मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील तरुण सरीसृपशास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशामधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ही प्रजात 'बेन्ट-टोड गेको' पालीची असून तिचे नामकरण 'सायोटोडॅक्टिलस अरुणाचलेन्सिस' असे करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश हे सरीसृपांच्या दृष्टीने ईशान्य भारतातील फार कमी प्रमाणात सर्वेक्षित करण्यात आलेले राज्य आहे.
राज्यातील तरुण सरीसृपशास्त्र संशोधकांनी २५ जून ते ५ आॅगस्ट, २०१९ दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये सरीसृपांच्या दृष्टीने सर्वेक्षण केले होते. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे हर्षल भोसले यांच्या नेतृत्वाअंतर्गत 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, बंगळुरू'चे झीशान ए मिर्झा, 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे मंदार सावंत, पुण्याचे पुष्कर फणसाळकर, 'आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे' येथील गौरंग गावंडे आणि 'वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठा'चे हर्षिल पटेल यांचा समावेश होता. या सर्वेक्षणाचे फलित म्हणजे संशोधकांनी सरीसृपांच्या चार नव्या प्रजातींचा उलगडा केला. यामध्ये तीन साप आणि एका पालीच्या प्रजातीचा समावेश आहे. पालीच्या या नव्या प्रजातीचा शोधनिबंध नुकताच 'आंतरराष्ट्रीय पीअर-रिव्ह्यूड जर्नल इव्होल्यूशनरी सिस्टमॅटिक्स'च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
अरुणचाल प्रदेशातील डाफला आणि मिश्मी डोंगररांगांमधून 'सायोटोडॅक्टिलस' कुळातील पालीची नवी प्रजात समोर आली आहे. या डोंगररांगांमध्ये साधारण १७९ मीटर ते १,४०० मीटरपर्यंतच्या उंच भागात ही पाल आढळते. अरुणाचल प्रदेश हे सरीसृपांच्या विविधतेच्या दृष्टीने आणि विशेषत: 'सायोटोडॅक्टिलस' या कुळाच्या बाबतीत ईशान्य भारतातील सर्वात कमी अन्वेषण केलेल्या राज्यांपैकी एक असल्याचे भोसले यांनी सांगितले. दीर्घकालीन सर्वेक्षणाच्या माध्यमातून याठिकाणाहून अजून काही नव्या प्रजातींचा उलगडा होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्याने उलगडलेली 'सायोटोडॅक्टिलस अरुणाचलेन्सिस' ही प्रजात निशाचर आहे. सामान्यत: ती खडकाळ भागात किंवा कलवटखाली आढळते. या कुळातील बहुतेक पाली वरकरणी एकसारख्या दिसतात. म्हणूनच प्रजातीनुसार त्यांची विभागणी करण्यासाठी बारकाईने केलेले निरीक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या नव्या प्रजातीचे निरीक्षण करण्यासाठी संशोधकांनी आकारशास्त्र आणि गुणसूत्र पद्धतीचा अवलंब केला.