तरुणाईची भाषा लिहिणारा लेखक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2021   
Total Views |

Sudeep nagarkar_1 &n


प्रेमकथांतून सामाजिक विषयांवर भाष्य करणारा, दशकभरामध्ये १४ कादंबर्‍यांतून लाखो वाचकांपर्यंत पोहोचलेला मराठमोळा कादंबरीकार सुदीप नगरकर याच्याविषयी...
 
 
माणसाच्या आयुष्यात यश, अपयश हे येत, जात असतं. काही माणसे आलेले अपयश पचवितात, तर काही माणसे त्या अपयशाच्या काळामध्येही स्वतःला नव्याने शोधतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की, त्या क्षणांनी व्यक्तीच्या आयुष्याची दिशाच बदलते. जो माणूस अशा परिस्थितीमध्ये संधीचे सोने करून आपला रस्ता सुखकर करतो, त्याच्या वाट्याला यश येते. मनामध्ये असलेली खदखद प्रत्येकाला व्यक्त करता येत नाही. पण, प्रत्येकाला ती खदखद व्यक्त करावीशी वाटत असते. एखादा एखाद्याशी संवाद साधून ती खदखद व्यक्त करतो, तर कोणी आपल्या डायरीमध्ये सारं काही लिहून ती खदखद व्यक्त करत असतो. इंजिनिअरिंगला असताना ज्याला अपयशाला सामोरे जावे लागले आणि त्यातून प्रेरणा घेऊन तो लिहू लागला आणि अल्पावधीतच त्याची पुस्तके ही संपूर्ण भारतभर पोहोचून ‘बेस्ट सेलिंग’ ठरली, असा तरुण लेखक सुदीप नगरकर याच्याविषयी...
 
 
 
सुदीप नगरकर याचा जन्म ठाणे येथे दि. २६ फेब्रुवारी, १९८८ रोजी झाला. सुदीप मूळचा अहमदनगरचा. सुदीपचे संपूर्ण कुटुंब ठाणे येथे स्थायिक झाले. त्यामुळे त्याचे बालपण हे ठाण्यासारख्या शहरामध्ये गेले. त्याच्या जडणघडणीमध्ये शहरी जीवनाचा प्रभाव पडलेला दिसतो. सुदीपचे आईवडील दोघेही खासगी नोकरीमध्ये कार्यरत. घरात साहित्य, वाचन किंवा ‘क्रिएटिव्ह’ परंपरा नसलेले सुदीपचे कुटुंब. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालेल्या सुदीपला वाचनाची आणि लेखनाची आवड ही महाविद्यालयामध्ये असताना लागली. सुदीप सांगतो, त्याला शाळेमध्ये निबंध लिहिण्यासही भीती वाटे. सुदीपचे माध्यमिक शिक्षण हे ठाण्यातील ‘सेंट जॉन दि बाप्टिस्ट हायस्कूल’ येथून झाले. त्याने त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी ‘दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये प्रवेश घेतला. या इंजिनिअरिंगच्या काळात त्याला लेखनाची आवड निर्माण झाली. इंजिनिअरिंगमध्ये असताना आलेले अपयश त्याला लिहिण्याची प्रेरणा देऊन गेले. “अपयश आले की, समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. जवळचे मित्र, माणसांचा आपल्याबद्दल वेगळा दृष्टिकोन निर्माण होतो. त्याचा नकारात्मक परिणाम व्यक्तीवर होत असतो,” असे सुदीप लिहिण्याच्या प्रेरणेविषयी बोलताना सांगतो. त्याला इंजिनिअरिंगला असताना दोन वर्षे अपयशाचा सामना करावा लागला. कधीही अपयश न पाहिलेला सुदीप मग अपयशाने आत्ममग्न होऊन लिहू लागला. त्याने त्याच्या इंजिनिअरिंग दरम्यानचे अनुभव शब्दबद्ध करीत पुस्तक लिहिले. त्याने इंजिनिअरिंगनंतर ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ येथून ‘एमबीए’ची पदवी घेतली. त्यानंतर २०११ ते २०१३ त्याने आयटी कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. पण, तो त्यात रमला नाही. त्याचा तो पिंड नाही, याची त्यास ओळख झाल्यानंतर त्याने २०१३ रोजी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन पूर्णवेळ लेखन करण्याचा मार्ग निवडला. महाराष्ट्रात मध्यमवर्गामध्ये नोकरीची संस्कृती मोठ्या प्रमाणावर रुजलेली असताना असा निर्णय घेणे अवघड असते. “नोकरीचा नियमित मिळणारा पगार सोडून रॉयल्टीवर जगण्याचा घेतलेला निर्णय हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय होता,” असे सुदीप आवर्जून सांगतो.
 
