकारवर यथेच्छ आरोप करण्याचा प्रयोग त्यांनी केला. मात्र, तत्कालीन अर्थमंत्री आणि कायदेपंडित अरुण जेटली यांनी लोकसभेत त्यांना ‘राफेल’ सौदा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आणि राहुल गांधी यांचे ज्ञान कमी असून त्यांनी ‘अबकड’पासून सुरुवात करावी, असा सल्ला दिला होता. त्यामुळे ‘राफेल’चा प्रयोग जेटली यांनी एका क्षणात बाद केला होता. त्यानंतर मग ‘चौकीदार चोर हैं’ हा नवा नारा आणि नवा प्रयोग राहुल गांधींनी करायला घेतला. प्रत्येक जाहीर सभेत ‘चौकीदार चोर हैं’ असे तारस्वरात ते ओरडायचे. मग एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील खात्यांच्या नावांपुढे ‘चौकीदार’ हा शब्द लावला आणि देशभरातील सुरक्षारक्षकांसोबत म्हणजे सर्वसामान्य भाषेत ज्यांना ‘चौकीदार’ असे संबोधले जाते, त्यांच्यासोबत व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला. त्यामुळे तर राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर हैं’ या प्रचाराची तर हवाच निघून गेली. विशेष म्हणजे, या प्रचारावर काँग्रेसने कित्येक कोटींचा खर्च केला होता, प्रचारसाहित्य तयार केले होते आणि मोदींच्या एका कृतीने तो खर्चही पाण्यात गेल्याची वदंता दिल्लीमध्ये बोलली जाते. असो. कारण, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. मग नवे सरकार आणि नव्या प्रयोगांसाठी राहुल गांधी पुन्हा नव्याने सज्ज झाले. मग सुधारित नागरिकत्व कायदा, शाहीनबागेचा तमाशा, जेएनयु, जामिया मिलिया इस्लामिया, कृषी कायदे, २६ जानेवारीचा हिंसाचार अशा प्रयोगांमध्येही राहुल गांधींचे योगदान होतेच. मात्र, या सर्व प्रयोगांमध्ये यश मिळत नसल्याचे पाहून त्यांनी पुन्हा एकदा ‘दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत’ या प्रयोगाला हात घातला आहे आणि या प्रयोगामुळे देशात प्रादेशिक वाद निर्माण होऊन पुन्हा एकदा देशाचे वातावरण कलुषित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.



तर झाले असे की, अमेठी या गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात आपल्याला स्मृती इराणी पराभूत करणारच, असा विश्वास असल्याने राहुल गांधी केरळमधल्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणुकीस उभे राहिले होते. निवडणुकीचा निकालही राहुल गांधींच्या अपेक्षेप्रमाणेच लागला आणि अमेठीतून ते पराभूत झाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी अमेठीशी असलेले बंध तोडून सर्व लक्ष वायनाडकडे केंद्रित केले आणि त्यात वावगेही काहीही नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी वायनाडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी उत्तर भारतातील राजकारण आणि तेथील नागरिक हे मूर्ख असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, “यापूर्वी १५ वर्षे मी, उत्तर भारतातून खासदार होतो, त्यामुळे मला वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. मात्र, केरळमध्ये आल्यावर माझा अनुभव अगदीच वेगळा आहे. कारण, येथील लोक मुद्द्यांवर होणार्‍या राजकारणावर विश्वास ठेवतात आणि सविस्तरपणे सर्व काही जाणून घेण्याची त्यांची सवय आहे. नुकताच मी अमेरिकेत गेलो असता, तेथे काही विद्यार्थ्यांनाही मी सांगितले की, केरळमध्ये बुद्धिमत्तेचा वापर करून राजकारण केले जाते आणि तेच मला आवडते.” त्यांच्या या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की, उत्तर भारतातील राजकारण, तेथील राजकारणी, उत्तर भारतातून निवडून येणारे खासदार, आमदार आणि तेथील मतदार हे अत्यंत मूर्खपणाचे राजकारण करतात. त्यांना मूळ मुद्द्यांशी काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना आता दक्षिण भारतातून राजकारण करायला आवडते, म्हणजेच १५ वर्षे राहुल गांधी त्यांच्या मनाविरुद्ध अमेठीतून निवडून जात होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे पणजोबा, आजोबा, आजी, वडील, काकासुद्धा उत्तर भारतातून निवडून जात होते आणि त्यांची आई सोनिया गांधी यादेखील रायबरेलीतून दीर्घकाळपासून खासदार आहेत. हे सर्वदेखील मूर्खपणाचे राजकारण करीत आहेत किंवा त्यांच्या मनाविरुद्ध उत्तर भारतातून निवडून जात होते.



