पुण्यापेक्षाही मुंबईची हवा प्रदूषित

    24-Feb-2021
Total Views |
air pollution _1 &nb



मुंबई -
किनारी क्षेत्राचा फायदा असूनही मुंबईत हवेची गुणवत्ता अनेक वेळा ढासळते. आजही मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली आहे. भारत सरकारच्या 'सफर'च्या आकडेवारीनुसार आज मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण निर्देशांक (एक्यूआय) २९३ नोंदविण्यात आला असून गुणवत्तेचा स्तर 'वाईट' आहे. याउलट पुण्याचा एक्यूआय केवळ ११८ नोंदविण्यात आला आहे.
 
 
 
मुंबईची हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावल्याचे चित्र आज दिसून येत आहे. वातावरणात सात्यताने होणाऱ्या बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. किनारी क्षेत्रात वसलेल्या भूप्रदेशांना समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा फायदा होतो. कारण, या वाऱ्यांमुळे वातावरणात असलेले प्रदूषित धुलीकण वाहून जातात. मात्र, हवेतील आर्दता वाढल्यास हे धूलीकण वाहून जाण्यास बाधा निर्माण होते. हवेमधील २.५ पीएम हे कण प्रदूषणास कारक असतात. मुंबईचे सकाळचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या घरात नोंदविण्यात येत असले तरी, रात्रीचे तापमानातही तेवढीच घट होते. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळते. आज शहरातील हवेची गुणवत्ता 'वाईट' स्तरावर नोंदविण्यात आली आहे.
 
 
 
आज मुंबईतील सर्वात वाईट हवेची गुणवत्ता मालाड परिसरात नोंदविण्यात आली. याठिकाणी 'एक्यूआय' ३३९ आहे. त्यानंतर अंधेरी ३३३, बीकेसी ३२४, कुलाबा ३२४ आणि चेंबूरचा ३०१ 'एक्यूआय' नोंदवण्यात आला. तर नवी मुंबईत हवेचा 'एक्यूआय' १४५ नोंदविण्यात आला आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर ० ते ५० (चांगली), ५१ ते १०० (समाधानकारक), १०१ ते २०० (मध्यम), २०१ ते ३०० (वाईट), ३०१ ते ४०० (अत्यंत वाईट) आणि ४०१ ते ५०० (धोकादायक) अशा प्रकारे मोजण्यात येतो.