महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच ‘सिख्स फॉर जस्टिस’ने पत्र का लिहावे, याचे उत्तर शोधायचे ठरवले, तर महेश भटच्या मुलाशीच डेव्हिड हेडलीने दोस्ती का केली होती, या प्रश्नात ते सापडेल!
‘वळणाचे पाणी वळणाकडेच जाते,’ अशा आशयाची मराठीत एक म्हण आहे. शेतकरी आंदोलनातला खलिस्तानी सहभाग समोर यायला लागला, तेव्हा त्याची चेष्टा केली गेली. मग कॅनडा, लंडन अशा ठिकाणी या आंदोलनाच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर यायला लागले. सरकार आणि माध्यमांच्या काही कोपर्यात या विषयावर चर्चा झाली. मात्र, दुसर्या गटातील डावे पत्रकार आणि मोदीद्वेेष्टे या खवखवीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. खलिस्तानवाद्यांचे हे मनसुबे आजचे नाहीत. सुवर्ण मंदिर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांपासून ब्रार यांच्यावर लंडन येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यापर्यंत केलेल्या उघड अतिरेकी कारवायांना यश मिळत नाही, असे लक्षात आल्यावर, खलिस्तानवाद्यांनी आता अराजकाचा आधार घेऊन आपल्या कारवाया चालविल्या आहेत. अराजक दिसायला लागले की, त्यात उडी मारायची आणि ते अधिक कसे वाढविता येईल, त्यासाठी प्रयत्न करायचे, असा खलिस्तानवाद्यांचा प्रयत्न असतो. मूठभर खलिस्तानवाद्यांची ही मागणी संपूर्ण पंजाबचीच मागणी आहे, असा कांगावा नेहमी केला जातो आणि त्यात शीख समाज नाहक बदनाम होत असतो. या सगळ्या विषयाला आता नवे वळण मिळाले आहे. हे वळण अराजकांच्या युती कशा नांदत आहेत आणि देश चालविण्याची जबाबदारी घेतलेल्या माणसाला कशा कशा प्रकारच्या चकव्यातून येणार्या देशविरोधी संकटांना तोंड द्यायचे असते, त्याचे हे प्रतीक आहे. ‘सिख्स फॉर जस्टिस’ या संघटनेने आता पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र भारतापासून वेगळा करून त्याचे स्वतंत्र राष्ट्र करावे, अशी मागणी केली आहे. या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहून भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. डेव्हिड हेडलीचे प्रकरण सुरू होण्यापूर्वीपर्यंत महेश भट आपल्या देशातल्या सेक्युलॅरिजमचे ठेकेदार होते. सिनेमा सोडून या सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्याची त्यांना मोठी हौस होती. मात्र, डेव्हिड हेडली जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने सगळ्यात आधी जर कोणाशी दोस्ती केली असेल, तर ती महेश भट यांच्या मुलाशीच. पुढे तो मुलगा पुराव्याअभावी सुटला आणि महेश भट यांच्या सेक्युलर टिवटिवाटातून आपण लोक सुटलो.
