कार्टुन्समधील महिलांनाही बुरखा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2021   
Total Views |

cartoons_1  H x

आम्ही कुणाचे अंकित राहणार नाही, कुणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचे वर्तन. पण, बाहेर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जपणारा इराण, आपल्या देशांतर्गत स्वातंत्र्याचा किती आदर करतो, याचा विचार करायला हवा.


क्षितिजाच्या पूर्वेला सूर्य उगवतो
खर्‍या धर्माचे प्रतीक
ओ इस्लाम तुझा संदेश
स्वतंत्र, स्वातंत्र्य आमच्या आत्म्याला
अंकित करते
इराणच्या राष्ट्रगीताचे हे पहिले कडवे. हे वाचून वाटते की, स्वतंत्र आणि स्वातंत्र्य हे इराणच्या सामाजिक आणि इस्लाम धार्मिकतेचे अंतरंग असावे. देशातील सर्वच नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य असावे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुभा असावी. देशाला किंवा समाजाला हानी न होणारे वर्तन, वेशभूषा आणि केशभूषा लोक करू शकत असावेत. इराणने तसेही त्यांना वाटणार्‍या शत्रूराष्ट्राशी नेहमीच युद्धगत वर्तन केले आहे. आम्ही कुणाचे अंकित राहणार नाही, कुणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचे वर्तन. पण, बाहेर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जपणारा इराण, आपल्या देशांतर्गत स्वातंत्र्याचा किती आदर करतो, याचा विचार करायला हवा.
त्याअनुषंगाने नुकतीच एक घटना अभ्यासण्यासारखी आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी नुकतीच एक घोषणा केली की, ‘दूरदर्शन’वर दाखवल्या गेलेल्या कार्टुन्समधील महिलांनाही बुरखा घातलेला दाखवावा. का? तर म्हणे लहान मुली कार्टुन्स बघतात. कार्टुन्समध्ये बिना बुरख्याच्या आणि बहुधा पाश्चात्त्य वेशभूषा केलेल्या महिला पाहून इराणच्या लहान मुलीही मोठ्या झाल्यावर तसेच कपडे घालतील. बुरखा म्हणजे ‘हिजाब’ घालणार नाहीत आणि ‘हिजाब’ घातला नाही, तर इस्लाम ‘शरिया’मध्ये महिलांसाठी जे काही सांगितले गेले त्यांचा अपमान होईल. ‘शरिया’चा अपमान म्हणजे इस्लामचा अपमान. इस्लामचा अपमान म्हणजे अल्लाचा अपमान, असा या नियमामागचा तर्क. या तर्कामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की, मुलीबाळींच्या कपड्यांवर धर्म अवलंबून आहे का? जर पारंपरिक कपडे परिधान केले नाहीत तर धर्म बुडतो? तर धर्माचा अपमान होतो? धर्म म्हणजे धारण करणारा, जो माणसाला जगण्याची मूल्य देतो. धर्म म्हणजे माणसाला माणसारखे जगण्याचे तंत्र देतो. मग मुस्लीम धर्माचे अनुयायी असलेल्या इराणमध्ये नेहमीच मुलीबाळींच्या जगण्यावर का नियम लादले जातात? त्यांना तिथल्या पुरुष नागरिकांपेक्षा वेगळे नियम का लावले जातात. अर्थात, इथे पुरुष आणि स्त्री यांची तुलना नाहीच आहे. मात्र, पुरुष आणि धर्मांध खोमेनींच्या इराणमध्ये धार्मिक आणि कालबाह्य रूढी-पंरपरा यांचा बेगडी बोजा इथल्या महिलांवर आहेच. आता इथे कुणी म्हणेल की, बुरखा घालणे आणि न घालणे यावर स्वातंत्र्य अवलंबून असते का? नसतेच. पण, बुरखा घातला किंवा घुंगटही घेतला म्हणून मन आणि त्याचे विचार थांबतात का? ते विचार नैतिक अनैतिकच्या पलीकडचेही असू शकतात. मग बुरखा घालूनच सभ्यता टिकते किंवा संस्कृती टिकते, धर्म टिकतो, असे म्हणणे चूकच आहे.
आपला चेहरा परपुरुषांनी पाहू नये, असा यामागचा उद्देश असेलही. पण, बुरखा घातला म्हणून त्या स्त्रीवर अत्याचार होत नाही असे आहे का? तिने तिचे तोंड भलेही परपुरुषाला दाखवले नाही. पण, आकर्षण फक्त चेहर्‍याचेच असते का? शरीराचेच असते का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यावर चांगलेच विचार मांडले आहेत. ते वाचण्यासारखे आहेत. पण, ते पुढे केव्हा तरी.असो. खोमेनी म्हणतात की, “इस्लाम हा राजकीय धर्म आहे, त्यामुळे महिलांनी राजकारणात माफक भाग घ्यावा. पण, महिलांना राजकारणात जास्त हक्क देणे हे वेश्यावृत्तीसारखे आहे.” याच खोमेनींच्या राज्यात एक कायदा पारित झाला. तो असा की, इस्लाममध्ये शक्यतो दुसर्‍या विवाहासाठी पहिल्या पत्नीची संमती घेतली जाते. (असे खोमेनींचे मत आहे) पण, पत्नी दुसर्‍या विवाहास संमती देत नसेल, तर ‘मारीयेह’ या नावाने सरकार दरबारी कर भरा. याच इराणमध्ये महिलांना खेळाच्या स्टेडियमध्ये जाण्यास बंदी होती, तर अशा या खोमेनींच्या राज्यात आता कार्टुन्समधील महिलाही बुरखा घालतील. इराणच्या राष्ट्रगीतामध्ये स्वातंत्र्याचे पूजन केले आहे. ते मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य इराणच्या महिलांना नाही का? खोमेनींना हे माहिती आहे का? की, बंधन घातल्यावर मनाचे स्वातंत्र्य आणखी उसळते. कार्टुन्समधल्या महिलांना बुरखा घातला तरी देशातल्या महिलांच्या मनाला कसा बुरखा घालणार?
@@AUTHORINFO_V1@@