अर्थात, हे सर्व बोलण्यामागे राहुल गांधींचा मनसुबा अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे देशात ‘दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत’ असा वाद निर्माण करणे. कारण, एकेकाळी ‘काऊबेल्ट पार्टी’ असे हिणवले जाणार्‍या भाजपला आज देशाच्या सर्व कानाकोपर्‍यातून प्रचंड मोठा जनाधार मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अहमदाबाद, जयपूर, राजस्थान, श्रीनगर, लखनऊ, मुंबई, विशाखापट्टणम, बंगळुरू, दिब्रुगढ, चेन्नई, तिरुवनंतपुरम, हैदराबाद, चंदिगढ अशी सर्वदूर झाली आहे. त्यामुळे दक्षिण भारतात एकेकाळी द्रविडी राजकारणाने जो फुटीरतेचा प्रयोग केला होता, त्यालाच पुढे नेण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत. कारण, आता दक्षिण भारतातही भाजपला जनाधार मिळण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे हादरलेल्या काँग्रेसने जाणीवपूर्वक असा वाद सुरू केला आहे.राहुल गांधींनी हा प्रयोग फक्त केरळमध्येच केला, असेही नाही. जवळपास दहा ते बारा दिवसांपूर्वी त्यांनी आसाममध्ये एक सभा घेतली. त्या सभेत ‘आसाम विरुद्ध गुजरात’ असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते म्हणाले की, “सध्या चहाच्या मळ्यात काम करणार्‍या श्रमिकांना 167 रुपये मोबदला मिळतो. आमच्या पक्षाचे सरकार आले की हा मोबदला ३६५ रुपये होईल, याची मी शाश्वती देतो आणि त्यासाठीचा पैसा हा गुजरातचे व्यापारी आणि व्यावसायिक यांच्या खिशातून काढला जाईल.”



आता एका राष्ट्रीय पक्षाच्या माजी अध्यक्षाने अशाप्रकारे विधान करणे, हे अत्यंत घृणास्पद आहे. देशात ‘बंगाली विरुद्ध पंजाबी’, ‘आसामी विरुद्ध गुजराती’, ‘तामिळ विरुद्ध मराठी’ असे प्रादेशिक वाद निर्माण करण्याचा हा प्रयोग काँग्रेस पक्ष पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत चालवणार, यात शंका नाही. त्यांच्या सोबतीला लिबरल लेखक, पत्रकार ‘भाजप म्हणजे उत्तर भारताचा पक्ष’, ‘नरेंद्र मोदी केवळ गुजरात्यांचे नेते’, ‘प्रभू राम दक्षिण भारताचे सांस्कृतिक प्रतीक नाही’, ‘भाजपची संस्कृती दक्षिण भारतीय संस्कृतीला नष्ट करीत आहे’ अशा अर्थाचे लेख प्रसवतील. त्यामुळे नाही म्हटले तरी हा मुद्दा राजकारणात पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या अशा राजकारणावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि योग्य वेळी अशा द्वेषमूलक राजकारणाचा निकाल लावणे हे अत्यंत गरजेचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@