पण, त्याने अख्ख्या मुंबईत दोस्ती करायला महेश भट यांच्याच मुलाला का शोधले, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे असेल, तर त्याचे उत्तर ‘सिख्स फॉर जस्टिस’ या संस्थेने बंगाल आणि महाराष्ट्राच्याच मुख्यमंत्र्यांना पत्रे का लिहिली, या प्रश्नांतच सापडू शकते, अशी अजूनही दोन-तीन उदाहरणे आहेत. मात्र, विस्तारभयामुळे आता ती लिहिता येत नाहीत. असे लोक नेहमी आपल्याला साजेशे लोकच शोधत असतात. ममता आणि त्यांच्या पक्षातले लोक आणि इथे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासारखे लोक यांच्यात खुळेपणाची स्पर्धा लावली तर कोण जिंकेल, हे सांगता येऊ शकत नाही, अशी त्या दोघांची प्रतिभा आहे. त्यामुळे अराजकाचा हा पारा दुसर्या अराजकातच जाऊन मिसळतो, तसा तो इथेही मिसळला आहे आणि या दोन्ही मंडळींनाच त्यांनी गाठले आहे. जिथे प्रतिसादाची अपेक्षा असते, तिथेच असे संवाद साधले जातात. या दोन्ही पक्षाच्या मंडळींनी सध्या आपल्या राज्याची अस्मिता राष्ट्रीय अस्मितेपेक्षा जास्त फुगविली आहे. खरे तर या दोन्ही राज्यांना कणखर अस्मिता, परंपरा आणि योगदान आहे. मात्र, ते राष्ट्रीय आहे. या दोन पक्षाच्या अस्मिता अत्यंत खुज्या, आपल्या मालकांचे तळवे चाटण्याच्या आणि त्यालाच राज्याची अस्मिता म्हणून मान्यता देण्याची केविलवाणी धडपड करणार्या आहेत. महाराष्ट्रात पर्यायी सत्ता स्थापन करून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण केल्यानंतर शिवसेना जी काही सुटली आहे, त्याला कधी ना कधी ब्रेक लागणारच आहे. ममतांचेही तसेच आहे. तर्क संपला की, माकडचेष्टा करणारी ही मंडळी पुढे कुठल्याही थराला जातात. त्यांनाही त्याचे मग भान राहत नाही. आपण देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलतोय याचे भान ही मंडळी ठेवत नाहीत. या बेभान अवस्थेत आता हे लोक देशविरोधी लोकांच्या कळपात जाऊन सामील झाले आहेत. मुस्लीम मतांसाठी ममतांचे प्रयोग जाहीर आहेत, तर महाराष्ट्रात आता धर्मांधांना शिंगे फुटू लागली आहेत.
एकंदरीतच शेतकरी आंदोलनाच्या मागून आपले डावपेच खेळणारे लोक एकामागोमाग एक उघडे पडत चालले आहेत हे बरे. कारण, त्यामुळे या आंदोलनाच्या आडून आपला मोदीद्वेषाचा कंडू शमविण्याचे उद्योग करणार्यांचीही खरी रूपे समोर येत आहेत. खलिस्तान म्हणजे शिखांचे स्वतंत्र राष्ट्र. या स्वतंत्र राष्ट्राचे एक खुळचट स्वप्न बाळगून एक गट अन्य मंडळींना स्वप्नरंजनात रमवतो आहे. हे शेतकरी आंदोलन बंगालमध्ये नेऊन तिथे भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्याचा या मंडळींचा डाव आहे आणि त्यामुळे मोदी पराभूत होतील अशी आशा यांना वाटतेे. भारतात अशा मागण्या यापूर्वी झाल्या नाहीत असे नाही. पण, भारतीयत्वाचा म्हणून जो काही एक भाव आहे तो भाग हे राष्ट्र एकसंघ ठेवून आहे. अशा मनाने आणि विचारांनी खुज्या लोकांना त्या त्या प्रांतातील लोकांनीही आपले प्रतिनिधित्व करू दिलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्तेचे खेळ चालू असतातच. हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देण्यापासून ते तितक्या लष्करी सैनिकांनी आपले रक्त देशाच्या अखंडतेसाठी युद्धात आणि सीमांवर सांडले आहे. त्यांच्या पुण्याईवर हा देश अक्षुण्ण आहे. संतुलित विरोध लोकशाहीचेच एक अंग आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी या विरोधी पक्षाचाही वस्तुपाठ इथे घालून दिलेला आहे. पण, द्वेष मान्यता मिळवू शकत नाही. अर्थात, यांची तुलना वाजपेयींसारख्या नेत्याशी करणे चुकीचेच; पण मोदीद्वेषाच्या कारणामुळे आज आपण कोणाच्या पक्तींत जाऊन बसलो, याचा तरी या मंडळींनी विचार करावा.