
सिंधुदुर्ग : राज्यात कोरोना वाढत असल्याने सरकार लॉक डाउनचा विचार करत आहे तर दुसरीकडे अधिवेशन देखील कमी वेळात उरकून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावर कोरोना आणि अधिवेशन याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारला कुठल्याच विषयाचं गांभीर्य नाही. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. कोरोना झाला म्हणून जर तुम्ही अधिवेशन टाळणार असाल तर महाराष्ट्राची जनता सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या महाविकास आघाडी सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा पडलकरांनी सरकारला दिला आहे.
तसेच पेट्रोल दरवाढीवरून आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.त्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना याबाबत विचारले असता, आम्ही सामना पेपर वाचत नसून आज शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कोकणात सामनाच्या किती प्रती येतात? असा सवाल उपस्थित केला.तसेच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
गोपीचंद पडळकर यांनी यावेळी धनगर समाज आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, धनगर समाज आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलंत आहे. कोरोना काळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना काही कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्याकडे उपचार करण्याइतकी परिस्थिती नाही. मात्र आमची भूमिका आजही ज्वलंत असल्याचेही पडळकरांनी स्पष्ट केले.
तसेच विधानसभेत ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले होत, की लॉकडाऊन काळात 100 युनिटपर्यंत ज्यांचे बिल आलेले आहे ते आम्ही माफ करू. नंतर 100 ते 300 युनिटपर्यंत बिल आले, त्यांना आम्ही मदत करू असे ऊर्जामंत्री म्हणाले होते. नंतर मग त्यांनी घुमजाव केला. उर्जामंत्र्यांनी ही फसवणूक केली असल्याचा आरोपही पडळकरांनी यावेळी केला.