‘लॉकडाऊन’बाबत ‘अल्टिमेटम’!

    22-Feb-2021
Total Views |

lokckdown in maharashtra_



मुख्यमंत्र्यांकडून आठ दिवसांची मुदत; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीच्या संसर्गावर राज्यात पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी आठ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला. राज्यात ‘लॉकडाऊन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठ दिवसांत जनतेने करायचा आहे, असे ते यावेळी म्हणाले. “मास्क घाला, शिस्त पाळा आणि ‘लॉकडाऊन’ टाळा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
 
 
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित केले. ते म्हणाले, “कोविड परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपणदेखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता.गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. त्यात आपल्याला यशही आले. मुंबईत आपण दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढत आहेत. आज दिवसभरात सुमारे सात हजार रुग्ण आढळले ही चिंताजनक बाब आहे. गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेड्स, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत. मात्र, आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळे खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत. लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरत आहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत, हे बरोबर नाही. सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
 
 
 
ते पुढे म्हणाले की, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखलेसुद्धा पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे. आपण सर्व बाहेर आलो आहोत. त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वांनी पार पाडण्यासाठी मी जबाबदार ही मोहीम सुरू करीत आहोत,” असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. “कोविडची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली. ‘एमएमआरडीए’च्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली, पर्यटन असो किंवा कृषी क्षेत्र असो आपण विकासाची कामे सुरूच ठेवली,” असा दावा त्यांनी यावेळी केला.
 
 
 
 
अमरावतीमध्ये आठवड्याभराची टाळेबंदी, तर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी

अमरावतीत एका दिवसात ७२७ विक्रमी रुग्णसंख्या आढळून आल्यानंतर राज्याच्या महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येत्या आठवड्याभराचे ‘लॉकडाऊन’ जाहीर केले आहे. सोमवार, दि. २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवार, दि. २१ फेब्रुवार रोजी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
 
 
 
 
‘दहशतीचे वातावरण निर्माण करू नका’
 
“राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. पण लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. कुठलीतरी जुलमी राजवटासारखी कृती करू नका,” असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सरकारला सुनावले. पुणे येथे पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “भावनिक आवाहनापेक्षा, संवादापेक्षा क्षमतेने आणि गतीने कृतीची आवश्यकता आहे. कारण, इतर राज्यांमध्ये कोरोना संपुष्टात आला. त्या राज्यांनी व्यवस्था ही क्षमतेने आणि ताकदीने केली. कदाचित आपण कमी पडलो. आपला ‘रिकव्हरी रेट’ अत्यंत अत्यल्प आहे. कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडले तेव्हा इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले. पण या सरकारने तसे काही आर्थिक पॅकेज जाहीर केले नाही. रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्यामुळे भीतीची दहशत निर्माण करण्यापेक्षा आधार देऊन मार्ग काढावा, ही सरकारला विनंती आहे,” असे ते म्हणाले.