 
 
२०११ नंतर सुदीपने लेखनासाठी स्वतःला झोकून देऊन विविध विषयांवर विपुल असे लेखन केले. त्याने तरुणवर्गाचे विषय त्याच्या प्रेमकथांतून मांडत त्या कथांमधून सामाजिक संदेशही दिला. ‘एलजीबीटी’, ‘विद्यार्थ्यांचे राजकारण’ असे त्याच्या कादंबरीचे काही विषय. त्याच्या कादंबर्‍यांना अल्पावधीत भारतभरातून मोठा वाचकवर्ग मिळाला असून, त्याच्या पुस्तकांच्या आजपर्यंत एक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. तरुणांचे प्रश्न प्रेमकथांतून मांडताना तरुणमंडळी पुस्तके विकत घेऊन आजही वाचतात, हे त्याच्या पुस्तकविक्रीच्या आकड्यांवरुनच समजते. त्यामुळे वाचकांना अभिप्रेत विषय जर मांडले तर त्यातून उत्तम प्रतिसाद मिळतो, असा त्याचा विश्वास आहे. सुदीपने ‘फिह्यू थिंग्ज लेफ्ट अनसेड’पासून सुरू केलेला प्रवास त्याच्या ‘दॅट्स द वे वुई मेट’, ‘इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट’, ‘सॉरी यू आर नॉट माय टाईप’, ‘यू आर द पासवर्ड टू माय लाईफ’, ‘यू आर ट्रेंडिंग इन माय ड्रीम्स’सारख्या कादंबर्‍यांतून प्रेमकथांच्या साहाय्याने ज्वलंत विषय सोप्या रीतीने मांडले आहेत. “लेखन क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या युवकांनी स्वतःची आर्थिक बाजू मजबूत करून, या क्षेत्राचा पूर्णवेळ लेखक होण्यासाठी विचार करावा व या क्षेत्रामध्ये नवनवीन विषय मांडले, तर त्यास नक्कीच वाचक प्राप्त होतो,” असे तो नवलेखकांना सांगतो. त्याच्या कादंबर्‍यांसाठी सुदीपला ‘फोर्ब्स’च्या ‘इन्फ्लुएन्शियल सेलेब ऑफ इंडिया’च्या यादीमध्ये सलग दोन वर्षे नामांकन मिळाले. त्यासोबतच ‘झी अ‍ॅवॉर्ड’मध्ये ‘युथ आयकॉन ऑफ इंडिया’, ‘बेस्ट फिक्शन नोव्हेलिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले आहे. सुदीपने ‘टेड एक्स’, ‘आयआयटी’, ‘आयआयएम’, ‘एनआयटी’ अशा संस्थामध्ये मार्गदर्शनपर भाषणे केली आहेत. सुदीपने लिहिलेल्या कादंबर्‍या इंग्रजी भाषेत असल्या, तरी त्याच्या काही कादंबर्‍या या मराठी भाषेतही प्रकाशित झाल्या आहेत व त्या मराठी वाचकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. प्रेमकथांतून तरुणांच्या प्रश्नांचा ठाव घेताना समाजाच्या अनेक प्रश्नांवर भाष्य करणार्‍या सुदीप नगरकर या मराठमोळ्या लेखकाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
 
- स्वप्नील करळे 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@