कृतार्थतेचा ‘आनंद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2021   
Total Views |

RSS _1  H x W:
 
 

विनोबाजींच्या आचरणानुसार स्वार्थी, परमार्थी न होता ‘परार्थ’ होऊन ‘कृतार्थतेचा आनंद’ उपभोगणारे ८७ वर्षीय आनंद वासुदेव भागवत यांचा प्रेरणादायी पाणी संघर्ष...
 
 
’मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासुनि जाते. कृपा केलीया रघुनाथे, प्रचिती येते,’ या संत रामदासांच्या दासबोधातील कवनाप्रमाणे योजिलेला संकल्प तडीस नेणारे आनंद भागवत यांचा जन्म १ फेब्रुवारी, १९३५ साली झाला. जन्मापासून ठाणेकर असलेल्या भागवत यांचे शिक्षण एमएच हायस्कूलमध्ये तेव्हाच्या अकरावी एसएससीपर्यंत झाले. एअर फोर्समध्ये निवड झाली. पण, घरच्यांनी जाऊ न दिल्याने रेल्वे स्टेशन मास्तरची परीक्षा देऊन रेल्वेची नोकरी पत्करली.
 
 
पुढे नोकरी सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कामही केले. मध्यंतरी काही काळ ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय केला. पुढे आंतरराष्ट्रीय कंपनीत राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षकाची जबाबदारीदेखील पार पाडल्यानंतर वयपरत्वे चाकरीतून निवृत्ती स्वीकारली. मात्र, आयुष्यभर वाचन, लेखन, संभाषण, प्रशिक्षण, चिंतन, व्याख्यान, मनन, व्यवस्थापन, परिवर्तन आणि समायोजन यांची कास धरून काम करणारे भागवत निवृत्तीनंतरचे आयुष्य निवांत न जगता, शैक्षणिक क्षेत्रातील ‘विद्याभारती’ या अखिल भारतीय संस्थेशी जोडले गेले. या संस्थेमार्फत तालुक्यातील गावांमध्ये शिक्षकांना प्रेरणा-मार्गदर्शनासाठी दौरे होत असत.
 
 
तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील नद्या-तलाव आणि धरणांचे तालुके म्हटल्या जाणार्‍या पर्जन्यबहुल शहापूर, मुरबाडमधील गावांत पाण्याचे दुर्भिक्ष त्यांनी पाहिले आणि इथे काही तरी केले पाहिजे, या निश्चयाने त्यांना झपाटले. समविचारी समवयस्कांना सोबत घेत उतारवयात आनंद भागवत यांनी गावोगावच्या शिक्षक, विद्यार्थी व गावकर्‍यांशी संवाद साधून ही दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू केले. त्याचेच फलित म्हणजे, २०१६ साली ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन झाली. या संस्थेचे मुख्य मार्गदर्शक होते आनंद भागवत. हा पाणीप्रश्न हाती घेत याच ‘वसुंधरा संजीवनी संस्थे’च्या माध्यमातून, तहानलेल्या या गावांना संजीवनी देण्याचे कार्य भागवत यांनी सुरू केले, जे आजतागायत सुरूच ठेवले आहे. एकप्रकारे पाणी व्यवस्थापन मजबूत करण्यावर त्यांचा भर असून शासन दरबारीदेखील याची दखल घेतली गेली आहे. परिणामी, कनकवीरा नदीसाठी सरकारने डीपीआरदेखील तयार केल्याचे भागवत यांनी सांगितले.
 
 
आपल्या भगीरथ प्रयत्नांतून १४ ‘चेकडॅम्स’ व १२५ हून अधिक वनराई बंधारे उभारून आनंद भागवत गेली पाच वर्षे मुरबाड व शहापूर तालुक्यात पाणीप्रश्नावर विधायक कामे करीत आहेत. अनेक तलावांचा गाळ काढण्यात भागवत यांची संस्था यशस्वी झाली आहे. २० प्रवाह मिळतात त्या कनकवीरा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरूच असून आतापर्यंत बहुतांश नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम झाले आहे. या सर्व कामामुळे तलावातील तसेच नदीतील पाणीसाठा वाढला असून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. पूर्वी वर्षातून एकदाच भातशेती होत होती. आता भातशेतीसोबतच कडधान्ये व भाजीपाला पिकू लागला आहे. ‘चेकडॅम्स’ व वनराई बंधारे यांच्या एकत्रित परिणामातून रोजगारनिर्मिती झाली आहे. पाण्याची उपलब्धता व शेतीमध्ये वाढ झाल्याने शेतीपूरक उद्योग सुरू होऊन निर्यातही होऊ लागली. याचे श्रेय गावकरी भागवत आणि त्यांच्या मंडळाला देतात.
 
 
१९६० ते १९६८ या आठ वर्षांच्या कालावधीत आनंद भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणूनही काम केले. सोलापूर जिल्ह्यात सहा वर्षे, तर दोन वर्षे त्यांनी मुंबई उपनगरात काम केले. ‘देणार्‍याचे हात हजार’ असे मानणार्‍या भागवत यांचे म्हणणे असे की, तुम्ही मनापासून, तळमळीने आणि निःस्वार्थीपणे काम करत असाल तर पैसा कमी पडत नाही. हजारो लोक मदतीला येतात. ‘रोटरी क्लब’, ‘लायन्स क्लब’ आणि ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) यांना कामाचे प्रेझेंटेशन देऊन तो निधीही भागवत यांनी या गावांच्या विकासाकडे वळवला.त्यामुळे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण जे ‘रोटरी’ आणि ‘लायन्स क्लब’चे सन्माननीय सदस्यत्व (ऑनररी मेंबर) भागवत यांना मिळाले.
 
 
आनंद भागवत निवृत्तीच्या वयात भावी पिढ्यांच्या भल्याकरिता शाश्वत स्वरूपाचे काम करीत आहेत. उत्कृष्ट वक्ता, कसदार लेखक, विद्यार्थीप्रिय प्रशिक्षक, यशस्वी समुपदेशक, समर्पित कार्यकर्ता अशी ओळख असणार्‍या भागवतांना त्यासाठी मानाचे अनेक पुरस्कार आजवर मिळाले. पण, उतारवयात खेडूतांनी त्यांना उद्देशून ‘पाणीवाले काका’ ही दिलेली उपाधी हाच सर्वात मोठा पुरस्कार ते मानतात. ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने पाच वर्षे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा हा उपक्रम १९८० या दरम्यान राबवला.
 
 
त्यांच्या घरी सुमारे लाखभर रुपयांची पुस्तके आहेत. वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यभरात भागवत यांनी १०० व्याख्याने दिली असून यातली अनेक विनामूल्य होती. वयाची साठी उलटली की, आपण ज्येष्ठ नागरिक समजू लागतो.परंतु, स्वतःला वृद्ध, वयस्कर समजण्यापेक्षा ‘मनी धरावे ते होते’ हे दासबोध आचरणात आणा, असा सल्ला देताना भागवत आपल्या कुटुंबीयांची भरभरून स्तुती करतात. तीन वर्षांपूर्वी पत्नी वियोगानंतरही समाजसेवेत स्वतःला झोकून दिल्याचे आवर्जून सांगतात.



@@AUTHORINFO_V1@@